स्मरण संस्कृतीचे... : संशोधन व विकास

विकासाची पहिली पायरी म्हणजे संशोधन आणि संशोधनाचा आधार म्हणजे विज्ञान. मात्र विज्ञान केवळ भौतिक वस्तूंपुरतं मर्यादित नसतं, तर भौतिकाच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मातही असतं.
Dr Balaji Tambe
Dr Balaji TambeSakal

विकासाची पहिली पायरी म्हणजे संशोधन आणि संशोधनाचा आधार म्हणजे विज्ञान. मात्र विज्ञान केवळ भौतिक वस्तूंपुरतं मर्यादित नसतं, तर भौतिकाच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मातही असतं. म्हणूनच अथर्वशीर्षात श्रीगणेशांना ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि’ असं संबोधलं आहे. ‘विज्ञानाचा अभ्यास हे माझ्या जीवनप्रवासातील महत्त्वाचे अंग आहे’ असं म्हणणाऱ्या श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी भारतीय शास्त्रे असोत की भारतीय संस्कृती, प्रत्येक गोष्टीत विज्ञान शोधलं. संशोधनाच्या आधारे गोष्ट सिद्ध करून दाखवली. कशासाठी? तर जनसामान्यांना पटावी, आचरणात आणावी आणि स्वतःचं जीवन समृद्ध करून घ्यावं यासाठी.

पुण्यात असताना त्यांनी वनस्पतींच्या जाणिवेवर संशोधन केलं. विद्यापीठातून स्किन रेझिस्टन्स मोजणारे मशिन आणलं, वेगवेगळ्या वनस्पतींच्या पानांना मशिन लावून आलेख काढले. इतर वनस्पतींच्या बाबतीत झाडापासून पान तोडले की आलेख लगेचच सरळ रेषेत येई म्हणजे पान प्राणशक्तीरहित होई. तुळशीपत्राचा आलेख मात्र सुरू राही. यावरून तुळशी व प्राणशक्तीचा संबंध लक्षात आला. ग्रहणात तुळशीपत्र का वापरतात, दरवर्षी तुळशीविवाह का करतात यामागचे विज्ञान यातून स्पष्ट झाले.

श्रीगुरुजींनी १९८२मध्ये स्वतः हवा शुद्ध करण्यासाठी आयोनायझर बनवला. संगीतावरही त्यांनी सखोल संशोधन केले. संगीतामुळे गायकाच्या व श्रोत्यांच्या नाडीतील तसेच तापमानातील बदलांची नोंद केली. यातून प्रत्येक रागाचा वेगळा परिणाम होत असल्याचं लक्षात आलं. संगीतशास्त्रानुसार राग व वेळांचा संबंध तसेच आयुर्वेदानुसार दोष व वेळांचा संबंध यांची सांगड घातली. कोणत्या स्वरांनी कोणत्या देवतेचे आवाहन करता येते हे शोधून काढलं व त्यातून स्वास्थ्यसंगीताचा उदय झाला. निद्रानाश, नैराश्यादी मनोविकार, हॉर्मोन्सचे असंतुलन वगैरे रोगांवर स्वास्थ्यसंगीताचा उपचार म्हणून उपयोग करणारे अनेक जण आहेत.

पाण्याला स्मृती असते, पाण्यावर विचारांचा संस्कार होतो, हेही श्रीगुरुजींनी प्रयोगातून सिद्ध केले. जलबिंदू गोठवून मायक्रोस्कोपखाली बघितला तर वेगवेगळे आकार दिसतात, असे स्वित्झर्लंडमध्ये प्रयोग होत होते. श्रीगुरुजींना हे समजताच त्यांनी ॐमंदिरात ठेवलेलं, सुवर्णसंस्कार झालेलं, उदकशांतीचं, गंगा-नर्मदा वगैरे नद्यांचं पाणी गोठवलं. हे सर्वच फोटो अप्रतिम, भूमितीयदृष्ट्या रेखीव, मंडलाकृती आले. मात्र डिस्टिल्ड किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाण्याचे फोटो अभद्र, न बघावेसे आले. भारतीय संस्कृतीत, आयुर्वेदात, अध्यात्मात पाण्याला असणारं महत्त्व यातून सिद्ध झालं.

यज्ञामुळे प्रदूषणावर होणारे परिणाम मोजण्यावरही आत्मसंतुलनमध्ये संशोधन झालेलं आहे. श्रीगुरुजींनी प्रदूषण मोजणारी यंत्रसामग्री आणून यज्ञ केला, यज्ञात वेगवेगळ्या समिधांच्या आहुत्या दिल्या. यज्ञाच्या आधी व नंतर संपूर्ण परिसरातील प्रदूषण नोंदवलं. यज्ञामुळे प्रदूषण कमी होतं आणि हा प्रभाव अनेक दिवस राहतो हे सिद्ध झालं.

