Yearly Horoscope
Yearly Horoscope sakal

वार्षिक राशिभविष्य | मकर - अडचणी येतील; मार्गही निघेल

कष्ट व दुःख म्हणजे काय? सुख म्हणजे काय, ते कसे मिळवावे? आपल्या अविरत कष्टाच्या जोरावर मालकाचे मन कसे जिंकावे? त्याला ताब्यात कसे ठेवावे? राजकारण म्हणजे काय, ते कसे करावे? तसेच आपण नामानिराळे कसे राहावे? याचे उत्तम ज्ञान देणारी अशी ही मकर रास आहे. सतत काम करीत राहणे, हा त्यांचा स्थायी गुण म्हणता येईल; पण जे काम करतील, ते मात्र अतिशय चांगले आणि दीर्घकाळ टिकणारे असते. या राशीतील एका नक्षत्राच्या व्यक्तीने शाप दिल्यास तो खरा ठरतो, असा अनुभव आहे.

व्यवहारचतुर स्वभाव, सोशिकपणा आणि हाती घेतलेले काम चांगल्या मार्गाने कसे पूर्ण करावे, इच्छाशक्ती व आत्मसंयम कसा असावा, चिकाटी व योग्य धोरण कसे आखावे, त्याचा व्यवहारात कसा उपयोग करावा, कुणाला कसे हाताळावे, हे शिकविणारी रास आहे. सर्व प्रकारच्या लोखंडी वस्तूंवर या राशीचा अंमल असतो. विष्णूचा शाप, तसेच त्रिपाद व पंचक नक्षत्र याच राशीत येते. शनी, रवी, मंगळ व चंद्र अशा परस्परविरोधी तत्त्वांच्या ग्रहांची मालकी असलेली ही रास आहे. त्यामुळे या सर्वांचे बेमिसाल गुणधर्म या राशीत दिसून येतात. त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर हास्य हा प्रकार जवळजवळ नसतोच. यावर्षीचे ग्रहमान या राशीला कसे असेल, त्याचा थोडक्यात आढावा पुढे घेतलेला आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक ग्रहमानानुसार त्याचा कमी-जास्त प्रमाणात अनुभव येऊ शकतो.

यावर्षी शनी स्वतःच्या राशीतच आहे. जरी साडेसाती असली, तरी तो काहीही वाईट करणार नाही. मात्र, कोणते काम वेळेवर होऊ देणार नाही. माणसाचे कर्म हे शनीवरून पाहिले जाते. त्यामुळे आपले कर्म कसे असेल, त्यानुसार शनी फळ देत असतो. कोणतीही मोठी व दीर्घकाळ टिकणारी कामे यावर्षी करून घ्यावीत. उत्कृष्ट कार्यक्षमता असल्याने कितीही अडचणी आल्या, तरी त्यातून निश्चितच मार्ग काढू शकाल. काही बाबतीत इतर लोकही आपल्यापेक्षा हुशार असतात, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विवाह, नोकरी-व्यवसाय, प्रवास, महत्त्वाची कार्ये, उंचावरील फ्लॅट घेणे, विमानप्रवास, जलप्रवास आदींसाठी हे वर्ष अनुकूल आहे. ज्या महिन्यात रवी, मंगळ शनीच्या सान्निध्यात येतील, त्या-त्या वेळी शारीरिक त्रास जाणवतील. ग्रहांची ही भ्रमण गाथा कोणत्याही पंचांगात पाहता येईल.

