नमन नागदेवतेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpanchami

श्रावण शुद्ध पंचमीला सर्वत्र नागपंचमी साजरी होते. त्यानिमित्त भारतीय संस्कृतीमधील नागदेवतेच्या स्वरूपाविषयी विवेचन.

नमन नागदेवतेला

- सचिन जहागिरदार

श्रावण शुद्ध पंचमीला सर्वत्र नागपंचमी साजरी होते. त्यानिमित्त भारतीय संस्कृतीमधील नागदेवतेच्या स्वरूपाविषयी विवेचन.

अनन्तश्चास्मि नागानां ।।

- श्रीमत् भगवद्‍गीता, विभूतियोग १०-२९

भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नागांमध्ये मी अनंत अर्थात शेषनाग आहे. नाग ही भगवंताची विशिष्ट अशी विभूती आहे, असे श्रीमत् भगवद्‍गीता सांगते. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये नागाला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. अथर्ववेदामध्ये नागांचा उल्लेख आढळतो. पुराणांमध्ये नागदेवतेविषयी विविध कथा आहेत. समुद्रमंथन झाले तेव्हा वासुकी नामक सर्पाची दोरी करून ती मेरू पर्वताला गुंडाळली. त्याचा उपयोग करून देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले. तसेच देवतांच्या रूपांमध्येदेखील नागाचे स्थान आढळते. भगवान शंकरांच्या गळ्यात नाग असतो. तसेच भगवान विष्णू शेषनागाच्या वेटोळ्यावर पहुडलेले असतात. म्हणूनच त्यांना ‘भुजगशयनं’ असे संबोधले जाते. भगवान श्रीकृष्णांना मथुरेहून गोकुळात नेताना त्यांचे पिता वसुदेवांना यमुना नदी पार करावी लागली. त्यावेळी वासुकी सर्पाने भगवान श्रीकृष्णांवर छत्र धरले होते. या सर्व पौराणिक वर्णनाचा संतसाहित्यातदेखील उल्लेख आढळतो.

अध्यात्म, योग या प्रांतामध्ये देखील ‘नाग’ हे प्रतीक अनेक ठिकाणी दिसून येते. अनेक देवतांच्या प्राचीन मुर्त्यांवर फणा काढलेल्या नागाचे छत्र असते. ज्योतिषशास्त्रानुसार आश्लेषा नक्षत्राचा नक्षत्रस्वामी नाग आहे. योगमार्गाच्या संदर्भात विचार करताना कुंडलिनी जागरण हा विषय येतो. मूलाधार चक्रामध्ये कुंडलिनी शक्ती एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालून अधोमुख होऊन निद्रिस्त स्वरूपात असते. ही कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर ऊर्ध्वमुखी होऊन टाळूमध्ये असलेल्या सहस्रार चक्राच्या दिशेने प्रवास करू लागते असे वर्णन ग्रंथांमध्ये आढळते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये कुंडलिनीसाठी नागाचे रूपक योजले आहे.

नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें ।

वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥

तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।

अधोमुख सर्पिणी । निजैली असे ॥

- श्री ज्ञानेश्वरी ६-२२२,२२३

याच संदर्भाने एक उल्लेख महत्त्वाचा ठरेल. तत्त्वज्ञ संत गुरुदेव डॉ. रा. द. रानडे यांनी आपल्याला विशालकाय, तेजोमय शेषनागाचे दर्शन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती लिहून ठेवली आहे.

संस्कृतीत महत्त्वाचे स्थान

भारताच्या सांस्कृतिक जीवनातदेखील नागाचे दर्शन सर्वत्र होते. महाभारतामध्ये अर्जुनाने नागकन्या उलुपीशी विवाह केल्याची कथा आहे. ‘नाग’ लोकांचे एक राज्य होते. त्यालाच नागभूमी किंवा आजचे नागालँड असे म्हणले जाते. आपल्या देशामध्ये अनंतनाग, नागपूर ही नागांचा संदर्भ असलेली शहरे आहेत. नागपूरमध्येच नाग नावाची नदीदेखील आहे. वडवळ (जि. सोलापूर) येथे नागनाथांचे अत्यंत प्राचीन आणि भव्य मंदिर आहे. दक्षिण भारतातील कुक्के सुब्रह्मण्य या तीर्थक्षेत्री नागपूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. काशीमधील नागकुंवा या स्थानी प्रतिवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. हीच नागदेवता आपल्या महाराष्ट्रातील गावागावांमध्ये ‘नागोबा’ म्हणून पूजली जाते. प्रत्येक गावात नागदेवतेचे एखादे तरी मंदिर असतेच. हा नागोबा आपल्या संस्कृतीमधील महत्त्वाचे लोकदैवत आहे. आजही नागपंचमीच्या दिवशी नागाचे वारूळ असेल तेथे जाऊन किंवा मातीची प्रतिमा करून नागाचे पूजन केले जाते. गावोगावी नागोबाची जत्रा भरते. प्रकृतीमध्ये सर्वत्र भगवंताचे दर्शन करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. त्याचेच हे व्यक्त स्वरूप होय.

अन्नसाखळीत महत्त्वपूर्ण भूमिका

नाग हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक अन्नसाखळीमध्ये नागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. काही औषधांमध्ये नागाचे विष हे प्रतिविष म्हणून वापरले जाते. असा हा नाग आपल्या निसर्गातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण याच्या अनिर्बंध वाढीमुळे नागांचे

नैसर्गिक अधिवास असलेली जंगले, पाणथळ जागा नष्ट होत आहेत. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात, वास्तव्यासाठी नागरी वस्तीमध्ये येतात. मग मात्र सगळ्यांची धावपळ उडते. या असंतुलनाला एक मनुष्य म्हणून आपण जबाबदार आहोत का? याचा आपण विचार केला पाहिजे. नागांच्या संवर्धनासाठी कार्यरत झाले पाहिजे. आपल्या आसपास नागाचे दर्शन झाल्यास स्वत:ची पुरेशी काळजी घेऊन, नागाला इजा न करता त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडावे. त्यासाठी वन विभाग, अधिकृत सर्पमित्र यांची मदत घ्यावी. या नागपंचमीला आपण नागदेवतेचे पूजन तर करणारच आहोत. त्याचप्रमाणे नागांच्या संवर्धनाचा, त्यांच्या रक्षणाचा वसा घेऊन कृतीरूप पूजन करण्याचा निश्चय करुया.

Web Title: Sachin Jahagirdar Writes Nagpanchami Celebration Festival Shravan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..