वार्षिक राशिभविष्य | वृषभ - काळ उत्कर्षाचा; प्रतिष्ठेलाही जपा

yearly horoscope 2022
yearly horoscope 2022 sakal

समाजात बोलावे कसे, वागावे कसे? त्याचा व्यवहारात कसा उपयोग करून घ्यावा? पैसा कसा कमवावा व राखून ठेवावा, हे शिकवणारी ही वृषभ रास आहे. कितीही अडचणी आल्या, तरी हाती घेतलेले काम पूर्ण करणारच, ही यांची जिद्द असते. कार्यक्षमतेचा जिता जागता नमुना म्हणजे वृषभ रास. कोणतेही महत्त्वाचे काम यांच्यावर सोपवावे. शत्रूने जरी एखादं काम यांच्यावर सोपविल्यास ते करून दाखवतील, हा या राशीचा खास गुण आहे. स्पष्टवक्तेपणा असल्याने जे काय असेल ते समोर बोलतील, पण मागे एखाद्या गोष्टीचे कौतुकही करतील. मात्र, मागून टीका करणार नाहीत.

वृषभ राशीचे अंतरंग समजून घेतल्यास त्यांच्यासारखी जीवाला जीव देणारी माणसे शोधूनही मिळणार नाहीत. मात्र, एकदा मनातून काढून टाकल्यास समोर एखादी व्यक्ती जरी तडफडून पडली तरी ढुंकूनही पाहणार नाहीत. पांढरा रंग या राशीला अत्यंत शुभ असतो. अग्नेय दिशा लाभदायक असते. कोणत्याही घराचा वास्तूपुरुष या राशीवर बेहद्द खूश असतो. नव्या वर्षातील ग्रहमालेची स्थिती आपले काय अंतरंग दाखविते, त्याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक ग्रहमानानुसार त्याचे कमी-जास्त अनुभव येऊ शकतात.

यावर्षी गुरू दशमात राहणार असून, १३ एप्रिलपर्यंत तिथे तो राहील. हा एक प्रकारचा राजयोग असून, सर्व कामांत तुम्हाला मोठे यश देईल. घरदार, जागा, वाहन, नोकरी-व्यवसाय, कर्जफेड, राजकारण इत्यादीत उत्तम यश मिळेल. जर योग्य मार्गांनी तुमचे प्रयत्न सुरू असतील, तर हा गुरू तुम्हाला फार मोठे यश देणार आहे. शिक्षण क्षेत्र, कारखानदारी, अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर तसेच मेकॅनिकल लाईन, अकाउंटन्सी, चार्टर्ड अकौंटंट यांच्याशी संबंध असेल तर जीवनाचे सोने होईल. विवाह कार्यास हा गुरु तितका अनुकूल नाही, पण वाटाघाटी करण्यास हरकत नाही. लहान-मोठे व्यवसाय असतील तर जोरात चालतील, पण कष्टाचे प्रमाणही वाढणार आहे. गुरु-शनी युती असल्याने तुमचे महत्त्व वाढेल. ज्या महिन्यात रवि-गुरु एकत्र येतील, त्या-त्या वेळी महत्त्वाची कामे होतील. तसेच, गुरु-मंगळ एकत्र येतील, त्या वेळी जरा प्रतिष्ठेला जपावे लागेल. एप्रिलनंतर गुरु अकराव्या स्थानी येईल. धनलाभ, मान-सन्मान, संतती लाभ, शिक्षणात यश, नोकरी-व्यवसायात उच्चपद, बढती, मनातील सर्व इच्छा पूर्ण होणे यादृष्टीने हा गुरू उत्तम फळे देणारा आहे. वर्षभर या गुरुची चांगली फळे मिळत राहतील. संततीमुळे तुमचा भाग्योदय होऊ शकतो. श्रीमंत आणि वजनदार मित्रमंडळी भेटतील. त्यांच्यामुळे तुमचा उत्कर्ष होईल. दीर्घकाळ रखडलेल्या आशा-आकांक्षा पूर्ण होतील.

