तीन हजार नागरिकांची 'घरवापसी'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असल्याने पुणे, मुंबई आणि इतरत्र कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक घरी परतत आहेत. खामगाव तालुक्यात तीन हजारावर नागरिकांची घर वापसी झाली आहे. दरम्यान पंचायत समितीने ग्रामसेवकांच्या मार्फत अशा नागरिकांची माहिती गोळा केली असून त्यांना आरोग्य विभागामार्फत योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच गरज असल्यास औषध उपचार केले जातात. शहरातही जवळपास पाचशे नागरिकांना तपासणी व समुपदेशन करण्यात आले.

खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असल्याने पुणे, मुंबई आणि इतरत्र कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक घरी परतत आहेत. खामगाव तालुक्यात तीन हजारावर नागरिकांची घर वापसी झाली आहे. दरम्यान पंचायत समितीने ग्रामसेवकांच्या मार्फत अशा नागरिकांची माहिती गोळा केली असून त्यांना आरोग्य विभागामार्फत योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच गरज असल्यास औषध उपचार केले जातात. शहरातही जवळपास पाचशे नागरिकांना तपासणी व समुपदेशन करण्यात आले.

राज्यात कोरोना विषाणूने हात-पाय पसरायला सुरवात केली असून मुंबई, पुणे येथे रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील नागरिक आपल्या गावी परत येत आहेत. खामगाव तालुक्यात जवळपास तीन हजार 45 नागरिक हे बाहेर गावावरून परतले आहेत. पंचायत समिती अंतर्गत 97 ग्रामपंचायत आहेत. या गावात पंचायत समितीच्यावतीने घरोघरी अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आशा वर्कस, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक व गावातीलच काही स्वयंसेवक कोरोना विषाणू अनुषंगाने जनजागृती करीत आहेत. घरापर्यंत जावून प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतचे समजपत्र देवून जिविताच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने विषाणूची लागण होवू नये या दृष्टीने आपल्या कुटुंबातील बाहेरून आलेल्या व्यक्तीची खबरदारी म्हणून खामगाव येथील सामान्य रूग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी असे समजपत्र वितरीत करण्यात येत आहे. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन कोरोना बाबत खबरदारी बाबत माहिती दिली जात आहे. आतापर्यंत जवळपास 50 हजार माहिती पत्रक वाटप करण्यात येत आहेत.

कोरोना आजाराचा फैलाव सुरू झाल्यावर तालुक्यातील बाहेरगावी गेलेले नागरिक घरी परत येत आहेत. त्यांची माहिती ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांच्या मार्फत गोळा केली जात आहे. 23 मार्च पर्यंत 3045 नागरिक बाहेर गावावरून आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी अशा नागरिकांची तपासणी केली जात असून वैद्यकीय अधिकारी त्यांना योग्य त्या सुचना देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे.
- चंदनसिंग राजपूत, गटविकास अधिकारी खामगाव

कोरोना आजाराचा फैलाव होवू नये, यासाठी खामगाव तालुक्यात आरोग्य अधिकारी, आशा घरोघरी जावून जागृती करत आहेत. जे लोक पुणे, मुंबईसह बाहेरून आले आहेत, त्याची तपासणी केली जात आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून बाहेरून आलेल्या रुग्णांची माहिती गोळा केली जात असून जे लोक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. त्याची माहिती आम्ही पंचायत समितीस देत आहोत.
- डॉ. दिनकर खिरोडकर, तालुका आरोग्य अधिकारी, खामगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three thousand citizen return to home