Vaishakh Amavasya : वैशाख अमावस्येचं काय आहे महाभारतकालीन महत्व; जाणून घ्या कथा l Vaishakh Amavasya 2023 Mahabharat Pandav avas story importance religious | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaishakh Amavasya

Vaishakh Amavasya : वैशाख अमावस्येचं काय आहे महाभारतकालीन महत्व; जाणून घ्या कथा

Vaishakh Amavasya 2023 : हिंदू धर्म हा सनातन धर्म असल्याने त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक तिथीला, सणांना विशेष काहीतरी महत्व, कारण आणि त्यामागची कथा असते. आधीच्या पिढी कडून तो वारसा पुढच्या पिढीकडे दिला जातो. पण काही गोष्टींसाठी आपल्याला ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो.

त्याचनुसार या वैशाख अमावस्येचे महत्व आणि कथा आपल्याला धर्मबोध या ग्रंथात आढळते.

काय आहे कथा?

असं म्हटलं जातं की, पांडव वनवास संपवून परत आले तो हाच दिवस होता. त्यामुळे या दिवशी काही प्रतिकात्म विधी करण्याची पद्धत आहे. वनवासातून परतत असताना द्रौपदीसह पांडव गावाबाहेरच्या डेरेदार कडुलिंबाच्या झाडाखाली विसाव्याला थांबले. त्यामुळे मराठवाड्यात आजही काही ठिकाणी लोक या दिवशी अंगणातला एक कोपरा सजवतात.

आसपास कडुलिंबाचे झाड असेल तर त्याच्या खालची जमीन झाडून पुसून स्वच्छ करून घेतात. पानांनीच आसन तयार करतात. सहा छोट्या दगडांना चुना लावून पाच पांडव आणि द्रौपदी यांचे प्रतिक म्हणून ठेवतात. नंतर द्रौपदीला हळद कुंकू वाहून सर्वांना फुले, नैवेद्य अर्पण केला जातो.

मराठवाड्यातला हा एक विशेष सण मानला जातो. काही लोक कुलाचार म्हणूनही हे अगदी जिव्हाळ्याने करतात. महाराष्ट्रात दिवाळीला किल्ले बनवण्याची पद्धत आहे. त्याच्याशी साम्य असणारा हा सण आहे.

अशा लहानसहान प्रथा पाळल्याने संस्कृतीची मुळं घट्ट होतात. पुढच्या पिढीला त्याची माहिती होते. एकुणच हा सण सांस्कृतिक भावनांशी जोडलेला असल्याने याला भावुका अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

टॅग्स :Hindu religionmahabharat