बांगलादेश महिला संघ  T20 वर्ल्डकपसाठी पात्र

गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

बांगलादेश महिला संघाने गुरुवारी आयर्लंडचा चार गडी राखून पराभव करताना महिला T20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली.

ढाका - बांगलादेश महिला संघाने गुरुवारी आयर्लंडचा चार गडी राखून पराभव करताना महिला T20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली. बांगलादेश संघाने या विजयासह पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 

या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारे दोन संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. ही स्पर्धा पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे. 

बांगलादेश महिला संघाने चौथ्यांदा विश्‍वकरंडकासाठी पात्रता सिद्ध केली. यापूर्वी 2014, 2016 आणि 2018 स्पर्धेत त्यांचा सहभाग होता. 

आयर्लंड महिला संघाचा डाव प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 85 धावांतच आटोपला. कर्णधार लॉरा डेल्नी (25), ईमेअर रिचर्डसन (25) आणि ओरिया प्रेंडरगस (10) या तिघींनाच दोन आकडी मजल मारता आली. बांगलादेशाची फिरकी गोलंदाज फाहिमा खातून हिने 18 धावांत 3 गडी बाद केले. आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश महिला संगाने 18.3 षटकांतच 6 बाद 86 धावा केल्या. साजिदा इस्लाम आणि रितू मोनी यांच्यात पाचव्या विकेटसाठी झालेली 38 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. रितूने 15, तर साजिदाने 32 धावा केल्या.