अनेक वर्षांपासून चतुर्थात ठाण मांडून असलेला हर्षल यंदाही तिथेच आहे. जन्मगाव सोडून दूर गेल्यास व्यवसाय जोरात चालेल. काही राजकारणामुळे वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यात अडचणी येतील. जगावेगळे काहीतरी करून दाखवावे, अशी ऊर्मी निर्माण होईल. नेपच्यून धनस्थानी आहे. द्रव पदार्थांचे व्यवसाय आणि व्यवहारात फायदा होईल. कोणतेही अवघड शिक्षण घेण्यास अनुकूल काळ; पण कुठेही गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. अचानक नुकसान होऊ शकते. येत्या मार्चपर्यंत राहू पंचमात राहील. व्यापार-उद्योग, सट्टा वगैरे प्रकरणात लाभ होतील. शिक्षणात मनाविरुद्ध दुसरा कोर्स निवडावा लागेल. संततीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. तापट व संतापी स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा हा राहू दुसरेच काहीतरी करून बसेल. हा राहू घराण्यातील पूर्वज दोष दर्शवित असल्याने प्रत्येक कामात अडथळे जाणवतील. फोटोग्राफी, चित्रकला, पेंटिंग, कलाकौशल्याची कामे, अभियांत्रिकी वगैरे क्षेत्रातील व्यक्तींना चांगले अनुभव येतील. मार्चनंतर चतुर्थात येणारा राहूही विशेष चांगला नाही. घरदार बंगले किंवा फ्लॅट वगैरे खरेदी करताना ती जागा दूषित किंवा शापित नसेल, हे पाहून घ्यावे.

एप्रिलपर्यंत गुरू धनस्थानी आहे. कोणतेही आर्थिक व्यवहार या काळात करून घ्यावेत, यश मिळेल. दुकान, फ्लॅट, जागा खरेदी-विक्री, नवीन व्यवसायाचा प्रारंभ करण्यास हरकत नाही. चांगले यश मिळेल. त्यानंतर पराक्रमात येणारा गुरू प्रवास, धंदा, भाग्योदय, मंगलकार्य, पत्रव्यवहार, महत्त्वाच्या कामासाठी वाटाघाटी यास अनुकूल आहे. वैवाहिक जीवनातील ताण-तणावही कमी होऊ लागतील. पूर्वी जर कुठे एखादा व्यवहार केला असेल, त्याचे पैसे अडकले असतील, तर ते वसूल करण्यासाठी प्रयत्न करा. थोडे चातुर्य दाखवावे लागेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण करील. केमिकल, विषारी औषधे आणि प्राणघातक शस्त्रास्त्रे यापासून जपावे लागेल. हे वर्ष सर्वच बाबतीत संमिश्र आणि मध्यम फळ देणारे आहे.

मासिक फलाफल

  • जानेवारी - या राशीतील सर्वच नक्षत्रांना यावर्षीच्या संक्रांतीचे फळ शुभ दिलेले नाही. त्यामुळे कोणतेही काम विचारपूर्वक करा म्हणजे अडचणी येणार नाहीत. मंगळ-शुक्रचा योग परस्परातील शारीरिक आकर्षण वाढविणारा असल्याने तरुणवर्गाने सावध राहावे. प्रेमाच्या भरात कोणत्याही आणाभाका घेऊ नयेत, अन्यथा ते पुढे महागात पडू शकते.

  • फेब्रुवारी - हा ग्रह तुमच्या राशीत आहे. रामायण-महाभारत घडविणारा हा योग मानला जातो. त्यामुळे कोणतेही काम अत्यंत जपून व मन शांत ठेवून करावे. किरकोळ चुकाही धोकादायक होऊ शकतात; पण तुमच्या तडफदार वृत्तीमुळे इतर लोक मात्र वचकून राहतील.

  • मार्च - हा महिना जरा कटकटी वाढविणारा आहे. शनी-मंगळ अपघातदर्शक आहेत. त्यामुळे वाहन चालविताना अथवा घरातील कामे करताना बेफिकीर राहू नका. तसेच, कितीही कटू प्रसंग आले तरी मन शांत ठेवून निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत महिना उत्तम आहे.

  • एप्रिल - महापद्म कालसर्प योगाचा प्रभाव सुरू होत आहे. प्रेम प्रकरणात अपयश, दाम्पत्य जीवनात अडचणी, मनातील निराशा भावना वाढणे व न्यूनगंडाचा प्रसार, अशा गोष्टी या योगावर घडतात. या कालखंडात नवग्रह स्तोत्र वाचन करावे म्हणजे कोणताही त्रास होणार नाही. जागाविषयक, सरकारी काम अडले असेल तर ते मात्र या महिन्यात होऊ शकते.

