Diwali Festival : शुभ दीपावली ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival

दीपावली हा तेजाचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव, समृद्धीचा उत्सव

Diwali Festival : शुभ दीपावली !

दीपावली हा तेजाचा उत्सव, प्रकाशाचा उत्सव, समृद्धीचा उत्सव. तेजाचे महत्त्व सांगणारा जो श्र्लोक लहानपणापासून प्रत्येक भारतीयाला शिकवला जातो तो म्हणजे, "शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा । शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ॥" तिन्हीसांजेला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून हा श्र्लोक म्हणून आरोग्य, धन, संपदेसाठी प्रार्थना करणे,

मनातील नकारात्मकतेचा विनाश होण्यासाठी ज्योतीला नमस्कार करणे ही भारतीय संस्कृती. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे उपासना. तेजाची उपासना करणारे ते भारतीय. आणि म्हणूनच ज्या उत्सवात एखादा- दुसरा दीप नाही, तर दिव्यांची रांग लावायची असते, तो दीपावली उत्सव भारतीयांसाठी सर्वांत महत्त्वाचा उत्सव समजला जाणे स्वाभाविक आहे. दीपावली ज्या ऋतूत येते, ज्या प्रकारे साजरी केली जाते, ज्या गोष्टी दीपावलीच्या निमित्ताने केल्या जातात, त्या सर्वांच्या मागे पक्के विज्ञान आहे व त्यातून मनुष्य, प्राणी, वृक्षवल्ली या सर्वांचे आरोग्य टिकावे, त्यांना सुख-समाधान मिळावे हाच उद्देश आहे. प्रकाशाचे, तेजाचे प्रतीक असणारा दीप आणि आवली म्हणजे रांग किंवा ओळ.

घराघरांत दीपावली साजरी करणे म्हणजे निरंतर, कायम, जावे तेथे, एकामागून एक लांब दिव्यांची ओळ असली की दिवा जणू आपल्याबरोबरच चालतो आहे अशा तऱ्हेने दिव्यांचे कायम दर्शन होणे. दीपावलीमध्ये तेला-तुपाचा दिव्याला खूप महत्त्व असते. दिव्याचे दर्शन म्हणजे ज्योतीचे दर्शन. केवळ इलेक्ट्रिक दिव्यांचे तोरण आणून घरावर लावले की कार्यभाग संपला असे न समजता घराबाहेर, दारापाशी व घरातही पणत्या लावणे हे महत्त्वाचे.

ज्योतीचा प्रकाश व इलेक्ट्रिक दिव्याचा प्रकाश यात फरक काय? यात मुख्य फरक असतो वातावरण शुद्धीचा. जेथे प्रकाश असतो तेथे उष्णताही असतेच. उष्णतेपासून वातावरणाला नुकसानच होते. परंतु दिव्याची ज्योत सौम्य असते. कुठल्याही दिव्याची ज्योत एवढी मोठी करता येत नाही की २५ फुटांवर बसूनही वाचता येईल. मोठा इलेक्ट्रिकचा दिवा लावल्यास मात्र दूरवर प्रकाश पडलेला असतो.

मात्र अशामुळे डोळ्याला त्रास होतो, वातावरणात खूप उष्णताही वाढते. ज्योत तयार होताना तेल किंवा तूप जळते ते वातावरणात पसरल्यामुळे वातावरणात स्निग्धता राहते. या तेलाच्या किंवा तुपाच्या कणांचा शरीराला उपयोग होतो. ‘शुभं करोति कल्याणं’ हा श्र्लोक लिहिताना हा सगळा विचार केलेला दिसतो. ही दीपज्योत असल्यास कुठल्याही तऱ्हेचे अशुभ घडत नाही.

