#Karunanidhi तमिळी राजकारणाचे भीष्माचार्य 

DMK leader Karunanidhi passed away
DMK leader Karunanidhi passed away

तमिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री होणारे आणि 'द्रमुक'चे प्रमुखपद सलग 50 वर्षे सांभाळणारे एम. करुणानिधी यांचा राजकीय प्रवास अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. तमीळ राजकारणाचा अवघा अवकाश व्यापणाऱ्या करुणानिधींच्या या प्रवासावर एक नजर. 
- वॉल्टर स्कॉट 

'द्रविड मुन्नेत्र कळघम'चे (द्रमुक) सर्वेसर्वा आणि तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी विद्यार्थिदशेत 'पानागल अरासर' या अभ्यासक्रमातील पुस्तकाने प्रभावित झाले होते. 'द्रमुक'चे पूर्वसुरी असलेल्या 'जस्टिस पार्टी'चे संस्थापक पानागल अरासर यांचे ते चरित्र. करुणानिधींनी या पुस्तकातूनच राजकारणाची मुळाक्षरे गिरवली. त्यातूनच, तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद पाच वेळा भूषविणाऱ्या आणि तब्बल अर्धा दशक "द्रमुक'चे सर्वेसर्वा राहिलेल्या करुणानिधींचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. करुणानिधींनी सातवीतच स्वतःची राजकीय विचारसरणी मांडणारे हस्तलिखित प्रकाशित केले. एवढेच नव्हे, तर चौदाव्या वर्षीच हिंदीविरोधी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. 
तमिळनाडूत पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांनी 1926 मध्ये छेडलेल्या "सेल्फ रिस्पेक्‍ट मूव्हमेंट'मध्ये राज्यभरातील विद्यार्थी सहभागी झाले. त्यात आघाडीवर होते ते करुणानिधी. मद्रास पाचाईय्याप्पास कॉलेजचा विद्यार्थी सी. एन. अण्णादुराई हा या आंदोलनाचा प्रमुख नेता. अण्णादुराईची ओजस्वी भाषणे ऐकलेल्या करुणानिधींनी "सेल्फ रिस्पेक्‍ट मूव्हमेंट'वरील चर्चेत सहभागी होत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. "सेल्फ रिस्पेक्‍ट'च्या युवा आघाडीचेही ते सुरवातीचे सदस्य होते. तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील तिरुवल्लूर येथील शाळेत आठव्या इयत्तेतच करुणानिधींनी राजकारणात "एंट्री' केली. "जस्टिस पार्टी' पराभूत झाल्यानंतर मद्रासमध्ये पहिले कॉंग्रेसी सरकार प्रस्थापित झाले. स्वराज पार्टीचा 1937 मध्ये पराभव करत राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. राज्यातील शाळांमध्ये हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या राजाजींच्या निर्णयाविरुद्ध करुणानिधी रस्त्यावर उतरले. 

