Spiritual Tips : अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वर भक्ती l Spiritual Tips mahabharat lord krishna bhagwat geeta gita | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spiritual Tips

Spiritual Tips : अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे परमेश्वर भक्ती...

श्रुती आपटे

Spiritual Tips : मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्‌।

कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च॥

माझ्याशी एकचित्त झालेले माझ्याशी एकप्राण झालेले माझे भक्त एकमेकांना बोध देतात. माझ्याच कथा माझेच गुणवर्णन परस्परांना सांगतात. त्यातच संतुष्ट होतात. रमून जातात.

परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणारे भक्त ज्यांच्या ध्यानी मनी स्वप्नी वचनी केवळ भगवंतच असतात ते परस्परांशी काय बोलतात, कसे वागतात त्याचं वर्णन भगवान श्रीकृष्ण करतो. भगवंतांच्या विभूती आणि योगसामर्थ्य जाणून ज्ञानवंत अत्यंत निर्मल अंतःकरणाने भावपूर्ण उपासना करतात.

मीच ब्रह्मांडाचा, संसाराचा प्रभाव म्हणजेच उगमस्थान आहे आणि माझ्यापासून सर्व काही कार्य प्रवृत्त होते याचे परिपूर्ण ज्ञान त्यांना असते. त्यांचे चित्त तदाकार, तन्मय झालेले असते. त्यांनी आपले प्राणसुद्धा मलाच समर्पित केलेले असतात. ते माझेच भजन करतात. जप करणे, कीर्तन करणे, भगवंताचे चिंतन करणे,ध्यान करणे, भगवंतांची कथा ऐकणे, ग्रंथांचे पठण करणे, म्हणजेच भगवंताचे भजन.

खरं तर भगवान श्रीकृष्ण हेच त्यांचं पूर्ण विश्व. त्यांचं जीवन, त्यांची स्मृती सर्वस्व असते. असे भक्त एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकांच्या मनातील भगवंता विषयीचा भाव ते जाणतात. त्यांचा परस्पर संवादही भक्तिमयच असतो. आपल्याला जाणवलेले भगवंताचे माहात्म्य, त्याचे गुण, त्याच्या लीला, तसंच भगवंताच्या आठवणीने व्याकूळ होणारी आपली अवस्था ते एकमेकांना सांगतात. एकमेकांना आत्मबोध देतात. या हृदयीचा भाव त्या हृदयी परिवर्तित होतो आणि ते आनंद रसाचा अखंड अनुभव घेतात.

भक्तांची ही अवस्था म्हणजे जणू एकमेकांच्या जवळ असणारी पाण्याने तुडुंब भरलेली दोन सरोवरेच. आनंदाचे तरंग उसळून पाणी एकमेकात मिसळून जाते. त्यांच्या भावसंवादाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट श्रीकृष्ण सांगतात की, गुरू शिष्याला एकांतामध्ये ज्ञान देतात. पण असे भगवंतांचे भक्त तोच उपदेश मोठ्याने गर्जना करून सर्व जगाला सांगतात. अशी भक्तीची मुक्त उधळण भगवंताचे अंतरंग भक्तच करू शकतात. अशा सतत माझ्या चिंतनात माझ्या प्रेमात रममाण झालेल्या भक्तांना मी समत्वबुद्धी देतो.

तिच्यामुळे हे भक्त परमेश्वराची प्राप्ती करतात. त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या चित्तावरील अज्ञानरूपी अंधाराचे आवरण अत्यंत तेजस्वी अशा ज्ञानरूपी दिव्याने मीच नष्ट करतो. कोणतेही वेदशास्त्रांचे शिक्षण न घेतलेल्या संतांना आत्मज्ञान कसे प्राप्त झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे मिळते. त्यामुळेच त्यांचे जीवन तेजोमय आणि ज्ञानमय झालेले दिसते. संत, त्यांच्या चरित्रातून, वाङ्‌मयातून अभंगातून हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवतात.

टॅग्स :mahabharatLord Krishna