मराठवाड्यात कशी साजरी केली जाते‘येळवस अमावस्या’ |Yelvas Amavasya Importance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येळवस अमावस्या
मराठवाड्यात कशी साजरी केली जाते‘येळवस अमावस्या’ |Yelvas Amavasya Importance

मराठवाड्यात कशी साजरी केली जाते ‘येळवस अमावस्या'

दिपाली सुसर

वेळ अमावस्येला ग्रामीण भागात ‘येळवस अमावस्या’ असं म्हणायची रीत आहे. मूळात हा शब्द ‘येळी अमावस्या’ (Amavasya) असून त्याचे नामकरण हे ‘वेळ किंवा येळ अमावस्या’ असे झाले. कर्नाटक (Karnatak) राज्यात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळवस असते.

या दिवशी, शेतात समृद्धी, सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी मायबाप लक्ष्मीआई पुढे करत असतात. सर्वदात्या धरती माय-माऊलीचे आपण काहीतरी देणं लागतो, या पवित्र भावनेने कर्नाटक आणि लगतच्या भागात म्हणजे आपल्या मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि इतर काही भागात शेतकरी बांधव येळवस मोठ्या आनंदाने साजरी करण्याची जुनी प्रथा आहे.

वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची खोप करून शेतातल्या लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पिकांची देखील पूजा केली जाते. आंब्याच्या झाडाखाली पाच दगडांना चुण्याने रंगवून पांडवाची पूजा केली जाते.

हेही वाचा: उस्मानाबाद, लातूरमध्ये वेळ अमावास्या शेतकऱ्यांनी केली उत्साहात साजरी; पाहा व्हिडिओ

शेतकऱ्यांसाठी पर्वणी (Farmer's Importance)

येळवण प्रथा ही शेतकऱ्यांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारणत: जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही अमावस्या असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते, त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं, अन् ते शरीराला आवश्यकही असत. अशावेळेस शेतकरी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा हा सण निराळा आहे, तसाच यासाठीचा बेतही निराळाच असतो.

हेही वाचा: Festival 2022 : सेव्ह सेलिब्रेशन डेट्स! वर्षभरातील मराठमोळ्या सणांची संपूर्ण यादी

Hurda

Hurda

या पदार्थांचे महत्व मोठे (Food)

आंबिल हे या सणाचं खास आकर्षण असतं. थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते. केवळ आंबिलावर हा बेत थांबत नाही, सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावरान पदार्थ! या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भाजी असते, ज्वारीचा हुरडा असतो, सोबत बाजरीची, कळणाच्या भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात! असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो. येळवसला आलेला पाहुणा जेवला नाही, तर निदान एक ग्लास आंबिल पिणं अनिवार्य असतं. शेतात जमा झालेल्या शेतकरी माय-माऊल्या येणार्‍या-जाणार्‍याच्या जेवणाचं बघतात. तर जेवण झाल्यावर पुरुष मंडळी पत्त्याचे डाव टाकत असतात. ह्या दिवशी पत्ते खेळणे हीसुद्धा आता परंपरेचा एक भाग बनली आहे.

महाराष्ट्रातील येळवसची परंपरा नेमकी काय आहे?

भारतात सिंधूकालिन संस्कृतीपासून नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हापासून जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी या सात नद्या (सप्त सिंधू)भारतीय लोकपरंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त होते.

त्याच सप्तसिंधू नदयांना आराध्य म्हणून पुजण्याची परंपरा सुरू झाली. लोक नदीच्या पाण्याचे पुजन करुन लागले. पण कालांतराने बारामहिने वाहणाऱ्या नदया आटल्या. शेतकऱ्यांनी शेतात वावरातील पिक भिजवण्यासाठी, पिण्याच्या पाण्याकरता विहिरी खोदल्या. आता त्यातले पाणी हे या सप्त सिंधूचे प्रतिक म्हणून पुजले जावू लागले.

शेतात असलेल्या विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगडांना रंगवून त्याला पुजनाची परंपरा सुरु झाली आणि त्यांना आसरा म्हणून ओळखले जाऊ लागले.

हेही वाचा: Tourism | तब्बल 2500 वर्षे जुने रुक्मिणी देवी मंदिर ! जाणून घ्या

आसराचे महत्व (Importance Of Asraa)

आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी, सहारा देणारी, पाणी पाजणारी. याच आसराची पूजा येळवसच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन केली जाते. शेतकरी बांधव संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंभा करुन शेतातल्या गहू, हरभरा या पिकांवरून तो ओवाळतात, जेणेकरून रबी हंगामातल्या या पिकांना कुणाची नजर लागू नये. त्यानंतर शेतकरी मंडळी घराकडे परतात.

यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघायचे. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. जसे की घोड्याचा मोठा बाजार, गाढवांचा बाजार तसंच सगळ्या भटक्या जमातीच्या पंचायती येथे भरायच्या.

दोन वर्षापासून ही जत्रा कोरोनाच्या महामारीमुळे होत नाही. पण शेतकरी बांधव मात्र मोठ्या उत्साहानं आपल्या शेतात येळवसीची पूजा करतात.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathwada
loading image
go to top