Hindu Religion : लग्न झालेल्या मुलीला माहेरहून बुधवारी सासरी का पाठवत नाही l Hindu Religion Wednesday rituals Married woman In Laws Place | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Religion

Hindu Religion : लग्न झालेल्या मुलीला माहेरहून बुधवारी सासरी का पाठवत नाही?

Why A Married Girl Should Not Send To her In Laws Place On Wednesday : हिंदू धर्मात प्रत्येक चालीरिती मागे काही कारणे सांगण्यात आली आहेत. काळाच्या ओघात लोक पिढी दर पिढी चालीरिती तर पाळतात पण त्यामागची कारणं त्यांना माहित नसतात. अशीच एक पद्धत माहेरी आलेल्या लेकीला सासरी पाठवण्याविषयीची आहे.

सासूरवाशीण लेक माहेरी आली की, वातावरण अगदी आनंदाने फुलून जातं. अर्थातच माहेरून सासरी परत जाताना मुलीचा पाय जड होतो. पण लेकीला बुधवारी सासरी पाठवत नाही अशी फार जुनी परंपरा आहे. असं का, जाणून घ्या.

यामागची कथा

गोष्ट जून्या काळातली आहे. बुध प्रदोष व्रत कथेत ही सांगितली आहे. एक पती आपल्या नव्या नवरीला घ्यायला तिच्या माहेरी गेला होता. त्याकळात पत्नी मान वर करून पतीकडे नीट पाहत नसे. त्यामुळे हिनेही पतीला नीटसे पाहिलेले नव्हते. बैलगाडीचा प्रवास करताना तिला वाटेत तहान लागली. खाली मानेनेच तिने पतीला पाणी मागितले.

बैलगाडी थांबवून पती पाणी आणायला गेला. परत येऊन पाहतो तर काय आपली पत्नी परपुरुषाकडून पाणी पित त्याच्याशी बोलत होती. त्याला खूप राग आला. आपण ओळखलं नाही सांगत तिने माफीही मागितली. पण याचा राग काही कमी होईना.

त्यावेळी पत्नीने महादेवाची प्रार्थना केली. तेव्हा महादेवाच्या कृपेने तो परपुरुष काही न बोलता तिथून निघून गेला आणि यांचे भांडण मिटले. महादेवाच्या कृपेने यांचा संसार वाचला. तेव्हापासून बुध प्रदोष व्रत सुरु झाले.

'जाशील बुधी, तर येशील कधी' अशी एक म्हण आहे. ती याच प्रथेवरून पडली असावी. बुधवारी सासरी लेकीला पाठवल्यावर ती लवकर माहेरी परत येऊ शकत नाही असा एक समज रुढ झाला आहे.

हल्ली सासर माहेर एकाच गावात किंवा जवळ असल्याने मुली सकाळी जाऊन संध्याकाळी परत येतात. पण या सर्व रुढी, प्रथांच्या गाभ्यात पोहचले तर समजते की, सगळ्या मागे काहीही करून देवाचे नाव घ्यावे एवढाच प्रयत्न असतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.