नवीन वर्षात मुंबई-दिल्ली प्रवासाच्या वेळेत बचत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

राजधानी एक्‍स्प्रेसलाही आता पुश-पुल इंजिन

मुंबई : मुंबई-दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेसलाही पुश-पुल इंजिन लावले जाणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला. त्यामुळे नव्या वर्षात मुंबई-दिल्ली प्रवासाच्या वेळेत एक तासाची बचत होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेस आणि ऑगस्ट क्रांती राजधानी एक्‍स्प्रेस यांच्यासाठी पश्‍चिम रेल्वेकडे एकूण पाच गाड्या आहेत. त्यापैकी एक गाडी सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुश-पुल तंत्रज्ञानाने धावते. उर्वरित चार गाड्यांना हे इंजिन जोडण्यासाठी वीजजोडणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर राजधानी एक्‍स्प्रेस पुश-पुल पद्धतीने मार्गस्थ होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पश्‍चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल-दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेसची ऑगस्टपासून सुरू असलेली पुश-पुल तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी ठरली. हे अंतर निर्धारित वेळेच्या 60 मिनिटे आधी पार करण्यात आल्यामुळे दोन्ही राजधानी एक्‍स्प्रेस या तंत्रज्ञानावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबरअखेर सर्व राजधानी एक्‍स्प्रेसमधील पुश-पुल तंत्रज्ञानाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

पुश-पुल चाचणी यशस्वी झाल्याने राजधानी एक्‍स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल येणार आहे. ही गाडी मुंबई-दिल्ली हे 1384 किलोमीटर अंतर सुमारे 17 तासांत पार करते. पुश-पुल तंत्रज्ञानांतर्गत राजधानी एक्‍स्प्रेसला पुढे आणि मागे अशी दोन आधुनिक इंजिने जोडण्यात येतील. त्यामुळे मुंबई-दिल्ली हे अंतर 15.30 तास ते 16 तासांत कापणे शक्‍य आहे.

या तंत्रज्ञानामुळे स्थानकातील फलाट सोडल्यानंतर अल्पावधीत वेग वाढवणे शक्‍य होते आणि ब्रेक यंत्रणाही तातडीने कार्यान्वित होते. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेस पुश-पुल तंत्रज्ञानावरच धावत आहे. 

ताशी 160 कि.मी. वेगासाठी सर्वेक्षण 
रेल्वे मंडळाच्या 100 दिवसांच्या नियोजनात समावेश असलेल्या मुंबई-दिल्ली मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी 160 किलोमीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी या मार्गाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savings during Mumbai-Delhi travel time in the new year