वैध ‘लॉकडाऊन’; अवैध व्यवसायाला ‘सोनसाखळ्या’!, गुटखा तस्करीतून दररोज लाखोंची उलाढाल

राम चौधरी 
Tuesday, 5 May 2020

कोरोनाच्या साथीने संपूर्ण राज्य कुलूपबंद झाले आहे. व्यापार-उद्योग, व्यवसाय साखळबंद झालेत. मात्र, याच लॉकडाऊनच्या काळात वाशीम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा तस्करीच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस आले आहेत.

वाशीम :  कोरोनाच्या साथीने संपूर्ण राज्य कुलूपबंद झाले आहे. व्यापार-उद्योग, व्यवसाय साखळबंद झालेत. मात्र, याच लॉकडाऊनच्या काळात वाशीम जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा तस्करीच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस आले आहेत. अमरावतीवरून कारंजामार्गे जिल्हाबंदीच्या शृंखला तोडत वाशीम ते खामगाव पर्यंत अवैध गुटख्याचा प्रवास निर्धोकपणे होत असून, ग्रामीण भागात साठेबाजी करून शहरात चौपट भावाने गुटखा राजरोसपणे विकला जात असल्याचे चित्र आहे.

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील सर्व व्यवसाय बंद आहेत. व्यापार थांबला आहे. कामगार घरात बसून आहेत. मात्र, या कठीण काळात कारंजा व वाशीम येथे गुटखा माफियाला सोन्याचे दिवस आले आहेत. 140 रुपयांचा गुटख्याचा पुडा तब्बल 500 रुपयांपर्यंत विकला जात आहे. या लॉकडाऊनच्या काळात गुटखा माफियांनी आपली स्वतंत्र घरपोच यंत्रणाही विकसीत केली आहे. वाशीम येथे गुटखा आल्यानंतर तो रिसोड तालुक्यातील पेनबोरी या गावात साठवला जातो. तेथून शेतमालाच्या वाहनांतून एक लाख रुपयांचे एक कार्टून शहरात आणले जाते. पानटपर्‍या बंद असल्या तरी पानटपरी चालकाच्या घरी गुटख्याचे पुडे पोचविले जातात. दुपारी बारा वाजेपर्यंत हा व्यवहार उरकला जातो. घरपोच तीन ते चार पुडे दिले जात असले तरी, त्यातून निर्माण होणारे अर्थकारण प्रचंड आहे. वाशीम शहरामध्ये दररोज आठ ते दहा लाख रुपयांचा गुटखा अवैधपणे विकला जातो. संबंधित विभाग मात्र गुटखा माफियांसोबत याराना निभावत असल्याने या व्यवसायाला मात्र सोन्याचे दिवस आले आहेत.

अस्तिनीतले निखारे शोधा
शहरातील व जिल्ह्यातील गुटखा माफियांवर कडक कारवाई करण्याचे धोरण उपविभागीय पोलिस अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी अंमलात आणणे सुरू केले आहे. मात्र, गुटखा माफियांच्या ठिकाणांवर छापा मारण्यास उपविभागीय अधिकार्‍यांचे पोलिस पथक गेले तर, दरवेळी त्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागते. वाशीम शहरातील गुटखा माफियांसोबत संबंधित चमूतील काही कर्मचार्‍यांचेच लागेबांधे असल्याचा आरोप जनतेमधून होत असल्याने, आता या गुटखा माफियांवर कारवाई करावी कोणी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

असा होतो प्रवास
विदर्भामध्ये मध्यप्रदेशातून पांढरकवडा येथे गुटख्याची साठवणूक केली जाते. तेथून गुटख्याचा माल अमरावती येथे येतो. अमरावती येथील गुटखा माफिया संपूर्ण विदर्भातील नव्हे तर, मराठवाड्यातील या अवैध गुटखा व्यवसायाचा जनक आहे. त्यानंतर तो गुटखा कारंजा येथे येतो. कारंज्यातील दुसर्‍या कडीमार्फत हा गुटखा वाशीम, मंगरुळपीर, मानोरा व हिंगोलीकडे जातो. तर दुसर्‍यामार्गाने शेलुबाजार, मालेगाव व रिसोड ते खामगाव असा गुटख्याचा प्रवास होतो. अन्न व औषधी प्रशासन विभाग मात्र कोणतीच कारवाई करीत नसल्याने गुटखा माफिया निर्धास्तपणे आपला अवैध व्यवसाय चालवत आहेत.

वाशीम जिल्ह्यामध्ये गुटखा बंदी आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून नियमीत तपासण्या व कारवाया केल्या जातात. मात्र, तरीही कोठे अवैध गुटखा विक्री होत असेल तर, त्याची दखल घेऊन कडक कारवाई केली जाईल.
-सागर तेरकर, जिल्हा अन्न व औषधी प्रशासन अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Washim Valid ‘lockdown’; Illegal trade ‘gold chains’ !, Gutkha smuggling generates millions every day