
Vat Purnima 2023 : वडाची पूजा कशी करावी; जाणून घ्या साहित्य व सविस्तर पूजा विधी
येत्या ३ जून रोजी वटपौर्णिमा आहे. ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला हे व्रत केलं जातं. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे उपवास करते. वडाची पूजाही करतात. अनेक महिलांचं हे पहिलंच व्रत असेल. त्यामुळे या दिवशी काय करायचं, हे व्रत कसं करायचं? याविषयी सविस्तर जाणून घ्या...
वट सावित्रीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य
हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांडं, पाट, गंध-अक्षता, बुक्का, फुलं, तुळस, दूर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची १२ पानं, कापसाची वस्त्रे, जानवं, १२ सुपाऱ्या, फळं, २ नारळ, गुळ-खोबरं, बांगड्या, फणी, गळेसरी, पंचामृत, ५ खारका, ५ बदाम, सूताची गुंडी
वडाची पूजा कशी करावी?
वडाच्या झाडाला किंवा बाजारात मिळतो त्या वटपौर्णिमेच्या प्रतिमेला तिहेरी दोरा बांधावा. सूत कापसाचं काढलेलं असावं. सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर सती मातेच्या प्रतिमेचीही पंचोपचार पूजा करावी. वडाच्या मुळाजवळ पुरुष सुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून पंचोपचार पूजा करून आरती करावी.
या दिवशी सुवासिनींनी उपवास करावा. दुसऱ्या दिवशी सकाळी १० नंतर उपवास सोडावा. वडाला हळद कुंकू वाहून आंबे आणि पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा. वडाला तीन प्रदक्षिणा घालाव्यात आणि पाच सुवासिनींची आंबे आणि गव्हाने ओटी भरावी.