कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील पाच जण विलगीकरण कक्षात!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी गेला. त्यामुळे प्रशासनासह जिल्हावासींनी सुटकेचा श्‍वास घेतला. मात्र, तालुक्यातील कामरगाव येथे कार्यरत एका शिक्षकास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न असून, अमरावती येथे उपचार सुरू आहेत.

कारंजा (जि.वाशीम) ः जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी गेला. त्यामुळे प्रशासनासह जिल्हावासींनी सुटकेचा श्‍वास घेतला. मात्र, तालुक्यातील कामरगाव येथे कार्यरत एका शिक्षकास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न असून, अमरावती येथे उपचार सुरू आहेत. त्यामुळे या शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच या पाचही जणांच्या घशातील ‘स्वॅब’चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे.

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील एका शाळेवरील शिक्षक कोरोना बाधित  निघाला. त्यामुळे कामरगावसह परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रशासनास ही माहिती मिळताच तहसीलदार धीरज मांजरे, पोलिस उपविभागीय अधिकारी संयज पाटील, गटविकास अधिकारी कालिदास तापी, तालुका वैद्यकिय अधिकारी किरण जाधव, धनज पोलिस ठाण्याचे ठाणेदार एस. एम. जाधव व पोलिस उपनिरीक्षक कपील म्हस्के यांनी कामरगाव गाठले. तसेच स्थानिक ग्रामपंचायत सरपंचा सुरेखा देशमुख, उपसरपंच मसीयोद्दीन जहीरोद्दीन, पोलिस पाटील नितीन सिंगाडे, यांच्याशी चर्चा करून त्या कोरोना बाधित मुख्याध्यापकाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कॉरन्टाईन करून त्यांना वाशीम येथे पाठविण्यात आले आहे. 

क्वारंटाईनसाठी पाठविण्यात आलेल्यांपैकी तीन शिक्षक, एक खिचडी वाटणारी महिला व अन्य एका जणाचा समावेश आहे. सदर मुख्याध्यापकाने गुरुवारी (ता.2) कामरगाव येथील शाळेत येऊन शालेय पोषण आहाराचे तांदूळ वाटप केले होते. त्यावेळी ते जवळपास 200 पालकांच्या संपर्कात आल्याचे देखील बोलल्या जात आहे. त्यांना मागील आठ दिवसांपूर्वी त्रास सुरू झाल्याने अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तपासणी दरम्यान ते कोरोना बाधित असल्याचे सिद्ध झाले. प्राथमिक सर्व्हेक्षणानुसार मुख्याध्यापकाने तांदूळ वाटप केलेल्या 200 कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून थेट संपर्कातील पाच जणांना कॉरन्टाईन करून वाशीम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर आणखी एका जणाचा शोध घेणे सुरू आहे. तपासणी दरम्यान कॉरन्टाईन केलेल्या पाच जणांचा अहवाल काय येतो? याकडे कामरगाववासींसह जिल्हावासींचे लक्ष लागले आहे.

त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण आणि अकोला शहरात आज आढळलेल्या रुग्णांमुळे वऱ्हाडात चिंता वाढली आहे. 

कामरगाव येथील एका शाळेत कार्यरत शिक्षकचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. त्यामुळे सदरील शिक्षकाच्या संपर्कातील पाच जणांना विलगीकरणात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या ‘स्वॅब’ नमुना तपासणीसाठी पाठविला असून, अहवाल काय येतो हे पाहणे महत्वाचे आहे.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशीम

थोडक्यात

  • कोरोना बाधित शिक्षकावर अमरावती येथे उपचार
  • कामरगावसह परिसरातील नागरिकांत धास्ती
  • संपर्कातील लोकांची होणार तपासणी
  • तपासणीस पाठविलेल्या अहवालांची प्रतीक्षा

अशी आहे स्थिती...
गृह अलगीकरण.............27
संस्थात्मक अलगीकरण.....27
विलगीकरण कक्ष............05
आत्तापर्यंत घेतलेले नमुने....46
पॉझिटिव्ह अहवाल..........01
निगेटिव्ह अहवाल...........40
अहवाल अप्राप्त..............05
‘डिस्चार्ज’ रुग्ण..............01


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim corona positive five persons in quarantine