आषाढी वारीत यंदा संविधानाचा जागर - धनंजय मुंडे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा : आळंदी ते पंढरपूर संविधान दिंडी
Ashadi Wari 2022 Palkhi of Saint Dnyaneshwar Maharaj Alandi to Pandharpur Constitution Dindi Dhananjay Munde
Ashadi Wari 2022 Palkhi of Saint Dnyaneshwar Maharaj Alandi to Pandharpur Constitution Dindi Dhananjay Mundesakal

पुणे : आषाढी वारीत यंदा संविधानाचा जागर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी (ता.२०) केली. यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्यावेळी पालखीसोबतच आळंदी ते पंढरपूर अशी संविधान दिंडी काढण्यात येणार आहे. या संविधान दिंडीची सुरवात येत्या मंगळवारी (ता.२१) येथून केली जाणार आहे. या दिंडीच्या माध्यमातून पालखी मार्गावर संविधानिक मूल्यांचा जागर, भजन- कीर्तन, अभंग आदींचा गजर केला जाणार आहे. ही दिंडी येत्या १० जुलैला पंढरपूर येथे पोचणार आहे.

मंगळवारी (उद्या) दुपारी तीन वाजता आळंदी येथील चऱ्होली फाटा येथे या दिंडीचा शुभारंभ केला जाणार आहे. या दिवशी सायंकाळी संविधान जलसा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिर येथील मुक्कामात राज्यातील नामवंत विचारवंत, सांस्कृतिक कलावंत, भजनी मंडळ आदींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. येत्या गुरुवारी (ता.२३) नाना पेठेतील पालखी मुक्काम स्थळाजवळ संविधान जलसा हा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह ज्येष्ठ चित्रपट कलाकार नसिरुद्दीन शहा, नीलेश नवलाखा, शबाना आझमी, नागराज मंजुळे, रत्नाकर पाठक, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित राहणार आहेत.

या दिंडीच्या माध्यमातून वारीच्या वाटेवर ठिकठिकाणी संविधान जलसा, संविधानावर व संविधानातील मूल्यांवर आधारित प्रवचने, कीर्तने, सप्तखंजिरी कीर्तन, संविधान उद्देशिका वाचन व वाटप, अभंग व कीर्तनाच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबाबत जागृती,संविधानातील हक्क व कर्तव्ये, संविधानाचे विविध परिशिष्टे, कलमे आदींचे सादरीकरण, दृकश्राव्य माध्यमातून लोकसंवाद, वृक्षारोपण, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या माहितीच्या घडी पत्रिकांचे वाटप केले जाणार असल्याचे बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले.

देशाचे संविधानदेखील आपल्या संतांनी दिलेल्या समता, बंधुभाव व सामाजिक न्याय या मुलतत्वांवर आधारित आहे. आजच्या पिढीला आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, देशाचे नागरिक हे जबाबदार असावेत, या उद्देशाने लाखो भाविकांच्या 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' या जयघोषाच्या निनादात निघणाऱ्या पालखी सोहळ्यात यावर्षी संविधान दिंडी आयोजित करण्यात येत आहे. पालखीच्या या संपूर्ण प्रवासात हरिनाम घोषासह संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्याचा प्रयत्न आहे.

- धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com