हिशेब चुकते अन्‌ लगानही वसूल

Cricket
Cricket

मुंबई- विराट सेनेने मुंबईत इंग्लंडविरुद्धच्या अपयशाचा इतिहास अखेर दिमाखात बदलला. चौथ्या दिवशी विजयाचे नगारे वाजवणाऱ्या या भारतीय सेनेने पाचव्या दिवशी अर्ध्या तासातच इंग्लंडचा खेळ खल्लास करून मालिका विजयाचा ढोल वाजवला. भारताने सोमवारी एक डाव आणि 36 धावांनी चौथी क्रिकेट कसोटी जिंकून मोहीम फत्ते केली. त्याचबरोबर मालिकेतील 3-0 अशा विजयी आघाडीसह लगान वसूल केला.


वानखेडे स्टेडियमवरच ऍलिस्टर कुकच्या इंग्लंड संघाने चार वर्षांपूर्वी धोनीच्या धुरंधरांना पराभवाची चव चाखायला लावली होती. त्या वेळी भारताने प्रदीर्घ कालावधीनंतर मायदेशातील मालिका गमावली होती. आज विराट सेनेने त्याच कुकच्या संघाला वानखेडेवरच पराभवाचे पाणी पाजले आणि वानखेडेवरील इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन (2006, 2012) पराभवाचे हिशेबही चुकते केले.


आघाडीवर राहून लढणारा कर्णधार तसेच कसोटी क्रमवारीत संघाला अव्वल स्थानी नेणारा विराट कोहली सामनावीरही ठरला. या विजयाने भारताने सलग पाचवी मालिका (दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि आत्ता इंग्लंड) जिंकली आहे.
अखेरच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचे तळाचे फलंदाज किती तग धरतात, यावर भारताचा डावाचा विजय अवलंबून होता; पण उरलेले चार फलंदाज बाद करण्यासाठी 48 चेंडू पुरेसे ठरले. आज सकाळी खेळ सुरू झाल्या झाल्या अश्‍विनने बेअरस्टॉला बाद केले आणि तेथेच भारताच्या विजयासाठीची औपचारिकता शिल्लक राहिली. अश्‍विनची लय चौथ्या दिवशी काहीशी बिघडली होती; पण पाचव्या दिवशी त्याने पुन्हा करिष्मा दाखवला आणि सहा बळी मिळवण्याची कामगिरी केली.

विजयी फेरी
वानखेडेवरील मुंबईकर प्रेक्षकांवर विराट भलताच खूष होता. त्याने सामना संपल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभारही मानले. आज खेळ किती वेळ चालेल, याचा नेम नसतानाही किमान सात ते आठ हजारांच्या संख्येने प्रेक्षक सकाळी 9.30 वाजताच हजर होते. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रोत्साहन मिळत गेले, असे त्याने आवर्जून सांगितले. केवळ आभाराच्या शब्दांवर तो थांबला नाही, तर विजय मिळताच संपूर्ण संघाला घेऊन त्याने स्टेडियमभर विजयी फेरी (व्हिक्‍टरी लॅप) मारली.

धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः 400
भारत पहिला डाव ः 631


इंग्लंड, दुसरा डाव ः ऍलिस्टर कुक पायचीत गो. जडेजा 18, केटॉन जेनिंग्स पायचीत गो. भुवनेश्‍वर कुमार 0, ज्यो रूट पायचीत गो. जयंत 77, मोईन अली झे. विजय गो. जडेजा 0, जॉनी बेअरस्टॉ पायचीत गो. अश्‍विन 51, बेन स्टोक्‍स झे. विजय गो. अश्‍विन 18, जेक बॉल झे. पटेल गो. अश्‍विन 2, ज्योस बटलर नाबाद 6, ख्रिस वोक्‍स त्रि. गो. अश्‍विन 0, अदिल रशिद झे. राहुल गो. अश्‍विन 2, जेम्स अँडरसन झे. उमेश गो. अश्‍विन 2, अवांतर ः 19, एकूण ः 55.3 षटकांत सर्वबाद 195.

बाद क्रम ः 1-1, 2-43, 3-49, 4-141, 5-180, 6-182, 7-185, 8-189, 9-193.
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार 4-1-11-1, उमेश यादव 3-0-10-0, रवींद्र जडेजा 22-3-63-2, आर. अश्‍विन 20.3-3-55-6, जयंत यादव 6-0-39-1.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com