श्रीगुरुजी सर्व भारतीय सण, उत्सवांमधील विज्ञानही समजावत. गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जाते. गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. श्रीगुरुजी म्हणत, ‘श्रीरामांनी रावणावर विजय मिळविला एवढ्यासाठी गुढी उभारली जात असेल, हे मला कधी पटलं नाही. गुढीवर चिंतन करताना लक्षात आलं, की बांबूवर पेरे असतात, तसेच मेरुदंडातही जोड असतात. मेरुदंडावर जसं आपलं डोकं असतं, तसाच गुढीवर कलश ठेवला जातो, रेशमी वस्त्र हे शरीराचं प्रतीक, बत्ताशाच्या गाठीचा हार ही मेंदूला पोषण मिळण्याची व्यवस्था, कडुनिंबाची डहाळी ही चैत्रात आरोग्यरक्षण करणाऱ्या वनस्पतीची प्रतिनिधी. वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्मध्वज उभारला की वर्षभर ताठ मानेने जगण्याची प्रेरणा मिळते’ अशा प्रकारे विज्ञान लक्षात आलं की प्रत्येक सण मनापासून साजरा करता येतो.

श्रीगुरुजींनी आरोग्यासाठी शुद्ध तुपाचा खूप प्रचार केला. हृद्रोगातही तूप आवश्यक आहे हे दाखवून दिलं. पारंपरिक साजूक तुपामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही, यावर संतुलनमध्ये संशोधन झालेलं आहे. सुवर्णप्राशनामुळे बुद्धी-स्मृतिवर्धन होतं, हेसुद्धा ३० बालकांना सहा महिन्यांसाठी देऊन, आधी व नंतर तपासण्या करून सिद्ध केलेलं आहे. ध्यानाचा रक्तदाबावर, नाडीवर, तापमानावर काय परिणाम होतो, ‘योगनिद्रा’ ऐकण्याने रक्तशर्करा व रक्तदाबात कशी सुधारणा होते, यावर आत्मसंतुलनमध्ये श्रीगुरुजींनी प्रयोग केलेले आहेत.

पुणे विद्यापीठात ‘योगनिद्रा’ अल्बमवर संशोधन झालं तेव्हा गाढ झोपेत व तणावरहित अवस्थेत मेंदूत ज्या डेल्टा लहरी सापडतात, त्याच योगनिद्रेदरम्यान दिसतात हे सिद्ध झालं. गर्भसंस्कार संगीतामुळे गर्भ व गर्भवतीचं आरोग्य उत्तम राहतं, बालकात स्वर-तालाची जाण उपजत असते, बुद्धी-स्मृती तल्लख असतात हे दिसून आलं.

श्रीगुरुजींनी षट्चक्रांवर खूप काम केलं. श्रीगुरुजी सांगत, ‘प्रत्येकाच्या शरीराभोवती एक तेजोवलय असतं. यावर षट्चक्रांचा प्रभाव असतो. तेजोवलयावरून व्यक्तीच्या शरीरातील बदल, रोग वा मानसिकता समजू शकते’. श्रीगुरुजींच्या मार्गदर्शनाखाली १९९७मध्ये ‘ऑरा मशिन’ हे तेजोवलयाची आकृती व रंग दाखविणारं यंत्र तयार केलं गेलं.

मंत्रांचा आरोग्यावर होणारा परिणाम अनुभवाने समजू शकतो, पण मंत्रातून मिळणाऱ्या स्पंदनांचा परिणाम प्रत्यक्ष दिसावा यासाठीही श्रीगुरुजींनी प्रयोग केले. ध्वनीमुळे सूक्ष्म रेतीकणांना विशिष्ट रचनेमध्ये परिवर्तित करण्याचं तंत्रज्ञान असणारं एक मशिन असतं. श्रीगुरुजींच्या आवाजातील मंत्रामुळे या यंत्रातील रेतीकण सुबक मंडलाकृतीत रचले गेले. त्यांच्या प्रत्येक उच्चारातून एकाहून एक सुंदर मंडलं तयार होत गेली. निर्जीव रेतीवर जर मंत्राचा परिणाम होतो तर सजीव पेशींवर, मेंदूतील सोमजलावर, मन-बुद्धीवर मंत्रांचा किती उत्तम प्रभाव होत असेल हे यातून सिद्ध करता आलं.

श्रीगुरुजींचं कार्य अमर्याद आहे, समाजाला उन्नतीकडे घेऊन जाणारं आहे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोचावेत यासाठी संतुलन वचनबद्ध आहेच. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी ९६८९९२६००२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com