तुळजाभवानी

आईशी बोलत असली तरी, मनाने ती तुळजापूरमध्येच होती. तुळजापूरच्या दिशेने जात असताना, ‘आता कुलदेवतेचे दर्शन होणार’, असा विचार तिच्या मनात सुरू होता.
Tuljabhavani
TuljabhavaniSakal

आम्ही पुण्याहून पंढरपूरला गेलो. चंद्रभागा नदीत स्नान करून पांडुरंगाच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतले. गर्दी फारसी नव्हती. त्यानंतर अक्कलकोटला गेलो. स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. आणि एसटीने संध्याकाळी तुळजापूरला पोहोचलो. देवीचे दर्शन घेतले. खणा-नारळाची ओटी भरली आणि रात्रीची गाडी पकडून घरी आलो, नवविवाहिता आदिती तिच्या आईला सांगत होती. लग्न झाल्यानंतर पतीसोबत देवदर्शन करून ती आली होती. त्यात देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शनही तिने घेतले होते. देवदर्शनाला जाण्यापूर्वी आईने सांगितल्याप्रमाणेच तिला तुळजापूर आणि परिसर दिसला होता. तुळजाभवानी त्यांची कुलदेवता होती. त्यामुळे त्यांच्या घरातील नवविवाहित जोडपे देवीच्या दर्शनाला हमखास जातात. घरातील वडील मंडळीच त्यांना सांगतात की, ‘कुलदेवता आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन या.’ त्यानुसार आदिती पतीसोबत जाऊन दर्शन घेऊन आली होती.

आईशी बोलत असली तरी, मनाने ती तुळजापूरमध्येच होती. तुळजापूरच्या दिशेने जात असताना, ‘आता कुलदेवतेचे दर्शन होणार’, असा विचार तिच्या मनात सुरू होता. आईचे शब्द आठवत होते, तिची आई शिक्षिका असल्यामुळे त्या पद्धतीनेच त्यांनी आदितीला सांगितले होते. त्यामुळे आईचा प्रत्येक शब्द तिला आठवत होता. आईने सांगितले होते की, मंदिराच्या महाद्वारापासून मुख्य मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या उतराव्या लागतात. या महाद्वारापासून मुख्य मंदिराकडे जाताना महर्षी नारदमुनींची मूर्ती लागते. मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थ आहे. गोमुख तीर्थ आहे. अमृतकुंड आहे. गणेशतीर्थ आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. लक्ष्मीनारायण आहे. खंडोबा आहे. समर्थ रामदास स्वामी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा तुळजा भवानी मातेचे भक्त होते. रामदास स्वामींनी तुळजाभवानीचे वर्णन.

‘देखिली तुळजामाता। निवालों अंतरी सुखें।

तुटली सर्वही चिंता। थोर आधार वाटला।।...

अशा शब्दांत केले आहे.

मंदिराचा मुख्य दरवाजा अर्थात निंबाळकर दरवाजातून आदितीने आत प्रवेश केला. गोमुख तीर्थातून पाण्याची धार सुरू होती. काही जण तीर्थ प्राशन करत होते. आदिती व तिच्या पतीनेही तिर्थ घेतले. देवीच्या मुख्य मंदिराजवळील राममंडपात गेले. शंकराच्या मंदिरात दर्शन घेतले. मंदिराचा परिसर ते न्याहाळत होते. सुरेख ओवऱ्या होत्या. मंदिराच्या समोर होमकुंड होते. नवरात्रात येथे नवचंडी यज्ञ होतो, असे एका पुजाऱ्याने सांगितले. त्या होमकुंडासमोरच दीपमाला होती. तिला जाणवले की, देवीचे मुख्य मंदिर पूर्वाभिमुख आहे. सभामंडप आहे. मंदिरावर कळस आहे. भवानी मातेची मूर्ती उंच सिंहासनावर विराजमान आहे. अष्टभुजा आहे. तिच्या हातांमध्ये त्रिशूळ आहे. बिचवा आहे. बाण, चक्र, शंख, धनुष्य अशी आयुधे आहेत. एका हातात राक्षसाची शेंडी आहे. देवीच्या उजव्या व डाव्या बाजूस चंद्र व सूर्य दाखविले आहेत. उजवा पाय महिषासुराच्या अंगावर आहे. देवीचे वाहन सिंह आहे. पायांमध्ये महिषासुराचे तुटलेले मस्तक आहे. देवीसाठी चांदीचा पलंग आहे. दर्शन घेऊन आदिती पुढे चालू लागली.

तुळजापूरला येण्यापूर्वी या स्थळाविषयी घेतलेली माहितीही तिला आठवली की, तुळजापूर हे मराठवाड्यात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुक्‍याचे ठिकाण आहे. येथील डोंगराला बालाघाटचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या पठारावर तुळजापूर वसलेले आहे. या स्थळाला पूर्वी यमुनाचल आणि बालाघाट या नावांनीही ओळखले जायचे. पूजाऱ्याकडून त्यांनी माहिती घेतली होती की, मातेची पूजा दिवसातून चार वेळा होते. सकाळच्या पूजेला चरणतीर्थ पूजा म्हणतात. रात्री प्रक्षालनपूजा होते. मुख्य पूजा दुपारी व सायंकाळी होते. दर मंगळवारी देवीचा छबिना म्हणजे पालखी निघते. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांची देवी कुलदेवता आहे. त्यामुळे अनेक जण दर्शनाला येतात. काही भक्त देवीला दागिने अर्पण करतात. देवीचा मुकुट रत्नजडित आहे. हिऱ्यांचा कमरपट्टा आहे. मोत्यांचा हार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक पीठ आहे. शारदीय नवरात्र व शाकंभरी नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो. आश्‍विन महिन्यातील नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या काळात शाकंभरी नवरात्र असते. चैत्र पौर्णिमेलाही देवीचा उत्सव असतो. आदिशक्तीचे हे एक अधिष्ठान आहे. अनेक जण देवीला शरण येतात. साकडे घालतात. संत एकनाथ महाराजांनीसुद्धा देवीला साकडे घातले होते. यवनांच्या जोखडातून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी हे साकडे घातले होते.

‘नमो आदिमाया भगवती।

अनादीसिद्ध मूळ प्रवृत्ती।।

महालक्ष्मी त्रिजगती।

बया, दार उघड दार उघड।।...

अशा शब्दांत नाथ महाराजांनी घातलेले साकडे सर्वांना माहितीच आहे. ‘हो’ असा शब्द आदितीच्या मुखातून निघाला आणि आईचे लक्ष तिच्याकडे गेले. ती कुठल्यातरी विचारात होती. त्यातच ती ‘हो’ असं उच्चारली होती. तिची ही अवस्था पाहून आईच तिला म्हणाली, ‘काय गं, काय विचार करतेस?’ ‘काही नाही गं आई, आई तुळजाभवानीचे रूप डोळ्यांसमोरून जातच नाहीय.’ असं म्हणत ती आईच्या मागे मागे घरात गेली, आई तुळजाभवानीच्या दर्शनाच्या आठवणी सोबत घेऊन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com