गौतम गंभीर : केले ट्वीट, झाला बीट

गुरुवार, 4 एप्रिल 2019

जम्मू-काश्मीरसाठी वेगळे पंतप्रधान असावेत अशी मागणी उमरांनी केली होती. त्यास प्रत्यूत्तर देताना गंभीरने त्याच्या नेहमीच्या शैलीत सोशल मिडीयावर बॅटींग केली.

एक एप्रिलच्या म्हणजे एप्रिल फुलनिमित्त केलेल्या अन् झालेल्या हँगओव्हरमधून क्रिकेटप्रेमी इतरांपेक्षा तुलनेने लवकर सावरले होते. याचे कारण दोन एप्रिल हा 2011 मधील दुसऱ्या क्रिकेट जगज्जेतेपदाचा वर्धापनदीन असतो. त्या संघातील विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर अशा प्रमुख खेळाडूंसह काही माजी तसेच बरेच आजी खेळाडू ट्विट करीत होते. त्याच संघातला गौतम गंभीर मात्र यास अपवाद होता. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून हा गंभीर ट्वीटरवर चांगलीच बॅटींग करू लागला आहे. यावेळी त्याने नव्या क्षेत्रातील इनिंगला साजेशी स्टान्स घेत राजकीय विषयावर भाष्य केले. त्याने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी धारेवर धरले.

जम्मू-काश्मीरसाठी वेगळे पंतप्रधान असावेत अशी मागणी उमरांनी केली होती. त्यास प्रत्यूत्तर देताना गंभीरने त्याच्या नेहमीच्या शैलीत सोशल मिडीयावर बॅटींग केली. उमरला थोड्या झोपेची आणि मग स्ट्राँग कॉफीची गरज असल्याचा सल्ला देत गंभीर म्हणाला की, त्याला जम्मू-काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान हवाय आणि मला समुद्रावर चालायचेय, तर डुकरांना उडताना पाहायचेय. वेगळ्या पंतप्रधानापेक्षा उमरला झोपेची गरज आहे. तरिही त्याला कळत नसेल तर त्याने हिरवा पाकिस्तानी पासपोर्ट मिळवावा अन्  उमरने पाकिस्तानला बस्तान हलवावे. 

 

उमरने बांदीपोरामधील निवडणूक प्रचार सभेत ही मागणी केली होती. स्वातंत्र्यानंतर राज्याने पंतप्रधान व सरदार-ए-रियासत (राज्यप्रमुख) नेमले होते. ईश्वराच्या कृपेने आम्ही ही दोन्ही पदे परत आणू.
1965 मध्ये ही दोन पदे रद्द करून त्याऐवजी मुख्यमंत्री व राज्यपाल अशा नियुक्त्या होण्यास प्रारंभ झाला. आता हा संदर्भ आणखी न वाढविता आपण उमरच्या प्रतिआक्रमणाकडे वळूयात. उमर म्हणाला की, ज्या प्रकरणातले कळते त्याचेच ट्वीट गंभीरने करावे. जसे मी फारसे क्रिकेट कधी खेळलो नाही, कारण त्यात मला फारशी गती नसल्याचे मला माहित होते. गंभीर, तुला सुद्धा जम्मू-काश्मीरच्या इतिहासाविषयी, तो घडविण्यासाठी जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने बजावलेल्या भूमिकेविषयी फारशी माहिती नाही, तरिही तू हटवादीपणे हे अज्ञान आम्हा सर्वांसमोर उघड करण्याच्या हट्टाला पेटला आहेस. तुला जे कळते त्याच विषयाला चिकटून रहा आणि आयपीएलबद्दल ट्वीट कर.

उमरच्या या प्रत्युत्तरामुळे चांगलाच बीट झाल्यावर गप्प बसेल तो गंभीर कसला. लागलीच पॅड बांधून तो खेळपट्टीवर उतरला. तो म्हणाला की, क्रिकेटविषयक ज्ञानाचा अभाव असल्याबद्दल फारसे मनावर घेऊ नकोस, पण जर तुला निःस्वार्थी कारभाराबाबत एक-दोन गोष्टी माहिती असल्या असत्या तर काश्मीरी जनतेची आणि आपल्या देशाची चांगली सेवा झाली असती.

गंभीरच्या ट्वीटनंतर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी या टीवटीवात उडी घेतली. त्या म्हणाल्या की, काश्मीरला वेदना देऊ नका. तुला जे कळते तेच कर म्हणजे हॉटेल रीपेप्शनीस्टचे काम.
उमरने या ट्वीटचाही समाचार घेतला. हे लोक मग्रुर आहेत, पण त्यांच्या नेत्यांनी शून्यातून सुरवात केल्याच्या नुसत्या बढाया मारतात. मी छोट्याशा नोकरीतून सुरवात केली म्हणून लाज बाळगावी असे त्यांना अपेक्षित आहे, पण कोणतेही काम प्रामाणिकपणे करण्यात स्वाभीमान असतो. मला सुद्धा ज्या परिस्थितीत सुरवात केली त्याचा अभिमानच वाटतो.

राजकीय संदर्भात तसेच उमरच्या मागणीविषयी काहीही भाष्य न करता आपण या विषयाची चर्चा करूयात. उमरने गंभीर आणि नुपूर यांना चांगलेच वाजविले असे म्हणता येईल. यातील नुपूर ताईंविषयी आपण आणखी न बोलता गंभीरकडे वळूयात. गंभीर हा डावखुरा सलामीवीर होता, पण म्हणून त्याने राजकारणात उडी घेतल्यावर असे सलमीला येत वाम मार्गी शॉट मारू नयेत.

काश्मीरविषयी उमर व त्याचे कुटुंब जी काही भूमिका घेईल त्याविषयी काय पवित्रा घ्यायचा हे ठरविण्यास तेथील जनता आणि केंद्र सरकार समर्थ आहे. मुख्य म्हणजे त्यांना प्रत्यूत्तर द्यायचे झालेच तर भारतीय जनता पक्षाकडे अधिकृत प्रवक्ता आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, दिल्लीकर अससलेले केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली अशी मंडळी समर्थ आहेत. या मंडळींनी क्रिकेटच्याच भाषेत सांगायचे झाले तर अगदी डाव्या हाताने (म्हणजे ते मुळचे उजवे असल्यामुळे) बॅटींग केली तरी ते उमरविरुद्ध नॉटआऊट राहतील. त्यामुळे गंभीरला पॅड बांधून मैदानावर उतरण्याची गरजच पडणार नाही.
मुख्य म्हणजे गंभीरने राजकीय विषयावर भाष्य करताना पाकिस्तान, हिरवा रंग, डुक्कर असे शब्दप्रयोग सावधपणे वापरावेत. त्यापूर्वी विचार करावा. अन्यथा तो असाच बीट होत राहील. 

Web Title: Gautam Gambhir gets trolled by Omar Abdullah