अरे वा! शेतमाल विक्रीतून केली चक्क दोन कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

जिल्ह्यात ता. 27 मार्च पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. ता. 16 एप्रिलपर्यंत या उपक्रमाद्वारे सुमारे नऊ हजार 60 क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री झाली. यामधील काही भाजीपाला, फळे इतर जिल्ह्यातही विक्री करण्यात आली. तसेच नाशीक जिल्ह्यातील काही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सुमारे 20 क्विंटल द्राक्ष विक्री केली आहे.

 

वाशीम : जिल्हास्तरावर भाजीपाला, फळे, दुध याचा पुरवठा होण्याबाबत कृषि विभानाने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. त्यानुसार कृषी विभाग व ‘आत्मा’च्या माध्यमातून शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामाध्यमातून ता. 23 मार्च ते ता. 16 एप्रिल दरम्यान जिल्ह्यात सुमारे दोन कोटी 26 लाख रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी दिली आहे.

शेतकरी, शेतकरी गट तसेच शेतकऱ्यांच्या कंपनीने उत्पादित केलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्याकरिता तालुका व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक नीलेश ठोंबरे, तंत्र अधिकारी समाधान पडघान, मनीषा लंगोटे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

तसेच तालुकास्तरावर कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांची तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. कृषी विभाग व ‘आत्मा’ कार्यालयाकडून सर्वप्रथम जिल्ह्यातील भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांची पिकनिहाय माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार या शेतकऱ्यांचे ‘आत्मा’ अंतर्गत गट तयार करून भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले. जिल्ह्यात ता. 27 मार्च पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. ता. 16 एप्रिलपर्यंत या उपक्रमाद्वारे सुमारे नऊ हजार 60 क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री झाली. यामधील काही भाजीपाला, फळे इतर जिल्ह्यातही विक्री करण्यात आली. तसेच नाशीक जिल्ह्यातील काही द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सुमारे 20 क्विंटल द्राक्ष विक्री केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim farmers turnover of Rs 2 crore from the sale of farm produce