Lockdown : ते विदारक दृष्य पाहिले अन् ‘भय इथले संपत नाही’ या कवितेची झाली आठवण

राजदत्त पाठक
Wednesday, 13 May 2020

जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग सर्वप्रथम मेडशी येथील रुग्णाला झाला. आणि जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली. पण त्यांनी तो प्रसंग आव्हान म्हणून स्विकारला.

वाशीम : कवी ग्रेस यांच्या ‘चंद्र माधविचा प्रदेश’ या कविता संग्रहातील ‘भय इथले संपत नाही’ या कवितेची आठवण ‘कोरोना, ‘लॉकडाऊन’ आणि आजची सामाजिक स्थिती पाहून आली. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. सुरवातीला वाटले की हा लॉकडाऊन एका मर्यादेपर्यंत आहे. पण हा लॉकडाऊन वाढतच गेला. 

तशा सामाजिक समस्या वाढत गेल्या. कोरोना संसर्गाची वाढती भीती याचे आक्राळ विक्राळ स्वरूप आणि लॉकडाऊनमुळे थांबलेली चाके यामुळे मग उद्योगातील आपल्या रोजगाराचे काय? विद्यार्थ्यांच्या शिक्षकाचे काय? शेतकर्‍यांच्या शेतीचे काय? शेतीमधील शेतमालाचे काय? उद्योगधंदे बंद पडले तर घराचे आर्थिक चक्र कसे सुरू राहणार दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटेल काय?, अशा एक ना अनेक शंका मनात आणि प्रत्यक्षात डोकावत होत्या. हे सर्व विदारक दृष्य पाहिले की कवी ग्रेसच्या त्या ओळी नकळत ओठावर येतात.

आवश्यक वाचा - कोरोनाने मारले अन् या व्यवसायाने तारले, लाॅकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या शेकडो युवकांना मिळतोय रोजगार

जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग सर्वप्रथम मेडशी येथील रुग्णाला झाला. आणि जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा हादरली. पण त्यांनी तो प्रसंग आव्हान म्हणून स्विकारला. मेडशी येथील तो पॉझिटिव्ह रुग्ण खणखणीत बरा होऊन घरी गेला. व संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा श्‍वास सोडला. मात्र त्यानंतर बहुतांश बाहेरून येणार्‍या कोराना बाधित रुग्णांनी यंत्रणेची भीती वाढविली. उत्तर प्रदेशातून आलेले ट्रकचा चालक, आणि काळजी वाहक हे दोघेही पॉझिटिव्ह निघाले. यामधील ट्रक काळजी वाहकाचा (क्लीनर) चा मृत्यू झाला. ट्रक चालक कोरोना बाधित निघाला. असे असताना  मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील एका रुग्णामुळे जवळपास पन्नास जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यामुळे स्थानिक पातळीवर एकही कोरोना रुग्ण नसतानाही जिल्हा प्रशासनाचे इथले भय संपत नाही..!’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! आता लक्षणं नसतानाही आढळत आहेत कोरोनाचे रुग्ण

कोराना संदर्भात जिल्ह्यात सर्वसाधारणपणे असे वातावरण असताना गरिबांपासून सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना भविष्यात येणार्‍या आव्हानांचे भय सतावत आहे. छोटे-मोठे उद्योग ठप्प झाले. या उद्योगांच्या भरवशावर पोट भरणारे कामगार बेरोजगार झाले आहेत. कोरोना विषाणूंचा फैलाव असाच सुरू राहिल्यास शिक्षणाचे काय, ही चिंता विद्यार्थ्यांसह शिक्षण संचालकांना आणि पालकांना सतावत आहे. फळ, भाजीपाला, मसाला पीक यांची बाजारपेठ ठप्प झाली. परिणामी भाव गडगडले. पुढे या पिकांचे काय अशी चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. 

कोरोना आणि शेतकरी यासंदर्भात्र जिल्ह्यात असे वातावरण असताना कोरोना संदर्भात लढा देण्यात अग्रणी भूमिका निभावणार्‍या डॉक्टरांकडे व संबंधित यंत्रणेकडे   पर्याप्त साहित्य नसल्याने जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांमध्येच भीती आहे. अनेक खासगी डॉक्टरांनी या भीतीपोटी आपले दवाखानेच बंद ठेवले आहेत. त्यामुळे इतर आजार असलेल्या रुग्णांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कोरोना संदर्भात जिल्ह्यात सर्वदूर विदारक परिस्थिती असतानाच जिल्ह्यातील आर्थिक सत्ता असलेल्या बँकाही मेटाकुटीस आल्याचे चित्र आहे. बँकेने वाटप केलेले कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत झाले. 

त्यामुळे बँक संचालक चिंतेत आहेत. परिणामी शेतकर्‍यांना तसेच व्यावसायिकांना बँक प्रशासन कर्ज देण्यास असमर्थता दर्शवीत आहे. आर्थिक आधार न मिळाल्यास शेती व व्यवसाय होणार कसे अशी भीती निर्माण झाली आहे. एकंदरीत या महामारीच्या प्रादुर्भावाने सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना महामारीशी लढा देऊन जमलेल्यांना भविष्यात चांगल्या प्रकारे जीवनजगता येईल, याकरिता आतापासूनच शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा कवी ग्रेस यांच्या त्या ओळींची पुन्हा एकदा आठवण झाल्याशिवाय राहणार नाही.  

लघु उद्योगाला आर्थिक पॅकेजची गरज
सर्वसाधारणपणे सर्वांचा सहभाग असलेल्या लघुउद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक पॅकेज जिल्हानिहाय दिल्यास त्याचा लाभ त्या-त्या जिल्ह्यातील लघुउद्योजकांना त्यावर आधारित कामगारांना होईल.

शेतकर्‍यांना बिनव्याजी पीककर्ज
कोरोनामुळे शेती व्यवस्था व शेतकरी कोलमडून गेला आहे. त्याला आधार देण्यासाठी शेतीव्यवस्था उभारण्यासाठी यावर्षीतरी शेतकर्‍याला बिनव्याजी कर्ज देण्यासंदर्भात बँकांना निर्देश द्यावे. सर्वसाधारणपणे व्यापारी बँका, राष्ट्रीयकृत बँका शेतकर्‍यांना कर्ज देण्यासंदर्भात टाळाटाळ करण्याची भूमिका घेतात. तेव्हा राज्य शासनाने यासंदर्भात सुरवातीपासूनच खंबीरपणे निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहात त्याला बिनव्याजी कर्ज देण्यासंदर्भात भूमिका घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In washim those lines of poet Grace unknowingly come to the lips