  • मे - या महिन्यात मंगळ-गुरू सहकार्य सर्व बाबतीत मोठे यश मिळवून देईल. शुक्र, राहू, हर्षल यामुळे कुटुंबातील काही गुप्त गोष्टी उघड होतील. रवी-बुधाचे सहकार्य एखादी मनोकामना पूर्ण करण्यास अनुकूल आहे. घशाचे विकार किंवा जागतिक सांसर्गिक रोग यापासून जपावे लागेल.

  • जून - सर्व कामांत मनासारखे अपेक्षित यश देणारा महिना आहे. बुध-शुक्र अतिउत्तम. त्यामुळे आर्थिक कामे होतील. जिथे जाल, तिथे मानसन्मान मिळेल. एखाद्या शेजारी व्यक्तीमुळे महत्त्वाच्या गोष्टी समजतील. राहू, मंगळ, हर्षलचा योग स्फोटक पदार्थांपासून धोका दर्शवित आहे. घरात जर ब्रह्मचार्याचा दोष असेल, त्याचे शापित परिणाम जाणवतील. त्यासाठी योग्य ती आराधना सुरू ठेवा.

  • जुलै - रवी-शनीचा प्रतीयोग आरोग्याच्या तक्रारी निर्माण करील. कोर्ट प्रकरणाचा निकाल विरुद्ध जाण्याची शक्यता दिसते. त्यासाठी कागदपत्र व साक्षीपुरावे योग्य ठेवा. कोर्ट प्रकरणे हाताळणाऱ्यांना योग्य त्या सूचना द्या. कुठेही बाहेर जाताना कुटुंबीयांना सांगून जा. आर्थिक व्यवहारात गाफील राहू नका. आपले असो किंवा लोकांचे वाहन जपून चालवा.

  • ऑगस्ट - अनेक बाबतीत मोठे यश देणारे ग्रहमान आहे. थोडेसे चातुर्य कष्ट, बोलण्यात माधुर्य आणि योग्य नियोजन यांचा समन्वय साधून कामे केल्यास ‘न भूतो- न भविष्यती’ असे मोठे यश मिळेल. राजकारणाची आवड असेल तर संधी मिळेल. समाजकारणात काही नवीन कामे करावी लागतील.

  • सप्टेंबर - काही वेळा विनासायास अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळते. ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’ असे सुंदर ग्रहमान आहे. कोणतेही काम अर्धवट राहणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मंगळ-शनीचा शुभ योग शत्रूपिडा नष्ट करील. तसेच, अंगीकृत कार्यात येणाऱ्या सर्व अडचणी आपोआप दूर करील.

  • ऑक्टोबर - महत्त्वाच्या केंद्र स्थानात रवी, गुरू, शुक्र, केतू आणि लग्न शनी हा एक प्रकारचा श्रेष्ठ योग मानला जातो. अशा योगावर कल्पनातीत यश मिळते. केलेल्या कष्टाचे चीज होईल. कायमस्वरूपी टिकणारी कोणतीही कामे करून घ्यावीत.

  • नोव्हेंबर - उद्योग-व्यवसाय व नोकरीत जरा सावध राहावे लागेल. कारण, रवी-केतू योगावर मालकवर्गाच्या मनात केव्हा काय येईल, काहीच सांगता येणार नाही. तुमच्याजवळ कामाची जी काही क्षमता अथवा आयडिया असेल, ती कुणालाही सांगू नका.

  • डिसेंबर - आपण कितीही हुशार असलो, तरी सर्वच गोष्टी मीच करेन, असे म्हणू शकत नाही, हे लक्षात ठेवून या महिन्यात काहीही समस्या उद्‍भवल्यास चारचौघांचा सल्ला अवश्य घ्या. त्यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा मिळेल व पुढील कामाची यशस्वी रूपरेषा दाखविता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com