दीपज्योतीमुळे शरीराला व मनाला फायदा होतो; आरोग्य मिळते. प्रकाशाच्या उपासनेने आरोग्य व धन मिळते. भारतीय परंपरेनुसार कुठल्याही कार्यारंभी दिवा लावला जातो, घरात रात्रंदिवस तेवणारा नंदादीप लावला जातो आणि ‘दीपदेवताभ्यो नमः’ असे म्हणून नमस्कार केला जातो. दीप ही देवता आहे, शक्ती आहे. शक्तीचे विशिष्ट स्वरूप म्हणजे देवता हे समजून घेतले तर लक्षात येईल की दिव्याची, ज्योतीची, तेजाची परम उपासना करणाऱ्या मनात प्रेमाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या भारतीयांचा दीपावली हा सर्वांत मोठा सण. दीपावलीचे वैशिष्ट्य हे की ती एक दिवसापुरती सीमित नसते, तर गुरुद्वादशी म्हणजे आश्र्विनातील कृष्ण द्वादशीपासून ते कार्तिकातील शुद्ध द्वितीयेपर्यंत हा महोत्सव चालतो.

यातील पहिला मान आहे तो निसर्गाचा म्हणजे पशुधनाचा. सवत्स गाईचे पूजन करून तिला चांगले अन्न देऊन आरोग्यासाठी प्राण्यांची आवश्‍यकता आहे यावर जणू दरवर्षी शिक्कामोर्तब केले जाते. दीपावलीच्या सणात प्राण्यांनाही समाविष्ट करून घेण्याने मनुष्य-निसर्गाचा संबंध संतुलित असल्याचीही ग्वाही मिळते. वसुबारसेनंतर येते धनत्रयोदशी. आयुर्वेदाची देवता म्हणजेच पर्यायाने आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरींची पूजा या दिवशी केली जाते. धन्वंतरींनी हातात घेतलेले जलौका व अमृतकलश हे योग्य वेळी शरीरशुद्धी व नियमित रसायन सेवन यांचे द्योतक असतात.

वेळच्या वेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने आयुर्वेदातील पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेतली आणि दीपावलीच्या निमित्ताने प्रकृतीला अनुरूप व संपन्न वीर्यवान औषधांपासून तयार केलेले रसायन सेवनास सुरुवात केली तर ते आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरावे. यानंतर येतात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत असते. उटण्याने अनावश्‍यक, मलरूप कफदोष स्वच्छ होतो.

त्वचा प्रसन्न अर्थात स्वच्छ, मऊ, नितळ व तेजस्वी होते. दीपावलीपुरते म्हणायचे झाले तर नरकचतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या तिन्ही दिवशी अभ्यंगस्नान करायचे असते. मात्र आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या संपूर्ण हिवाळ्यात अभ्यंगस्नान नियमित करणे अत्युत्तम होय. पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला आणि भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करायचे असते. पतीने पत्नीला तसे भावाने बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यायची असते. यामुळे नात्यातील स्नेह दृढ होण्यास मदत मिळते.

हिवाळ्याच्या सुरुवातीला येते ती दीपावली आणि ऐन हिवाळ्यात येतो तो ख्रिसमस. हिवाळ्यात प्रज्वलित होणाऱ्या पाचकाग्नीच्या योगे आरोग्य उत्तम राहावे या हेतूने या प्रसंगी फराळ, पोषक अन्न, सप्तधातूंना मदत करणाऱ्या रसायनस्वरूप आहाराचे सेवन करण्याची योजना असते. यादृष्टीने दीपावलीच्या फराळात चकली, शेवेसारखे तळलेले, खारट, तिखट पदार्थ असतात तसेच अनारसा, करंजी, लाडूसारखे शुक्रपोषक रसायन पदार्थही असतात.

लहान मुलांच्या सृजनात्मकतेला वाव मिळावा या हेतूने घराघरांत किल्ला बनवणे, आकाशकंदील तयार करणे, सर्वांनी एकत्र येऊन घर स्वच्छ करणे, सजवणे हे उपक्रम सुद्धा दीपावली व ख्रिसमसमध्ये एकसारखेच असतात. अशा प्रकारे ज्या उत्सवात आहाराबरोबरीने आचार-विचारांना महत्त्व आहे, नातेवाइकांच्या बरोबरीने मित्रमंडळी, आप्तजन, समाजाबरोबरचे नातेसंबंध जपण्याला महत्त्व आहे, प्राणी, वनस्पती, वातावरण, देव-देवता वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, असा हा दीपावलीचा महोत्सव सर्वांसाठी शुभ ठरो हीच प्रार्थना.

श्रीगुरु डॉ.बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित