व्यवसायच अवैध तेथे मदत पोहचणार कशी?

राम चौधरी 
Saturday, 11 April 2020

कोरोनाच्या धास्तीने गावं, रस्ते, इमले बंद झाले. रस्त्यांवर चिटपाखरूही नाही. घरात असेल ते रांधायचे त्याने पोट भरायचे, हा शिरस्ता सध्या सुरू आहे. मात्र, ज्यांच्या घरातच काही नाही. व समाजाच्या लेखी बहिष्कृत व्यवसाय करणार्‍या वारंगणांच्या वस्तीत ‘लॉकडाऊन’ची धग असह्य करणारी आहे. सर्वस्वाच्या जोरावर पोटाची खळगी भरायचा व्यवसायही ठप्प झाला. फोटो काढण्यापुरती पांढरपेशी मदतही या वस्तीत फिरकत नाही.

 

वाशीम : कोरोनाच्या धास्तीने गावं, रस्ते, इमले बंद झाले. रस्त्यांवर चिटपाखरूही नाही. घरात असेल ते रांधायचे त्याने पोट भरायचे, हा शिरस्ता सध्या सुरू आहे. मात्र, ज्यांच्या घरातच काही नाही. व समाजाच्या लेखी बहिष्कृत व्यवसाय करणार्‍या वारंगणांच्या वस्तीत ‘लॉकडाऊन’ची धग असह्य करणारी आहे. सर्वस्वाच्या जोरावर पोटाची खळगी भरायचा व्यवसायही ठप्प झाला. फोटो काढण्यापुरती पांढरपेशी मदतही या वस्तीत फिरकत नाही. ना आधारकार्ड, ना रेशनकार्ड. त्यामुळे रेशनही मिळत नाही. या परिस्थितीत ही वारंगनांची वस्ती लॉकडाऊनच्या अंमलात पोटाची आग सांभाळत उसासे देत आहे. 

देहविक्रय तसा पांढरपेशा समाजाच्या दृष्टीने निषिद्ध व्यवसाय. मात्र, पोटासाठी हा व्यवसाय पत्करणार्‍या वारांगणांची वस्ती प्रत्येक शहरात गावकुसाबाहेर तर कधी मोठमोठ्या बंगल्यांच्या पाठीमागे नांदत असते. सायंकाळनंतर या वस्तीत झगमगाट येतो. कुणी शरीराची भूक भागविण्यासाठी येत असले तरी, या भूकेतून या वारांगणांच्या वस्तीत चुली पेटतात. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून कोरोनामुळे सगळे व्यवसाय बंद झाले आहेत. याची झळ या वस्तीलाही बसली आहे. कोरोनाच्या धास्तीने गिर्‍हाईकच फिरकत नसल्यामुळे येथील चुली थंड झाल्या आहेत. एरव्ही जे गरिब आहेत त्यांच्यासाठी अनेकांनी भोजनाची व राशनची सोय केली. मात्र, ही वस्तीच पांढरपेशांच्या लेखी बहिष्कृत असल्याने इकडे किमान फोटो काढण्यापुरती मदतही घेऊन कोणी येत नाही.

मालेगाव येथील बाजारात सुगंधा (बदललेले नाव) गेल्या सात वर्षांपासून हा व्यवसाय करते. गेल्या सात वर्षांत हातातोंडाची गाठ न पडण्याचे प्रसंग क्वचितच आल्याचेही तिने सांगितले. मात्र, सध्या या लॉकडाऊनमुळे गेल्या पंधरा दिवसांपासून खायायचं काय अन रांधायचं काय? हा प्रश्‍न उभा आहे. वाशीम येथील रेडलाइट एरियातील जयवंता (बदलेले नाव) हिची कहानीतर अंगावर शहारा आणणारी आहे. ती परजिल्ह्यातील रहिवासी आहे. येथे तिचे राशनकार्डही नाही. गावाकडे म्हातारे आई-वडील व अपंग भाऊ यांचे पोट भरण्यासाठी ती दीड वर्षापूर्वी या एरियात आली. देहविक्रय करून स्वतःचे पोट भरताभरता आई-वडीलांना पोसण्याचे काम ती करते. मात्र, लॉकडाऊनमुळे आई-वडीलांकडे जाताही आले नाही. गिर्‍हाईक फिरकत नसल्याने आई-वडीलांना पैसे पाठविण्याचीही सोय नाही. आई-वडीलांचा चेहरा डोळ्यासमोर आला तर, भूकेपेक्षा पोटात त्यांच्या आठवणीने कालवाकालव होत असल्याचे अंगावर शहारे आणणारे वास्तव तिने व्यक्त केले. 

या वस्तीतही चूल पेटावी
समाजाच्या दृष्टीने निषिद्ध असणारा व्यवसाय, रेडलाइट एरियातल्या महिला करत असल्यातरी त्यांनाही पोट आहे. पोटासाठी हा व्यवसाय त्यांना करणे भाग आहे. शासनाचे पुनर्वसनाचे कायदे कितीही मोहक असले तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र कधीच होत नाही. शहरांमध्ये अनेक दानशूर आहेत. लॉडकाऊनच्या काळात गोरगरिबांचे पोट भरण्याचे काम ही मंडळी करतात. त्यांनी या वस्तीकडेही एकदा फेरफटका मारावा. या वस्तीतील चूल किमान दिवसातून एकदातरी पेटावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: washim red light area need help