Bhagawat Geeta : इश्वराची कृपा हवी असेल तर त्याची l Bhagawat Geeta gita lord krishna spiritual guidance lifeline | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagavat Geeta

Bhagawat Geeta : इश्वराची कृपा हवी असेल तर त्याची...

श्रुती आपटे

मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।

मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः।।

माझ्या ठिकाणी मन ठेव. माझाच भक्त हो, माझेच भजन कर, मलाच नमस्कार कर. याप्रमाणे मत्परायण होऊन तू अशाप्रकारे स्वतःला माझ्याशी जोडून राहिलास तर मलाच येऊन पोचशील.

श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला काही वचने दिली आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे वचन आहे, ‘न मे भक्त: प्रणश्यति।’ म्हणजे माझ्या भक्ताचा कधीच नाश होत नाही. श्रीकृष्ण म्हणतो, ‘मी सर्वच प्राणिमात्रांना समदृष्टीने पाहतो. मला कोणी नावडता नसतो किंवा आवडतही नसतो. सर्वच जण मला सारखे आहेत, पण जो मला तळमळीने हाक मारतो, माझे भजन पूजन करतो, माझी भक्ती करतो तो माझ्यात असतो आणि मी त्याच्यात असतो.

आम्ही एकरूप असतो. आरशासमोर आपण उभे राहिलो तरच आपले प्रतिबिंब आरसा आपल्याला दाखवतो. दिव्याच्या जवळ असेल तरच दिव्याचा प्रकाश आपल्याला मिळतो, तसे ईश्वराची कृपा हवी असल्यास त्याच्याजवळ आपणच जायला पाहिजे. एखादा दुष्ट दुराचारी माझी अनन्य भावाने भक्ती करू लागला, तर तोसुद्धा साधू होऊ शकतो.

कारण भक्तीत लीन झाल्यामुळे पूर्वी केलेल्या वाईट कृत्यांचा त्याला पश्चात्ताप होऊन माझ्या भक्तीने त्याचे मन शुद्ध निर्मळ होऊन जाते. आणि त्याचे आचरण सुधारते. तो धर्मात्मा होऊन चिरशांती प्राप्त करू शकतो. अर्जुना, माझा कोणताच भक्त नाश पावत नाही. धनवान, दरिद्री, विद्वान अडाणी लहान, मोठा, पुण्यवान, पापी सर्वजण माझ्या भक्तीच्या सामर्थ्याने उत्तम गती प्राप्त करू शकतात.

अर्जुना, हा मृत्युलोक जिथे तू आत्ता आहेस, तो अनित्य, नाशवंत आणि दुःखमय आहे. म्हणून, इथे राहून शाश्वत सुख मिळवायचे असेल, तर तुझे मन माझ्या मनात मिसळून जाऊ देत. माझाच भक्त हो. माझेच भजन कर. मलाच नमस्कार करून शरण ये‌. मग तू आणि मी भिन्न राहणारच नाही. मी तुला पुन्हा वचन देतो तू मला अतिशय प्रिय आहेस. हीच राजविद्या, हाच राजगुह्ययोग..

टॅग्स :Lord Krishna