हे काय ? चक्क तीन डॉक्टरांनीच काढला रुग्णालयातून पळ

शुभम बायस्कार 
मंगळवार, 24 मार्च 2020

जगभरात कोरोनामूळे दहशत पसरलेली असतानाचा आता डॉक्टरांमध्येही भीती असल्याचे दिसून येते. त्यामुळे अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातून जनऔषध शास्र (पीएसएम) विभागाच्या तीन पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी घरी पळ काढला काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

अकोला : जगभरात कोरोनामूळे दहशत पसरलेली असतानाचा आता डॉक्टरांमध्येही भीती असल्याचे दिसून येते. त्यामुळे अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातून जनऔषध शास्र (पीएसएम) विभागाच्या तीन पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांनी घरी पळ काढला काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

अकोल्यात कोरोनाची पॉझीटीव्ह रुग्ण अद्यापही आढळून आला नाही. आपण दुसऱ्या स्टेजला आहोत. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्हा सुरक्षित आहे, अशी माहिती मंगळवारी (ता.24) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही.घोरपडे यांनी दिली. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीमूळे येथील जनऔषध शास्र विभागात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या तीन डॉक्टरांनी महाविद्यालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एकीकडे कोरोनाशी दोन हात करणारे आणि मृत्यूंशी झुंज देणाऱ्यांची सेवा करणारे, रुग्णांना मृत्यूंच्या दाढेतून बाहेर काढणारे डॉक्टर समाजात सेवा देत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाला घाबरुन पळ काढणारेही दिसून येत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराची महाविद्यालयाने दखल घेतली असून तीघांचेही विद्यावेतन बंद करण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे यांनी दिले आहेत. तर त्यांचे रजिस्टेशनही रद्द करण्‍यासंदर्भातील प्रस्ताव कॉलेजकडून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे लवकरच पाठविल्या जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही.घोरपडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

विद्यावेतन बंद करण्याचे आदेश
पळ काढलेले डॉक्टर हे जनऔषधीशास्त्र विभागातील आहेत. यासंदर्भात त्यांचे विद्यावेतन बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच त्यांच्या रजिस्टेशन रद्द करण्याचा प्रस्तावही विद्यापीठाकडे लवकरच पाठविल्या जाणार आहे. 
-डॉ.शिवहरी व्ही.घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three doctors escaped from the hospital at akola