दिल्लीला गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आले बारा जण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

राज्यासह देशभरात कोरोनाशी दोन हात केले जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे एकही कोरोना बाधित नसलेल्या वाशीम जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली होती.

 

वाशीम : दिल्ली येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी नागरिक कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला होता. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सदरील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 12 व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले होते. या सर्व जणांच्या घशातील लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, हे सर्व 12 नमुने ‘निगेटिव्ह’ आले आहेत. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. एकंदरीतच हा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याने प्रशासनासह नागरिकांनी देखील सुटकेचा श्‍वास घेतला आहे.

राज्यासह देशभरात कोरोनाशी दोन हात केले जात आहेत. मात्र, जिल्ह्यातील एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे एकही कोरोना बाधित नसलेल्या वाशीम जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली होती. सदरील व्यक्ती हा दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यामुळे तो कोठे कोठे गेला?, कुणाला भेटला?, त्याच्या संपर्कात आलेले कोण? यांसह इतर बाबींची आरोग्य विभागाने पडताळणी केली.

त्यावरूनच मेडशी येथे घरोघरी जाऊन आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. तसेच तातडीने संबंधितांच्या परिवारातील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच यातील 12 जणांच्या घशातील लाळेचे नमुने कोरोनाच्या चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. या 12 व्यक्तींच्या लाळेचा वैद्यकीय अहवाल आज (ता.5) प्राप्त झाला असून, 12 ही व्यक्तींचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने देखील सुटकेचा श्‍वास घेतला आहे.

मेडशीत प्रत्येकाची आरोग्य तपासणी
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील नागरिक दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने संबंधिताची आरोग्य तपासणी केली. तसेच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. तर दुसरीकडे मेडशी गाव बंद करून आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

वाशीम जिल्ह्यातील अपडेट्स
गृह अलगीकरण ............... 00
संस्थात्मक विलगीकरण........ 12
अलगीकरण कक्षात दाखल .....15
तपासणीस पाठविलेले नमुने .....17
‘पॉझिटिव्ह’ अहवाल ............01
‘निगेटिव्ह’ अहवाल...14 (आज 12)
अहवाल अप्राप्त नमुने ...........02


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim news twelve people came in contact with a person who went to Delhi