शिवामूठ चौथी; मानसिक स्वास्थ्य देणारे : जवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवामूठ चौथी; मानसिक स्वास्थ्य देणारे : जवस

शिवामूठ चौथी; मानसिक स्वास्थ्य देणारे : जवस

श्रावण महिन्यात शिवामूठीची तयारी अधिकच साग्र संगीत केली जाते. आजची जवसाची शिवामूठ असते. तकतकीत तपकिरी रंगाचे सुळसुळीत जवस हातात पकडणे म्हणजे कसरतच असते. परंतु एकतानता आणि तादात्म्य असल्यावर चंचलता दूर होते. शिवाशी एकरूपता साधताना या जवसाची शिवामूठ अर्पण करताना स्त्रिया एकाग्र होऊन घरादाराचे सौख्य मागतात...

जवसाची शिवामूठ स्त्रियांच्या आरोग्याशी विशेषत्वाने निगडित आहे. स्त्री ही पुरुषांपेक्षा अधिक भावनाशील असल्याने आणि कुटुंब, नातीगोती, अवती भवतीचा परिसर यांच्याशी सतत संपर्कात असल्याने तिच्या भाव विश्वात अनेक सकारात्मक आणि नकारात्मक प्रसंग घडत असतात. या सर्वाला सामोरे जाताना कधी कधी मानसिक अस्वस्थता, चिंता, काळजी असंतुलन अशा विकारांची बाधा होऊ शकते. यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे औषधोपचार सुरू असतात. त्यामध्ये जवसाचे स्थान महत्त्वाचे आहे. जवसात असणारे ‘ओमेगा-३’ हे फॅटी ॲसिड मिळते.

मानसिक स्वस्थता

जवस या गळीत धान्याची पौष्टिकता अनेक वैशिष्ट्याने उल्लेखनीय आहे. यातील प्रथिने, फायबर, अँटी ऑक्सिडंट यामुळे मानसिक स्वस्थता लाभते. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी, हाडे व सांधे मजबूत होण्यासाठी, मधुमेह नियंत्रणासाठी, कोलेस्ट्रालची वाढीसह, हार्मोन्स संतुलनासाठी, त्वचा चमकदार होण्यासाठी जवस अधिक सक्रिय ठरते. स्त्रियांमध्ये प्रजनन, मेनोपोज, स्थूलता, पाठदुखी अस्थमा, केस गळणे, अकाली वार्ध्यक्य अशा अनेकविध व्याधींमध्ये जवसाचा उपयोग महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. लहान मुलांना अळशीचा (जवस) काढा खोकला कफ कमी होण्यासाठी दिला जातो.

शिवामूठीचे महत्त्व

जवसाच्या शिवामूठीचे हे व्रत म्हणजे ईश्वराकडे आपण आणि आपल्या कौटुंबिक आणि पारिवारिक कल्याणासाठी ‘औढरदानी’ महादेवाकडे भावभक्तीने मागितलेले वरदानच आहे. यात दान धर्माची ओढ आहे. मुठभर का असेना अर्पण करण्याची वृत्ती आहे. ‘स्व’ बरोबर समाजाचा विचार आहे. सोने नाणे, पैसे दान करण्यापेक्षा धान्य रूपात दान करण्यात आरोग्य संपन्नतेची महत्ता आहे. शिवकृपेने लाभलेले शिवचरणी अर्पण करण्याचा निरलस भाव यात आहे.

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सात्त्विक वृत्ती आणि सात्त्विक आहार यांचे सूत्रच या शिवामूठीच्या व्रतामागे दडले असावे याचा प्रत्यय येतो. तांदूळ, तीळ यांना धार्मिक होमहवनात आहुती म्हणून स्थान आहे. सातू हे धान्य श्राद्ध कर्मांत, श्रावणी विधीत वापरले जाते. आहारात ही याचे महत्त्व वाढीस लागले आहे. सातू हे तृणधान्य पूर्वापार आहे. हे धान्य साधारणपणे गव्हासारखेच असते. शिवामूठचा संदर्भ केवळ धार्मिक आध्यात्मिक कल्याण नाही तर सामाजिक, सांस्कृतिक,आणि निरामय जीवनमान उंचावण्याचा परंपरेने आलेला दुवा आहे. काळाच्या ओघात याचे स्वरूप बदलत राहील परंतु मूळ गर्भित शिवतत्त्व निरंतरच राहील. म्हणूनच शिवामूठीचे समर्पण करताना शिवाला प्रार्थना करूया..

करचरणकृतं वाक् कायजं कर्मजं वा

श्रवणनयनजं वा मानसं वाऽपराधं।

विहितमविहितं वा सर्वमेतत क्षमस्व

जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो ॥

Web Title: Shravan Somvar 2022 Chauthi Shivamuth Flaxseed Javas

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :shravan