
Ram Navami 2023 : कुंचल्यातून साकारला ‘सत्याचा विजय’
नाशिक : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांनी ‘सकाळ’च्या वाचकांसाठी यावर्षी ‘राम-रावण युद्ध म्हणजे सत्याचा असत्यावर विजय’, हा विषय घेऊन चित्र साकारले. गेली एकोणीस वर्षे रामनवमीच्या दिवशी प्रभू रामाच्या जीवनातील एक प्रसंग चित्रबद्ध करतात. त्यांचे हे विसावे चित्र आहे.
रामायणातील राम-रावण युद्धाचा प्रसंग त्यांनी चित्रातून साकारला. त्यांनी युद्धाचा प्रसंग कल्पकतेने रेखाटला. यासाठी त्यांनी उष्म रंगसंगतीतील लाल, पिवळा, नारंगी रंगांचा वापर केला.
विशेषत: लाल रंगाचा अधिक वापर करत दोन्ही बाजूंचे वीर, रणभूमीवर वाहणारे रक्ताचे पाट, श्रीरामाच्या दिव्यबाणाची मध्यभागी केलेली योजना, समुद्रात तयार केलेला सेतू, सूर्य, पताका, गदा, धनुष्यबाण आदींची रचना केली आहे. रावणवधानंतर विजय साजरा करणारी वानर सेना या सर्व तपशीलांसह चित्रनिर्मिती केली आहे.
प्रसिद्ध झालेली चित्रे
आनंद सोनार यांनी साकारलेले पहिले चित्र ‘सकाळ’मध्ये २००४ रोजी प्रसिद्ध झाले. त्याचा विषय पंचवटीतील पाच वटवृक्षांच्या सावलीत उभे असलेले श्रीराम, लक्ष्मण व जानकी असा होता. त्यानंतर सलग १९ वर्षे हा उपक्रम सुरू राहिला. त्या चित्रांचे ठळक विषय असे : श्रीराम जन्मसोहळा, श्रीराम-सीता स्वयंवर, श्रीराम पंचायतन, श्रीराम बालवयातील- दशरथ व राण्यांसह सर्व मुले,
श्रीराम यांचे अयोध्येत परतल्यावरचे स्वागत, केवट नावाडी राम-लक्ष्मण गंगापार, सेतू बांधा रे सागरी, राम-सीता प्रथम भेट मिथिला नगरी, वनातील राम, लक्ष्मण व सीता, गोदावरीपूजन, अहल्या उद्धार, कुश-लव रामायण गाती, बेशुद्ध लक्ष्मणासाठी संजीवनी आणणारा हनुमान, सांग लक्ष्मणा कुठे जाऊ मी, श्रीराम-भरतभेट पादुका चित्रकूट, सीता पृथ्वीच्या पोटात गडप, असे श्रीरामाच्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी रेखाटले व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध केले.