लढा कोरोनाशी : परीक्षा रद्द, 'या' राज्यात आता उन्हाळी सुटी सुरू

coronavirus india updates karnataka cancelled school exams summer vacation
coronavirus india updates karnataka cancelled school exams summer vacation

बेंगळुरू : कोरोनाव्हायरसच्या प्रसाराविरूद्ध सावधगिरी म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शनिवारपासून (ता.१४) उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पहिली ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. सार्वजनिक शिक्षण विभागाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील सर्व जिल्ह्यांना पूर्व प्राथमिक, एलकेजी, युकेजी आणि पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी देण्यात येणार असून २०२०-२१ च्या वेळापत्रकानुसार शाळा पुन्हा सुरू होतील. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा असतील. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी येऊन परीक्षा देणे पुरेसे आहे.

बिहारमध्येही शाळांना सुट्या
बिहारमध्ये कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता सर्व सरकारी व खासगी शाळा आणि क्लास ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर या निर्णयाची माहिती राज्याचे मुख्य सचिव दीपक कुमार यांनी दिली. ते म्हणाले की, बिहारमध्ये १४२ संशयित रुग्ण आढळले होते. यातील ७५ लोकांना काहीही झाले नसल्याचे स्पष्ट झाले असून अन्य संशयितांना मात्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंत एकाही रुग्णाच्या रक्ताच्या नमुन्यातून ‘कोरोना’च्या विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र दुबईवरुन आलेल्या एका व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवले असून त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तीला कोरोनाव्हायरस झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बिहारमधील स्थिती 

  • राज्याच्या स्थापनादिनानिमित्त २१ व २२ मार्चला होणारा कार्यक्रम रद्द 
  • क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित 
  • अडीच लाख अंगणवाड्या बंद; मुलांना पोषण आहार देण्‍यासाठी पर्यायी व्यवस्था 

आणखी वाचा - कोरोनामुळं देशात रस्त्यांवर दिसणार शुकशुकाट

ओडिशात ‘राज्य आपत्ती’
कोरोना व्हायरस आजार राज्य आपत्ती असल्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शुक्रवारी जाहीर केले. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि चित्रपटगृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेशही त्यांनी आज दिला. शाळा बंद राहणार असल्या तरी बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले. या आजाराला आळा घालण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून, लोकांमध्ये या विषाणूबद्दल जनजागृतीसाठी मंत्रिमंडळाने २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्‍यक उपाय योजण्यासाठी मंत्र्यांचा गट स्थापन केला असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. याचबरोबर ‘कोविड-१९ ओडिशा नियमावली २०२०’ ही मंजूर करण्यात आली आहे.


कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस अथवा प्रभावी औषधोपचार नसल्याने या जागतिक साथीशी लढा देऊन त्यावर मात करणे हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे. 
-नवीन पटनाईक, ओडिशाचे मुख्यमंत्री 

ओडिशात काय घडलं?

  • ओडिशात राज्य आपत्ती जाहीर 
  • शैक्षणिक संस्था, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि चित्रपटगृह ३१ मार्चपर्यंत बंद 
  • उपाययोजनांसाठी मंत्र्यांचा गट स्थापन 
  • जनजागृतीसाठी २०० कोटींचा निधी मंजूर 
  • ‘कोविड-१९ ओडिशा नियमावली २०२०’जाहीर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com