अर्जुनच्या मदतीने 'हा' पाणीपुरी विकणारा मुलगा झाला स्टार क्रिकेटपटू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 October 2019

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपण कोणतेही यश संपादन करु शकतो. याचाच प्रत्यय मुंबई संघाच्या सध्याच्या धडाकेबाज फलंदाज यशस्वीकडे पाहून येतो.

मुंबई : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपण कोणतेही यश संपादन करु शकतो. याचाच प्रत्यय मुंबई संघाच्या सध्याच्या धडाकेबाज फलंदाज यशस्वीकडे पाहून येतो. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर पाणीपुरी विकणारा यशस्वी सध्या आपल्या अनोख्या फलंदाजीमुळे सर्वांचीच मने जिंकत आहे. मात्र त्याच्या या यशामागे त्याचा मित्र आणि सहकारी अर्जुन तेंडुलकर याचा मोठा हात आहे. 

क्रिकेट जगतातील देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याचा मुलगा अर्जुन देखील इतरांना मदत करण्याची भावना ठेवतो, याचाच प्रत्यय सध्या सर्वांना येत असून त्याने एका पाणीपुरी विकणा-या मुलाला मदत करत सध्याचा एक स्टार क्रिकेटपटू बनविले आहे. हा खेळाडू आहे विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून धडाकेबाज फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल.

सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये यशस्वीने मुंबई संघाकडून आतापर्यंत केवळ 4 सामन्यात 75.25 च्या सरासरीने 301 धावा केल्या आहेत. यात दोन शतकांचा देखील समावेश आहे. हा यशस्वी एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर पाणीपुरीची गाडी लावायचा मात्र क्रिकेटची जिद्द आणि त्याच्यातील प्रतिभा यामुळे त्याने हे यश संपादन केले आहे  आणि या सर्वामागे अर्जूनचा मोठा हात असून यशस्वीला यशस्वी करण्यात अर्जूनने बरीच मदत केली आहे. 

अर्जुन आणि यशस्वी हे बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत एकत्र क्रिकेट खेळत असताना त्यांची ओळख झाली आणि नंतर या ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाले. याचवेळी अर्जुनने यशस्वी आणि सचिनची भेट घडवून दिली. या भेटीमुळे यशस्वीचे आयुष्यच बदलले. कारण सचिनकडून यशस्वीच्या फलदांजीची तारीफ झाल्याने भारावून गेलेल्या यशस्वीची खरी यशस्वी घौडदौड याच भेटीनंतर सुुरु झाली. त्यामुळे सध्या एक स्टार क्रिकेटपटू झालेल्या यशस्वीच्या यशामागे अर्जुनचा मोठा वाटा असल्याचेच म्हणावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the help of Arjun,he' became a star cricketer who sells water balls