कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती स्थिर, जिल्ह्याचे लक्ष लागलेय तपासणी अहवालाकडे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 April 2020

सध्या संपूर्ण जगासह देश व राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, आता सदरील रुग्णाच्या दुसर्‍या ‘स्वॅब’ तपासणी अहवालाकडे जिल्हावासींचे लक्ष लागले आहे.

 

वाशीम : सध्या संपूर्ण जगासह देश व राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, असे असतानाही जिल्ह्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, आता सदरील रुग्णाच्या दुसर्‍या ‘स्वॅब’ तपासणी अहवालाकडे जिल्हावासींचे लक्ष लागले आहे.

कोरना या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने संपूर्ण देशभर संचारबंदी लागू केली आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबेहर पडल्यासही सामाजिक दुरावा राखण्याचे आवाहन केले जात आहे. एक व्यक्ती बुलडाणा येथे गेला होता. मात्र, बुलडाणा येथील व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनास आला होता. त्यामुळे सदरील व्यक्ती व त्याच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण करण्यात आले होते. तसेच त्यांच्या घशातील लाळेचे नमुने तपासण्यात आले. मात्र, हे सर्व नमुने ‘निगेटिव्ह’ आले. त्यानंतर जिल्ह्यातील एक व्यक्ती दिल्ली येथील कार्यक्रमाला गेला होता. 

या व्यक्तीचे विलगीकरण करून संपूर्ण गाव सिलबंद केले. तसेच घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. सदरील व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेतल्या गेली. तसेच सदरील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करून त्यांचे ‘स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्व नमुने ‘निगेटिव्ह’ आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्‍वास घेतला. त्यानंतर दिल्ली येथील निजामुद्दीन परिसरात गेलेल्या सहा व्यक्तींच्या ‘स्वॅब’चा अहवाल देखील ‘निगेटिव्ह’ आला. त्यामुळे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात एकच व्यक्ती कोरोना बाधित असून, सदरील रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आता 14 दिवसानंतर व 24 तासानंतर होणार्‍या तपासणी अहवालाकडे प्रशासनासह जिल्हावासींचे लक्ष लागले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील अलगीकरण कक्षात ‘कोरोना’ बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. सदरील रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे आता 14 दिवसानंतर एक ‘स्वॅब’ नमुना व त्यानंतर 24 तासानंतर ‘स्वॅब’ नमुना घेतल्या जाईल. हे दोन्ही नमुने ‘निगेटिव्ह’ आल्यास सदरील रुग्णास गृह अलगीकरणात ठेवण्यात येईल.
-अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

अशी आहे स्थिती...
गृह अलगीकरण................18
संस्थात्मक विलगीकरण.....06
अलगीकरण कक्ष...............01
आत्तापर्यंत घेतलेले नमुने...23
पॉझिटिव्ह अहवाल............01
निगेटिव्ह अहवाल.............22
अहवाल अप्राप्त................00


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim corona report