Breaking : लातूर पोलिस ट्रेनिंग कॅम्पमधून आलेला युवक बाधीत; या तालुक्यात पुन्हा कोरोनाचा प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

मागील महिन्यात शहरातील दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यातून बरे होऊन दोन्ही रुग्ण घरी पोचल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता.

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : दोन पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना विषाणूजन्य आजारावर मात केल्यानंतर तालुक्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील निमखेड येथील युवक लातूर येथून पोलिस भरती ट्रेनिंग कॅम्प संपवून मुंबई येथून चार दिवसांपूर्वी गावी आला होता. प्रशासन अलर्ट झाले असून, गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मागील महिन्यात शहरातील दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यातून बरे होऊन दोन्ही रुग्ण घरी पोचल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र लातूर येथील पोलिस ट्रेनिंग कॅम्प संपल्यावर काही दिवस मुंबई येथे राहून एक युवक दुचाकीने निमखेड येथे आला. त्यावेळी गावकऱ्यांनी गावापासून दोन किलोमीटर असलेल्या एका ठिकाणी थांबविले होते. 

आवश्यक वाचा - अरे देवा! कोरोनामुळे या जिल्ह्यात एकाच दिवशी तीन मृत्यू; 20 पाॅझिटिव्ह

तो गावात कोणाच्याही संपर्कात नव्हता कुटुंबाच्या व्यक्तीमार्फत त्याला अंतर राखूनच जेवण पुरवींण्यात येत होते. मुंबई येथे पोलिस फोर्समध्ये भरती झाल्यानंतर सदर युवक लातूर येथील प्रशिक्षण शिबिरात असताना सदर कॅम्प मधील आठ पोलिस प्रशिक्षणार्थीना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसापूर्वी त्याला बुलडाणा येथे कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे हे त्याचे स्वाईप नमुने घेण्यात आले. त्यात सदर युवकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 

सदर घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, शहरापासून आता कोरोना संसर्गजन्य आजाराने ग्रामीण भागात प्रवेश केला आहे. तहसीलदार सारीका भगत, तालुका आरोग्य अधिकारी दत्ता मांटे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब मुसदवाले, ग्रामसेवक नंदकिशोर राठोड, सरपंचपदी लक्ष्मण कव्हळे, उपसरपंच परमेश्वर कव्हळे, अनिल अंभोरे यांच्यासह आशासेविका यांच्या सहकार्याने गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

खबरदारी घेतल्याने समाधान आहे
तो युवक पोलिस जवान असून, तो प्रशिक्षण घेत असलेल्या लातूर येथे त्याचे सहकारी कोरोना बाधित झाल्याने त्याने स्वतः ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून गावात येणे टाळले. या युवकाच्या कुटुंबातील व्यक्ती तिचा त्याच्याशी संपर्क आला नाही. मात्र, खबरदारी म्हणून कुटुंबातील सात जणांना बुलडाणा येथे हे तपासणीसाठी पाठविले.
- लक्ष्मी लक्ष्मण कव्हळे, सरपंच निमखेड/गिरोली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A youth from Latur police training camp was corona infected