Swami Samarth Prakatdin : स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द कोणते होते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swami samartha

Swami Samarth Prakatdin : स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द कोणते होते?

श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे. स्वामींचा जन्म कुठे झाला याची काही नोंद नसली. तरीही ते आजच्या दिवशी कर्दळीवनात प्रकट झाले होते. त्यामूळे आजचा दिवस स्वामींभक्तांसाठी खास मानला जातो.  

स्वामींचे जीवन एक कोडंच होतं. जे कोणालाही उलगडलं नाही. स्वामींची लिला अगाध होती. त्यांचं स्वत:शीच बोलत बसणं, न सांगता भक्तांच्या अडचणी समजून घेणं. या गोष्टी नक्कीच त्यांना दिव्यत्व प्राप्त होतं हे सिद्ध करतात.

पुराणानूसार स्वामी हे नृसिंह सरस्वती दत्त गुरूंचे चौथे अवतार मानले जातात. स्वामींचे निर्वाण चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी,  शके १८००, सन १८७८ला मध्ये झाले. त्या दिवशी एक प्रसंग घडला होता. तो आज आपण पाहुयात.

प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे. याची जराही कल्पना कुणास नव्हती. मागील पंधरा दिवसांत काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे. बारा दिवस स्वामींनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकुबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजविले.

मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते. तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो. 

दुपारी १ वाजण्याच्या सुमारास श्रीस्वामीगुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फर्मावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामीआज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभिर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.

महाराजांनी टेकून बसण्याकरीता तक्क्याच्या दिशेने खूण करताच सेवेक-यांनी तो दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना बसविले. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले नि त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैद्य़ मंडळी होतीच. कुणाच्याच जीवात जीव नव्हता. पुढे होवून एकाने नाडी पाहिली, तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना.

त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. भुजंगा सेवेकरी व अन्य नि:सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते. कुणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटत होता. स्थिरचित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते.

अशा हलकल्लोळात थरथरणा-या अक्कलकोटास अचानक एक क्षणैक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरुंच्या पलंगासभोवती सरकली. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थमुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भूत वचन परत पुन्हा उच्चारले गेले.

अनन्याश्चिन्तयंतो मां ये जना: पर्युपासते ।। तेषांनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। -जो अनन्य भावे शरण मजसी, पाहील मुक्तीचा सोहळा ।। जिंकील जीवन कला। जो मजवरी विसंबला ।। 

समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्रीस्वामीकृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वादसंकेत दर्शविण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न जाहले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशीएवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर, श्रीस्वामीदेह दरबार मंडळींच्या आग्रहामुळे, पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत ठेवण्यात आला.

टॅग्स :templeakkalkot