ब्रिटीश कसोटी संघाचा नवा कर्णधार जो रुट

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

आमच्या संघामधील गुणवत्तेचा पुरेपुर फायदा करुन घेत, ऍलेस्टर याने मिळविलेल्या यशाच्या पायाभरणीवर आता पुढे प्रगती करावयाची आहे. मला मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी संघामध्ये वरिष्ठ खेळाडू आहेत, ही अत्यंत आश्‍वासक बाब आहे

लंडन - इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन ऍलेस्टर कुक पायउतार झाल्यानंतर आता यॉर्कशायरचा शैलीदार फलंदाज जो रुट याच्याकडे ब्रिटीश संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणारा रुट हा 80 वा कर्णधार असणार आहे. याचबरोबर, रुट याच्याकडे असलेली उपकर्णधारपदाची जबाबदारी आता अष्टपैलु खेळाडू बेन स्टोक्‍स याच्याकडे सोपविण्यात आली आहे.

"कसोटी संघाचे कर्णधारपद मिळणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. मला अतिशय आनंद झाला आहे. ब्रिटीश संघामध्ये अत्यंत चांगले खेळाडू आहेत. आमच्या संघामधील गुणवत्तेचा पुरेपुर फायदा करुन घेत, ऍलेस्टर याने मिळविलेल्या यशाच्या पायाभरणीवर आता पुढे प्रगती करावयाची आहे. मला मदत करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी संघामध्ये वरिष्ठ खेळाडू आहेत, ही अत्यंत आश्‍वासक बाब आहे,'' असे रुट याने म्हटले आहे.

""इंग्लंडचा कसोटी कर्णधार होण्यासाठी रुट हा सुयोग्य उमेदवार आहे. त्याने ही जबाबदारी स्वीकारली, याचा मला आनंद आहे,'' अशी भावना इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अँड्रयु स्ट्रॉस यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Joe Root is England's new Test captain