जर बाहेरगावी नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी आल्यास ती जरुर स्वीकारा. नक्कीच फायदेशीर ठरेल. शेजारी नातेवाईक यांच्याशी संबंध म्हणावे तसे चांगले राहणार नाहीत. त्या दृष्टीने तुम्ही जरा जपून राहणे आवश्यक आहे. वारसाहक्काच्या मालमत्तेबाबत काहीतरी गडबड घोटाळा होऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे जपून हाताळा. कुठे काय सुरू आहे, त्याकडे विशेष लक्ष द्या. कोणी काहीतरी राजकारण करून तुमच्याकडून तुमची कमाई व मालमत्तेबाबत महत्त्वाची माहिती काढून घेतील किंवा कोऱ्या पेपरवर सह्या करण्यास सांगतील. बेसावध राहिल्यास नुकसान होईल, पण सावध राहिल्यास संकटातून वाचाल. जलसा सत्तेवर अधिराज्य गाजविणारा नेपच्यून वर्षभर दशम स्थानात राहणार आहे. गूढ विद्या आणि वैज्ञानिक क्षेत्रातून धनलाभ आणि नावलौकिक होईल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल, पण त्याचबरोबर फसवणूक, धूर्त व लबाड व्यक्ती यांच्यापासून तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे. या कालखंडात जर पाण्याशी संबंधित कोणतेही व्यवसाय केल्यास उत्तम चालेल. तसेच, वास्तूतील दोष काढण्यासाठी उदकशांतीचा प्रयोगही करून पाहा. कारण, त्यामुळे त्याचा अनुभव चांगला येईल. काही वेळा अचानक काही घडामोडी घडून राहत्या जागेपासून दूर राहावे लागेल.

राहू १६ मार्चपर्यंत तुमच्या राशीत व केतू सप्तमात राहील. मार्चपर्यंत तुम्हाला अत्यंत कसोटीचा काळ ठरणार आहे. काही बाबतीत राजयोगासारखी अत्यंत चांगली फळे मिळतील. कितीही कडक शत्रू असले, तरी त्यांचे काहीही चालणार नाही. काही शत्रू आपणहून दूर जातील. या कालखंडात आपण समाजकारण आणि राजकारण यात वागताना काळजी घ्यावी लागेल. संसारिक जीवन, कोर्ट मॅटर, भागीदारी या बाबतीत जरा अडचणी निर्माण होऊ शकतात. १६ मार्चनंतर राहू बाराव्या स्थानी आणि केतू सहाव्या स्थानी येत आहे. घराण्याचे नाव उज्ज्वल होईल, असे मोठे कार्य करून दाखवाल. चांगल्या लोकांच्या संगतीने आर्थिक भरभराट होईल. कोणताही धंदा, व्यवसाय, उद्योग असला तरी तो यशस्वी होईल. त्याचबरोबर बाधीत त्रास होत राहील. त्यामुळे, आपण काही बाबतीत संयम बाळगणे आवश्यक आहे. जिथे बाधा होण्याची शक्यता आहे, त्या जागा कटाक्षाने टाळाव्यात. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. इतर मार्गाने पैसा मिळविण्याच्या अनेक संधी येतील. आध्यात्मात असाल तर चांगले यश मिळवाल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याशी वारंवार कलह होत राहतील. परप्रांतीय गेल्यास आर्थिक स्थिती सुधारेल. काही जणांच्या प्रकरणात मध्यस्थी केल्याने नको ती संकटे ओढवून घ्याल.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - किरकोळ अपघात, गैरसमज, मानहानी, नोकरीत त्रास, वाढते खर्च यामुळे मानसिक स्थिती जरा दोलायमान राहील. यावर्षी संक्रांत आर्थिकदृष्ट्या वर्षभर चांगले फळ देत राहील. सरकारी नोकरदार मंडळींनी मात्र जपून राहावे.

  • फेब्रुवारी - अष्टमातील मंगळ-शुक्रामुळे प्रेम प्रकरण अथवा आवडत्या व्यक्तीसाठी बराच खर्च करावा लागेल. एखादे प्रेम प्रकरणही होऊ शकते. अनंत कालसर्प योगाचा प्रभाव सुरू आहे. त्यामुळे प्रतिष्ठा टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कितीही कटू प्रसंग आले, तरी वैवाहिक जीवनावर त्याचा प्रभाव पडू देऊ नका. काही बाबतीत हा महिना अतिशय दगदगीचा, पण तरीही फायदेशीर जाईल.

  • मार्च - भाग्यस्थानात मंगळ, बुध, शुक्र, शनि, प्लुटो असे पाच ग्रह असल्याने अतिदूरवरचे प्रवास जपून करावेत. प्रवासात ओळखी होऊन विवाह अथवा नोकरीसाठी त्याचा उपयोग करता येईल. प्रवासात किमती वस्तू अथवा व्यक्ती हरवण्याची दाट शक्यता आहे. जत्रा, यात्रा किंवा प्रचंड गर्दीची ठिकाणे टाळण्याचा प्रयत्न करा.

