Som Yag Yadnya 2023 : अग्निष्टोम महासोमयागस्थळी भाविकांची गर्दी

अवभृत स्नानाने आज सांगता; अनेक मान्यवरांनी घेतले दर्शन
Som Yag Yadnya 2023
Som Yag Yadnya 2023sakal

म्हापसा : गोमन्तक-सकाळ माध्यम समूहातर्फे विश्वशांतीसाठी काणका येथील विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान परिसरात अग्निष्टोम महासोमयाग सुरू असून या यज्ञाचा शुक्रवारी (ता.१०) शेवटचा दिवस आहे. अवभृत स्नानाने (नदीकाठी स्नान) या यागाची सांगता होणार आहे. विश्वशांती तसेच यज्ञ ही संकल्पना समजून घेण्यासाठी मागील पाच दिवसांपासून महासोमयागास भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

पाचव्या दिवशी गुरुवारी सभामंडप झेंडूची फुले तसेच केळीची झाडे आकर्षकरीत्या सजवलेला होता. यज्ञस्थळी अग्निदेवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. सकाळच्या वेळी सोमवल्लीचा रस काढण्यात आला. याला ‘सुत्याह’ असे म्हटले जाते. सोमरस काढून पेल्यांमध्ये भरून सोमआहुती अर्पण करण्यात आली.

गुरुवारी पहाटे साडेपाच ते रात्री उशिरापर्यंत हा यज्ञयाग चालला. यज्ञाच्या पाचव्या दिवशी इंद्र व अन्य देवता सोमक्षणाकरिता यज्ञस्थळी येतात, अशी माहिती पुरोहित सिद्धांत गाडगीळ यांनी दिली. सकाळच्या विधीसत्रात स्वर्गप्रवेश देखील झाला. या विधीअंतर्गत सोमयागाचे यजमान सोमयाजी सुहोता दीपक आपटे आणि सुहोता समृद्धी दीक्षित आपटे या दांपत्यासह आपटे कुटुंबीयांनी डोक्यावर धोतर धरून सभामंडपात प्रवेश केला.

याच कृतीला ‘स्वर्गप्रवेश’ असे म्हटले जाते. यावेळी विविध वेदमंत्रांचे पठण करण्यात आले. यावेळी प्रात:सवन, मध्यमसवन व त्रितीसवन झाला. गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने यज्ञस्थळी भेट देऊन अग्निदेवतेचा आशीर्वाद घेतला. यज्ञस्थळी उभारलेल्या स्टॉलवर आयुर्वेदिक उत्पादनांसह अग्निहोत्राचे किट उपलब्ध आहेत. या स्टॉल्सनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विदेशी पर्यटकांचीही उपस्थिती

मंगलमय वातावरणात सुरू असलेल्या यज्ञस्थळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. गुरुवारी संकष्टी चतुर्थी असल्याने अनेक भाविकांनी सोमयाग यज्ञाला भेट दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनीही यज्ञस्थळी भेट दिली. याशिवाय विदेशी पर्यटकांनीही आवर्जून यज्ञस्थळी दर्शन घेतले.

या सोमयागाची शुक्रवारी अवभृतईष्टी व पूर्णाहुती होईल. त्यानंतर दोन ईष्टी होऊन यज्ञाची सांगता होईल. यज्ञस्थळी विद्वान ब्राह्मण व अग्निहोत्री ही यज्ञ उपासना करीत आहेत. अशा यज्ञाचे क्षण दुर्मिळच असतात. त्यामुळे भाविकांनी या संधीचा लाभ घेऊन शेवटच्या दिवशी अग्निदेवतेचा आशीर्वाद घ्यावा.

- सिद्धांत गाडगीळ, पुरोहित.

गोमन्तक-सकाळ माध्यम समूह विश्वशांतीसाठी महासोमयागाचे आयोजन करते, ही कौतुकास्पद बाब आहे. सध्या पर्यावरण सांभाळून ठेवणे हे मोठे आव्हान आहे. समाज गुण्यागोविंदाने नांदावा, यासाठी हा यज्ञ आहे. त्यामुळे गोमन्तक-सकाळला या आदर्श कार्याच्या निमित्ताने गोमंतकीयांकडून कौतुकाची थाप मिळाली आहे.

- लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री.

सोमयाग यज्ञामुळे वेदकालीन संस्कृतीचे दर्शन घडले. यज्ञस्थळी प्रसन्न व मंगलमय वातावरण आहे. या यज्ञाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही लोक पाहतात. या यज्ञाचा गोमंतक भूमीला नक्कीच लाभ होईल. यज्ञस्थळी उपस्थित राहिल्याने सर्वांनाच ऊर्जा मिळाली. विश्वशांतीसाठी गोमन्तक-सकाळ माध्यम समूहाने घेतलेला पुढाकार गौरवास्पद आहे.

- रमाकांत खलप, माजी केंद्रीय मंत्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com