हे काय? चक्क डॉक्टरच ‘कोरोना’ संसर्गाच्या सावटात!, पीपीई किट ऐवजी एचआयव्हीच्या किटचा वापर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप कुठेही पॉझीटीव्ह रुग्ण नाही. मात्र तो आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी संरक्षण म्हणून जी पर्सनल प्रोटेक्शन इक्विटमेंट (पीपीई) किट आवश्‍यक असते ती कुठेच उपलब्ध नाही. त्यामूळे रुग्णसेवा जोपासताना डॉक्टरांनाच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा अद्याप कुठेही पॉझीटीव्ह रुग्ण नाही. मात्र तो आढळल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी संरक्षण म्हणून जी पर्सनल प्रोटेक्शन इक्विटमेंट (पीपीई) किट आवश्‍यक असते ती कुठेच उपलब्ध नाही. त्यामूळे रुग्णसेवा जोपासताना डॉक्टरांनाच कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नाही.

कोरोनाविरुद्धचा लढा लढताना डॉक्टरांचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. तर सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून एचआयव्ही साठी आवश्‍यक असणारी कीट डॉक्टरांना दिली जात आहे, त्याचाही तुटवडा असल्याचे समजते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या संशयीत रुग्णांची तपासणी केली जात आहे. दररोज येथे सुमारे ५०० पेक्षा अधीक रुग्णांचे समुपदेशन, आरोग्य तपासणी केली जात आहे. तर ग्रामीण भागातही ३०० पेक्षा अधीक रुग्णांचे स्क्रिनिंग केले जात आहे. सध्यास्थितीत कोरोनाचाविरुद्धची जंग लढताना डॉक्टरांकडून अतिशय महत्त्वाची भूमीका बजावण्यात येत आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोनाच रुग्ण नसली तरी तो आढळल्यास आरोग्य विभागाची मोठी दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टरांनाच कोरोनाच्या रुग्णांना पुढे जावे लागणार आहे. असे असताना त्यांचे संरक्षण म्हणून अत्यावश्‍यक असणारी पर्सनल प्रोटेक्शन इक्विटमेंट (पीपीई) किट जिल्ह्यात कुठेही उपलब्ध नाही. त्याऐवजी एचआयव्ही साठी लागणारी कीट त्यांना पुरविण्यात येत आहे. त्याचेही आरोग्य विभागाकडे सुटे वेगवेगळे भाग आहेत. संपूर्ण किटची उपलब्ध फार कमी प्रमाणात आहे. कोरोनाच्या रुग्णांशी डॉक्टरांचाच सर्वप्रथम थेट संबंध येत असल्याने त्यांचे पुरेशे संरक्षण होणे महत्त्वाचे आहे. मात्र सध्यास्थितीत ही कीट उपलब्ध नसल्याचे गंभीर वास्तव आहे.

काय असते पीपीई कीटमध्ये?
डॉक्टरांना संरक्षण म्हणून पुरविण्यात येणाऱ्या पीपीई कीटमध्ये हेड कॅप, चेहऱ्याला लावण्यात येणारे फेस मास्क, डिस्पोजेबल फुल ॲप्रॉन, सर्जिकल गाऊन, इलॉस्टीक कॅप, हॅन्ड ग्लोज, पायांचे संरक्षण म्हणून वापरण्यात येणारी शु-कवर, सेप्टी ग्लोज, गॉगल, वेस्टेज बॅग इत्यादी मिळणून पीपीई कीट तयार होते. ज्यातून संपूर्ण शरिराचे संरक्षण होऊ शकते. मात्र सध्या एचआयव्हीच्या कीटच्या सुट्या भागांना एकत्र करुन ही कीट तयार करण्यात येत आहे.

कीट का उपलब्ध नाही?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार चायनाकडून पीपीईकीटचे उत्पादन करण्यात येते. मात्र सध्या जगाला कोरोना विषाणूची पार्श्‍वभूमी असल्याने व्यापार क्षेत्र कोलमडले आहे. देशांच्या व अंतर्गत सिमाक्षेत्र बंद असल्याने या किटचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यासह राज्यात या कीट उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

तीन हजार किटची मागणी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांनी विविध पुरवठादारांकडून पीपीई कीटची अतिरिक्त मागणी नोंदविली आहे. चंद्रपूर, नागपूर, इंदोरमध्ये ही मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये बुधवारी (ता.२४) सकाळपर्यंत चंद्रपूरमधून शंभर कीट अकोल्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच पुरवठादारांनाही कीट पुरविण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

मेडिकलच्या तीन डॉक्टरांनी काढला पळ
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातून जनऔषध शास्र (पीएसएम) विभागाच्या तीन पीजीच्या विद्यार्थ्यांनी घरी पळ काढला आहे. या संपूर्ण प्रकाराची महाविद्यालयाने दखल घेतली असून, तीघांचेही विद्यावेतन बंद करण्याचे आदेश अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे यांनी दिले आहेत. त्यांचे रजिस्टेशनही रद्द करण्‍यासंदर्भातील प्रस्ताव कॉलेजकडून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे लवकरच पाठविल्या जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.शिवहरी व्ही.घोरपडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of HIV kit instead of PPE kit in akola