कोरोनाने मृत्यू झाल्यास नातेवाइकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय; बाधितांच्या अंत्यसंस्कारासंबंधी शासनाच्या या सूचना

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे राज्यात मृतांचा आकडा वाढत आहे. सदर महामारीमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यापासून इतरांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे.

अकोला : कोरोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान राज्यात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधितावर अंत्यसंस्कार कसे करायचे याबाबत राज्य शासनाने नियमावली तयार केली आहे. त्याअंतर्गत कोरोना बाधिताचा मृतदेह घरी न नेता रुग्णालयातून थेट जवळच्या स्मशानभूमीत न्यावा. नातेवाइकांनी रुग्णाचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना एक मीटर अंतरावरून चेहरा दाखवा यासह तब्बल 42 मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

हेही वाचा - Lockdown : 'तुम्ही कंटेन्मेंट झोनमध्ये आहात विसरलाय वाटतेय...'

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे राज्यात मृतांचा आकडा वाढत आहे. सदर महामारीमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यापासून इतरांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी संबंधिताच्या अंत्यसंस्कार करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागत आहे.

आवश्यक वाचा - अबब! सोन्यापेक्षाही महाग असलेल्या कस्तुरीच्या मातीची हवेली, तीही महाराष्ट्रातील या जिल्ह्यात, सुगंधासाठी पर्यटकही...

ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्कार संबंधी 42 मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यापासून ते अंत्यसंस्कार करेपर्यंत व अंत्यसंस्कारानंतर काय काळजी घ्यावी याबाबत राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिशानिर्देश जारी केले आहेत. 

सदर दिशानिर्देशांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदर दिशानिर्देशांमध्ये अलगीकरण कक्ष किंवा अपघात विभागात मृतदेहाची हाताळणी, कक्षसेवक व कर्मचारी यांनी कोरोना बाधित किंवा संशयित मृतदेह हाताळताना घ्यायची काळजी, शववाहिनी चालकाने मृतदेह बाधित किंवा संशयित मृतदेह हाताळताना घ्यायची खबरदारी, शववाहिनीतून मृतदेह पाठवताना घ्यायची काळजी, मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या ठिकाणी अंत्यविधीच्या वेळी घ्यायची काळजी, अंत्यविधी नंतर घ्यायची काळजी इत्यादी प्रकारच्या सूचना शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहेत.

या आहेत मार्गदर्शक सूचना

 • मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याने हात निर्जंतुक करावे व मृतदेह हाताळताना पीपीई किटचा वापर करावा.
 • मृतदेहावर वैद्यकीय उपचारादरम्यान तयार झालेली सर्व छिद्रे सोडियम हायफोक्लोराइड द्रवाने निर्जंतुक करावीत व त्यावर पट्टी लावावी.
 • शरीरावरील धारदार व टोकदार व वैद्यकीय उपकरणे ही कडक प्लॅस्टिकच्या डब्यात जमा करावेत, तोंड व नाकपुड्यामध्ये कापूस घालावा जेणेकरून त्यामधून शारीरिक द्रव्य बाहेर येणार नाही.
 • विलगीकरण कक्षातून मृतदेह इतरत्र हलविण्यात अगोदर मृत व्यक्तीच्या कुटुंबाने मृतदेह पाहण्याची इच्छा दर्शविल्यास त्यांना योग्य ती खबरदारी घेऊन मृतदेहाचे दूरदर्शन घेण्यास परवानगी द्यावी.
 • मृतदेह ताब्यात देण्यापूर्वी नातेवाईकांना एक मीटर अंतरावरून दाखवावा व त्यावेळी त्यांनी वैयक्तिक संरक्षणात्मक साधने घातलेली असावी.
 • मृत्यूचे कारण हे कोविड 19 असेल तर मृतदेह विलगीकरण कक्षातून नातेवाईकांना जवळच्या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी परस्पर हस्तांतरित करावा.
 • कोणत्याही परिस्थितीत मृतदेहाचे जतन करू नये शव बांधण्याकरिता नातेवाइकांची मदत घेऊ नये.
 • मृतदेह शवगृहात 4 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवावा.
 • जर कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेला असेल तर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी शववाहिनीतून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मृतदेह लगेच नेण्याची तयारी करावी.
 • स्थानिक प्रशासनाने याबाबत सूचनांचे तंतोतंत पालन करावे व नातेवाईकांना तेथे पोहोचविण्यासाठी सांगण्यात यावे.
 • मृतदेहाची ओळख फक्त वारसदार किंवा त्यांनी नेमून दिलेल्या व्यक्‍तींनी पटवून घ्यावी व त्यावेळी वैयक्तिक संरक्षणात्मक साधने वापरावीत व सुरक्षित अंतरावरून निरीक्षण करावे.
 • नातेवाईकांना मृतदेहाच्या चेहऱ्याचे शेवटचे दर्शन देण्यासाठी प्लॅस्टिक बॅग उघडू नये.
 • नातेवाइकांनी मृतकाच्या चेहऱ्याचे दर्शन एक मीटर अंतरावरुनच घ्यावे.
 • मृतदेहाला अंघोळ घालने, चुंबन घेणे, मिठी मारणे, तोंडात पाणी सोडणे इत्यादी बाबीस प्रतिबंध राहील.
 • अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी परस्परांमध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेवावे लागेल.
 • अंत्यविधीच्या वेळी धार्मिक मंत्र पठण करणे किंवा दुरून पवित्र पाणी शिंपडणे किंवा इतर धार्मिक विधी दुरून करण्यास मुभा राहील.
 • मृतदेहाची राख गोळा केल्याने विषाणू संसर्गाचा कुठलाही धोका उद्भवत नाही. कुटुंबातील सर्व व्यक्ती, नातेवाईक व मित्रमंडळी जी मयताच्या शेवटच्या 14 दिवसांच्या कालावधीमध्ये मृत व्यक्तीच्या अधिक संपर्कात होते अशांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात भेट देऊन वैद्यकीय सल्ला व मदत उपचार घ्यावेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Show face permission if Corona patient dies to relative in akola