भारतीय गोलंदाजांना रूटचा प्रतिकार 

सुनंदन लेले 
Sunday, 2 September 2018

साउदम्पटन : कर्णधार रूटच्या 48 धावांच्या खंबीर खेळीमुळे इंग्लंड संघाची दुसऱ्या डावातील आघाडीची मुळे थोडीशी रुजायला मदत झाली. बाकी इंग्लिश फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजीला बिचकून तोंड देत असताना रूटने चांगली फलंदाजी करून दुसऱ्या डावातील आघाडीची संख्या 125 वर नेली. रूट धावबाद झाला तरीही तिसऱ्या दिवशी चहापानाला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने 5 बाद 152 अशी मजल मारली होती. 

तिसऱ्या दिवशी पहिला गडी बाद करायला भारतीय गोलंदाजांना किंचित वेळ लागला. कुक-जेनिंग्ज जोडीने पहिला अर्धा तास सावध खेळ केला. बुमराने कुकला बाहेर जात असलेल्या चेंडूवर झेल द्यायला भाग पाडले. कुकपाठोपाठ राहुलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची बढती मिळालेल्या मोईनचा झेल जमिनीलगत पकडला. 

रूटला सुरवातीला खेळणे कठीण गेले. नजर बसल्यावर रूटने मोकळ्या जागेत चेंडू मारून धावफलक हलता ठेवला. दोन तास कसाबसा तग धरलेला जेनिंग्ज उपहाराअगोदर शमीला बाद झाला. पहिल्या दोन तासांत भारताला तीन फलंदाजांना बाद करता आले होते. दुपारच्या सत्राची सुरवात भारताकरिता भन्नाट झाली. शमीने जॉनी बेअरस्टॉचा स्टंप पहिल्याच चेंडूवर उधळून लावला. दडपण वाढत असताना रूटने केलेली फलंदाजी लक्षणीय होती. 

रूटला स्टोक्‍सने चांगली साथ दिली. एक तास दोघांनी चांगली फलंदाजी केली. 48 धावांवर खेळणारा रूट भारताकरिता पायात सलणारा काटा ठरू बघत असताना नाट्य घडले. स्टोक्‍सने चेंडू शमीकडे मारून चोरटी एकेरी धाव पळायला लागला. रूट धाव पळण्याबाबत साशंक होता. शमीने चेंडू अचूक स्टंपवर मारून रूटला मालिकेत दुसऱ्यांदा धावबाद केले. भारतीय संघाला अपेक्षेपेक्षा जास्त यश न मिळायला अश्विनची धार नसलेली गोलंदाजी कारण ठरली. डावखुऱ्या फलंदाजांना अश्विन जास्त अडचणीत टाकू शकला नाही. खेळपट्टी थोडी साथ फिरकीला देत असून, आणि 21 षटके टाकूनही अश्विनला एकही बळी घेता आला नाही. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Root resistance to Indian bowlers