कसमादे पट्ट्यासह खान्देशात आजपासून चक्रपूजेला प्रारंभ

Chakrapuja
Chakrapujaesakal

नरकोळ (जि. नाशिक) : पुरातन काळापासून सुरू असलेली नवरात्रोत्सवातील चक्रपूजा खान्देशसह कसमादे पट्ट्यात रविवार (ता. १०) पासून उत्साहात सुरू होणार आहे. या वेळी घरांघरातून ‘अग्या हो, तिसर अग्या हो’चा गजर कानी पडणार आहे. नवरात्रोत्सवातील पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला ही पूजा गावोगावी केली जाते.

संत - महंतांपासूनची प्रथा आजच्या धावपळीच्या युगातही रूढ

नवरात्रोत्सवात आपापल्या कुलदैवत देवीची पूजा मानून चक्रपूजा करण्याची प्रथा आहे. ही खर्चिक बाब असल्यामुळे दर एक वर्षाआड किंवा तिसऱ्या वर्षी पारंपरिक पद्धतीने कुटुंबांकडून चक्रपूजा करण्यात येते. दिवाळी, अक्षय्य तृतीया, दसरा या सणांप्रमाणेच चक्रपूजेला महत्व आहे. कुलदेवतेचे आगमन, आराधना, भक्ती व शक्तीची उपासना ही पूजा असल्याचे मानले जाते. अनेक कुटुंब नवरात्रोत्सवात प्रत्यक्ष सप्तशृंगगडावर जाऊन प्रथम चक्र भरतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून आपल्या घरातील घटस्थापनेजवळ चक्र भरतात. संत - महंतांपासून सुरू असलेली ही प्रथा आजच्या धावपळीच्या युगातही रूढ होत आहे. मोठ्या श्रद्धेने पाळल्या जाणाऱ्या चक्रपुजेतील होमहवनला महत्व आहे. काही कुळांमध्ये ही चक्रपुजा नरकचतुर्थी म्हणून साजरी करतात.

Chakrapuja
नवरात्रोत्सवातील उपासना कशी करावी? जाणून घ्या सविस्तर

अशी केले जाते पूजा...

चक्रपुजेसाठी पाच अथवा अकरा ओंजळ तांदूळ, अकरा कणकेचे दिवे, पेरू, सीताफळ, आंबे, चाफा, रामफळ, कापूर, उडीद, गुलाल, समीधा, पाच नारळ या साहित्याबरोबरच अकरा पुरणपोळ्या, पुऱ्या, करंजा आदी साहित्य लागते. चक्रपूजा ही घटस्थापनेच्या ठिकाणी केली जाते. गोमुत्र टाकून जागा सारवली जाते. त्यावर रांगोळी काढली जाते. या जागेवर चाफ्याची पाने ठेवून कापूर प्रज्वलित केला जातो. तांदळाच्या राशीचे सात चक्र गोलाकार बनविण्यात येतात. यात गोलाकार एक चक्र पांढरे, तर दुसरे चक्र रंगीत तांदळाचे अशी सात चक्र कुटुंबप्रमुखाकडून काढण्यात येतात. या पुजेसाठी पाच व्यक्ती समोरासमोर बसतात. चक्राच्या चारही दिशेला दरवाजे तयार केले जातात. या दरवाजांजवळ तांदूळ, राख, मीठ, उडीद यांचे चार मारुती तयार केले जातात. अकरा कणकेचे दिवे चक्रावर ठेवले जातात. एक प्रमुख दिवा तयार करण्यात येतो. त्यास मेंढ्या म्हणून संबोधण्यात येते. चक्रपूजेच्या मुख्य जागी अकरा मांडे गोलाकार ठेवून त्यावर दिवे ठेवण्यात येतात. घरात तेवत असलेल्या अखंड वातेवरून दिवे पेटवले जातात. या ठिकाणी पूजा साहित्य अर्पण करून चक्रपूजा विधी होतो. नंतर देवीची आरती होऊन प्रसाद ग्रहण केला जातो.

Chakrapuja
राज्यातील एकमेव बैठक अवस्थेतील नाशिकमधील 'कालिकादेवी'

आमंत्रित पाहुण्यांना दिले जाते भोजन

होम पेटवून विधिवत पूजा होऊन नवसपूर्ती करण्यात येते. होमाला तुपाची आहुती देतात. सर्व घर अकरा दिव्यांच्या तसेच, होमाच्या प्रकाशाने उजळून निघते. सर्व आमंत्रित पाहुणे चक्रापुढे नतमस्तक होतात. यानिमित्ताने नातेवाईक, भाऊबंद एकत्र येतात. सप्तश्रृंगी मातेचा गजर घराघरात होतो. लखलखीत प्रकाशात आमंत्रित पाहुणे भोजनाचा आस्वाद घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com