  • एप्रिल - लाभस्थानातील गुरु, शुक्राची युती म्हणजे राजयोगच. श्रीमंती, व्यवसायात उन्नती भाग्यवान, संतती, वाहन लाभ, जमिनी, घरे, वास्तू या दृष्टीने चांगली फळे देईल. काही कारणाने पूर्ण न झालेली कामे आपोआप होऊ लागतील. मानसिक समाधान लाभेल. जे काम हाती घ्याल, त्यात चांगले यश मिळवाल.

  • मे - या महिन्यात रवि, शनि, केंद्रयोग आणि मंगळ-गुरु युती काही बाबतीत अडचणी निर्माण करील. एखाद्याला चांगल्या मनाने मदत केली, तरी त्याचा वेगळाच अर्थ काढला जाईल. नोकरीत तुमचे काम कितीही चांगले असले, तरी काहीजण तुमच्याविषयी मत कलुषित करू शकतील. त्यामुळे तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे.

  • जून - या महिन्यात तुमच्या राशीतील बुध-शुक्र युती अनेक बाबतीत फायदेशीर आहे. मोठी कामे होतील. गुरुचे पाठबळ असल्याने विवाहासाठी अवश्य प्रयत्न करावेत, नक्की यश मिळेल. राहू, मंगळ, हर्षलचा योग धोकादायक आहे. अपघात, आजार, स्फोट, अचानक दुर्घटना वगैरे दृष्टीने आकस्मिक घटना घडू शकतात. कोणत्याही बाबतीत बेसावध राहू नका.

  • जुलै - ग्रहस्थिती बाधित आहे. हाती घेतलेले काम वेळेवर होईलच, याचा भरवसा नाही. कुणावरही अति विश्वास ठेवू नका. प्रसंगावधान ठेवून कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्या, म्हणजे नुकसान होणार नाही.

  • ऑगस्ट - बऱ्याच प्रमाणात आशादायक वातावरण आहे. कागदोपत्री व्यवहार यशस्वी होतील. बुधाचे उत्तम सहकार्य मिळेल. चंद्र-मंगळाचा शुभयोग लक्ष्मीकारक आहे. त्यामुळे आर्थिक विवंचना जाणवणार नाहीत. शनि-शुक्र प्रतियोग काही नाजूक प्रेमप्रकरणे निर्माण करील. कोणतेही सरकारी काम अडलेले असेल, तर या महिन्यात करून घ्या. काही त्रास न होता ती कामे होतील.

  • सप्टेंबर - सर्व कार्यास अनुकूल आणि पोषक वातावरण आहे. योग्य नियोजन, चातुर्य आणि कामाचे व्यावहारिक गणित तसेच समोरच्या व्यक्तीचे मनसुबे, त्यांच्या मनातील विचार या सर्वांचे समीकरण योग्य रीतीने साधल्यास सर्व क्षेत्रांत फार मोठे यश मिळेल. मनात जे काही आणाल ते जर शक्यतेच्या कोटीत असेल तर ते निश्चित होईल.

  • ऑक्टोबर - रवि, बुध, गुरु, शुक्र, केतू षष्ठ स्थानात. हा योग आरोग्याच्या बाबतीत चांगला नाही. किडनी विकार, शस्त्रक्रिया, कोर्ट प्रकरणात धोका, जवळच्या नातेवाइकांकडून ऐनवेळी दगाफटका किंवा अंग काढून घेणे असे काहीसे विचित्र अनुभव येऊ शकतात. मात्र, इतर बाबतीत त्याचा काही त्रास होणार नाही.

  • नोव्हेंबर - काही वेळ आपण ठरवतो एक आणि होते दुसरेच, अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या घटना या महिन्यात घडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. जर कुठे पैसे असतील, तर ते येऊ शकतील. मानसिक समाधान वाढेल, पण त्याचबरोबर कामाचा ताणतणावही वाढणार आहे.

  • डिसेंबर - सूचक स्वप्ने पडावीत अथवा मनात काही तरी हुरहूर लागावी. त्या घटना प्रत्यक्षात घडाव्यात. कधी न येणारी व्यक्ती अचानक घरी आल्याने काहीसा आनंद आणि काहीसा संशय निर्माण होईल. नोकरीच्या प्रयत्नात असाल तर हा महिना उत्तम आहे, पण तुमचे प्रयत्न मात्र योग्य दिशेने हवेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com