Read Weekly Rashi bhavishya in marathi langauge | Weekly Horoscope - 02 January 2022 to 08 January 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Horoscope
साप्ताहिक राशिभविष्य (२ जानेवारी २०२२ ते ८ जानेवारी २०२२)

साप्ताहिक राशिभविष्य (२ जानेवारी २०२२ ते ८ जानेवारी २०२२)

अशी ही पुण्याची पहाट कुठे!

भोग आणि भाग्य ही जीवनाला बांधून ठेवणारी एक जोडगोळीच आहे. जीवन जगत जगत जिवाचा उपभोग घेणं वेगळं आणि आपलं भाग्य अजमावण्यासाठी जीवन जगणं वेगळं! सूर्याला उगवण्यासाठी कष्ट पडत नाहीत; परंतु माणूस मात्र सूर्योदयाला मुहूर्तात अडकवतो आणि भाग्यसूर्य उगवला असं म्हणतो! उगवणं आणि मावळणं हे नसते भोग माणसानं मागं लावून घेतले आहेत! सूर्याला काळात अडकवून माणसाने सूर्याला कालात्मा बनवलं! आहे की नाही गंमत! अशी ही माणसाची अज्ञानाची दशाच जागृतीत गरीब असलेल्या माणसाला स्वप्नात श्रीमंतीचा भोग देते! माणूस अज्ञानवश होऊन आपणच आपला वैरी बनत असतो! असंच भगवद्‌गीता पदोपदी सांगत आली आहे.

सप्ताहात ‘पौष’ महिन्याचा आरंभ होत आहे. ‘पृथ्वी’ हाच एक मोठा भोग आहे. असं म्हणतात की, पुण्य संपल्यावर माणूस परत कर्म करून पुण्य संपादनासाठी स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो. यात सर्व काही रहस्य दडलं आहे. कारण बुद्धीचं जाणणं, मनाचं देणंघेणं आणि प्रकृतीचं (पृथ्वीचं) अंग धरणं यांचा परस्पर संबंधच माणसाच्या भोगभाग्याला कारणीभूत होतो. अर्थातच, हे भोगभाग्य पूर्णतः माणसाच्या मनुष्यबुद्धीवर अवलंबून असतं. पृथ्वीचं कर्म पूर्णतः सूर्यावर अवलंबून असतं. असं जर नसतं, तर माणूस त्याच्या पायावर उभा राहिला नसता! माणसाचं धावणं, मिळवणं आणि गमावणं हे सर्वस्वी सूर्याशी संबंधित आहे, असं ज्या वेळी माणसाला ज्ञान होतं, त्याच वेळी तो त्रिसंध्या करतो! मग त्याला ज्ञानभोग मिळून किंवा ज्ञानोदय होऊन तो खरा सूर्योदय पाहतो!

मित्र हो, ता. ४-१-२०२२ रोजी पहाटे पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असेल. अर्थातच, ता. ४ जानेवारीचा सूर्योदय आपण गुरू कुंभेत आणि शनी मकरेत अर्थातच पृथ्वीच्या राशीत असताना निश्‍चितच ज्ञानप्रकाशात पाहू या!

विजयाचा चौकार-षटकार ठोकाल

मेष : कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठं आश्‍वासक ग्रहमान राहील. उद्याचा सोमवार भाग्य उजळणारा. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं बॅटिंग फिल्ड राहील. ठोका विजयी चौकार-षटकार. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात ता. ४ व ५ हे दिवस मानसिक गोंधळ वाढवतील. नोकरीत संशयग्रस्त राहाल.

परदेशात संधी मिळतील

वृषभ : सप्ताहात गुरुभ्रमणाची पार्श्‍वभूमी आणि बुधाची खेळी. नोकरी-व्यावसायिक घडामोडी उत्तम राहतील. ता. ४ ते ६ हे दिवस मोठे प्रवाही. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी सतत ऑनलाइन राहावं. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार विचित्र गुप्तचिंतेचा. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशात संधी.

व्यावसायिक प्राप्ती होईल

मिथुन : वक्री शुक्रभ्रमण ग्रहांचा पट ताब्यात घेईल. विशिष्ट परिस्थितीचा उत्तम लाभ उठवाल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आजचा रविवार जनसंपर्कातून वादविवादाचा. बाकी ता. ३ ते ६ हे दिवस एकूणच आपल्या राशीस व्यावसायिक प्राप्तीचे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना मोठ्या शैक्षणिक संधी. शनिवार वधू-वर संशोधनातून प्रगतीचा.

खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील

कर्क : सप्ताहात शनी आणि हर्षल यांचं फिल्ड राजकारणी आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना उपद्रवमूल्य असलेलं. सावध! बाकी तरुणांना शुभग्रहांच्या ओव्हर्स धावा काढून देणाऱ्या. मुलाखतीतून यश. ता. ६ चा गुरुवार एकूणच सुवार्तांचा. उद्याचा सोमवार आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी मोठ्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा. वास्तुविषयक व्यवहार कराच!

स्पर्धांत यश व विवाहाचे योग

सिंह : सप्ताहातील ग्रहांचं फिल्ड शुभग्रहांच्या ताब्यात राहीलच. सप्ताहात आत्मविश्‍वास वाढेलच. सप्ताहाचा शेवट मोठ्या सुवार्तांची पार्श्‍वभूमी ठेवेल. ता. ६ चा गुरुवार गुरुभ्रमणाची ताकद दाखवून देईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. परदेशातील तरुणांचा भाग्योदय. पूर्वा नक्षत्राच्या गृहिणींवर प्रेमाचा वर्षाव. उत्तरा नक्षत्राच्या मंडळींना विवाहयोग.

चोरी, नुकसानीपासून जपा

कन्या : एक लयबद्ध सप्ताह. मोठे हृद्य समारंभ घडतील. वक्री शुक्रभ्रमणाचं पर्व गृहिणींना छानच. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींची मोठी मौजमजा होईल. उत्तरा नक्षत्राच्या तरुणांना कॅम्पसमधून नोकरी. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींनी आजचा रविवार चोरी, नुकसानीतून जपावा. वाहने सांभाळा. काहींना अग्निभय.

अनपेक्षित गाठीभेटींतून लाभ

तूळ : मोठ्या मौजमजेचा सप्ताह. वक्री शुक्रभ्रमणाचं एक ऐतिहासिक पर्व सुरू होत आहे. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना एखाद्या सन्माननीय पदाचा लाभ घडेल. ता. ३ व ४ हे दिवस यशातून मोठे फ्लॅश न्यूज देणारे. उद्याचा रविवार कलाकारांचा. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना अनपेक्षित गाठीभेटींतून लाभ. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरी.

व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील

वृश्‍चिक : सप्ताहात व्यावसायिक आडाखे यशस्वी होतील. बॅंकेची कामं होतील. ज्येष्ठा नक्षत्रास ता. ३ व ४ हे दिवस अतिशय गतिमान. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना वैवाहिक सुवार्ता धन्य करतील. ता. ६ चा गुरुवार हृद्य सोहळ्यातून साजरा होणारा.

व्यावसायिकांची उमेद वाढेल

धनू : सप्ताह तरुणांचाच राहील. सतत सुवार्तांतून चर्चेत राहाल. सप्ताहात परिचयोत्तर विवाहाच्या संधी. सप्ताहात स्वतंत्र व्यावसायिकांची उमेद प्रचंड वाढेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत पगारवाढ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून लाभ.

सहल व करमणुकीचे योग

मकर : सप्ताह बचावात्मक धोरणातून लाभच देईल. सप्ताहात मोहाचे प्रसंग टाळा. सप्ताहात नोकरीत वरिष्ठांची मर्जी जपा! श्रवण नक्षत्र व्यक्तींनी जुगार टाळावा. बाकी सप्ताहात घनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम सहली, करमणुकीचे योग. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रचिंता जाईल.

शेअरबाजारातून लाभ मिळेल

कुंभ : सप्ताहात मानवी संबंधांचे स्वर आणि सूर जुळून येतील. हृद्य गाठीभेटी होतील. मित्रमैत्रिणींमध्ये मिसळाच. सप्ताहात धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती भारदस्त ठरतील. अर्थातच, सभासंमेलनं गाजवाल. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट विवाहयोगाचा. सप्ताहात पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना शेअर बाजारातून लाभ.

नोकरीतील घडामोडी फायद्याच्या ठरतील

मीन : सप्ताह व्यावसायिकांना छानच! परदेशी व्यापाराच्या संधी क्‍लिक होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितिजन्य उत्तम लाभ होतील. नोकरीतील घडामोडी पथ्यावर पडतील. नवपरिणितांचे भाग्योदय होतील. काहींना बुद्धिमान माणसांच्या संगतीतून लाभ होतील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी नोकरी. बॅंकेची कामं होतील.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top