esakal | कोरोनाच्या महासंकटात वादळी पावसाची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Stormy rain adds to Corona crisis

सर्वत्र कोरोना आजाराचे महासंकट आलेले असतांनाच काल 26 मार्च रोजी खामगावसह घाटाखालील काही तालुक्यांमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून विद्युत पोल वाकले आहेत. तसेच छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकुणच दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.

कोरोनाच्या महासंकटात वादळी पावसाची भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : सर्वत्र कोरोना आजाराचे महासंकट आलेले असतांनाच काल 26 मार्च रोजी खामगावसह घाटाखालील काही तालुक्यांमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून विद्युत पोल वाकले आहेत. तसेच छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकुणच दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे.


जिल्ह्यात संग्रामपूर, शेगावसह काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. मात्र, खामगाव शहर टार्गेट बनले. वादळी वारा व पावसाने रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली होती. किरकोळ व्यावसायिकांच्या टपऱ्यावरील टिनपत्रे उडून गेली. काही नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली होती. अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयावरील टिनपत्रे उडाली होती. डीपी रोडवरील चिंचेचे झाड उन्मळून पडले. या झाडाखाली पानटपरी दबली. डॉ.शर्मा यांच्या दवाखान्याजवळील वडाचे झाड उन्मळून रस्त्यावर पडले होते. तर केला नगरमधील हनुमान मंदिराजवळ जवळपास 10 झाडे रस्त्यावर पडली होती.

त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सामान्य रुग्णालयाजवळही काही झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्यामुळे त्या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील राजीव गांधी उद्यानाचे मेन गेट तुटून पडले. तर पंचायत समितीला लागून असलेल्या रस्त्यावरील काही टपऱ्यांवरील टिनपत्रे उडाली होती. तर शहरातील होर्डिंग्ज, बॅनरही तुटून पडलेले दिसून आले. शहराचा फेरफटका मारला असता सगळीकडे झाडाच्या तुटलेल्या फांद्या व पाला पाचोळाच दिसून येत होता. तर चिखली बायपावरील विजयलक्ष्मी पेट्रोल पंपासमोरील टपऱ्या वादळी वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर आल्या होत्या. वादळी वाऱ्यामुळे 8 ते 10 विद्युत खांबावरील तारा तुटून पडल्यामुळे खांब पडले. तर काही वाकले आहेत. आज दिवसभर वीज कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करीत होते. परंतु सायंकाळीपर्यंत शहरातील अनेक भागात विद्युत पुरवठा बंदच होता.