हिंदीविरोधी आंदोलन 
तमिळनाडूत पहिल्या हिंदीविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यानंतर, करुणानिधींनी मागे वळून पाहिलेच नाही. थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. पेरियार आणि त्यांच्या समर्थकांनी द्रविडी जनतेमध्ये हिंदीविरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्यातून मद्रास येथे 3 जून 1938 मध्ये पहिले हिंदीविरोधी आंदोलन झाले. "सेल्फ रिस्पेक्‍ट मूव्हमेंट'च्या मराईमलाई अडिगल पाट्टूकोट्टाई अळगिरिसामी या तडाखेबंद वक्तृत्वाच्या नेत्याने या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यातूनच करुणानिधींचा राजकीय सूर्योदय झाला. तरुण करुणानिधी पेरियार यांचे वक्तृत्व आणि अण्णादुराईच्या सुंदर तमीळमुळे मंत्रमुग्ध झाले. अळगिरिसामींच्या "फायरब्रॅंड' भाषणांचाही त्यांच्यावर कमालीचा प्रभाव पडला. त्यातूनच, त्यांनी आपल्या मुलाचे एम. के. अळगिरी असे नामकरण केले. अण्णादुराई यांनी 1942 मध्ये "द्रविडा नाडू' (द्रविडी लोकांची भूमी) आंदोलन छेडले. मात्र, अण्णादुराईंनी वीसवर्षीय करुणानिधींना सार्वजनिक जीवनात उतरण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. करुणानिधींनी तो ऐकला खरा; पण तिरुवल्लूरमध्ये लेखन आणि नाटकांमधून द्रविडी चळवळीचा प्रसार केलाच. पुढे अण्णादुराईंनी 1948 मध्ये "द्रविडार कळघम'ला सोडचिठ्ठी देत "द्रमुक'ची स्थापना केली. या पक्षाच्या तिसऱ्या किंवा फार तर दुसऱ्या फळीत असलेल्या करुणानिधींनी अण्णादुराईंशी भावाप्रमाणे नाते जोडले. "द्रमुक'ने निवडणुकीच्या राजकारणात उडी घ्यायचे ठरविले. करुणानिधी 1952 मध्ये कुलिथालाई मतदारसंघातून विधानसभेवर सर्वप्रथम निवडून गेले. त्यानंतर, 2016 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्या गळ्यात सतत विजयाची माळच पडली. 
 
मुख्यमंत्रिपद पटकावले 
काँग्रेसला पराभूत करत अण्णादुराई 1967 मध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. राज्याच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक उपक्रममंत्री असलेले करुणानिधी प्रत्यक्षात मात्र तिसऱ्या क्रमांकावर होते. अण्णादुराईंचे 1969 मध्ये निधन झाले. त्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावरील व्ही. आर. नेडुंचेझियान यांना मागे सारत करुणानिधी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. खरंतर, "द्रमुक'च्या आमदारांनी नेडुचेझियान यांना पक्षप्रमुख म्हणून निवडण्याची एकमताने तयारी दर्शविलीच होती. मात्र, करुणानिधी यांनी एम. जी. रामचंद्रन यांच्या मदतीने सत्तेच्या सारीपाटावरील सोंगट्या यशस्वीपणे खेळत मुख्यमंत्रिपद पटकावले. त्यानंतर, 1971 मधील विधानसभा निवडणुकीत "द्रमुक'ने 234 पैकी 184 जागांवर विजय मिळविला. पक्षाच्या या सर्वांत मोठ्या विजयाने करुणानिधींच्या नेतृत्वावरही एक प्रकारे शिक्कामोर्तब केले. या वेळी, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या करुणानिधींचे सरकार आणीबाणीला विरोध केल्याने 1976 मध्ये बरखास्त करण्यात आले. 

एमजीआर निलंबित 
'द्रमुक'च्या विजयात एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांची भूमिका महत्त्वाची असली, तरी राजकीय धोका लक्षात घेऊन करुणानिधींनी त्यांना पक्षातून निलंबित केले. राजकारणात करुणानिधींची ही खेळी चुकीची समजली जाते. एमजीआर यांनी अ. भा. अण्णाद्रमुक या पक्षाची स्थापना केली. महत्त्वाकांक्षा होती, ती मुख्यमंत्रिपदावर विराजमान होण्याचीच. 1977च्या, तसेच पुढील विधानसभा निवडणुका जिंकत एमजीआर 1987 म्हणजे निधनापर्यंत मुख्यमंत्री राहिले. या दहा वर्षांच्या काळात करुणानिधींनी आपल्या पक्षाची मोट कौशल्याने सांभाळली. तमिळनाडूच्या राजकारणात कुठल्याही पक्षाच्या प्रमुखासाठी ही सर्वांत मोठी कामगिरी. एमजीआर यांच्या निधनानंतर करुणानिधींनी पुन्हा झेप घेतली. त्यांनी 1989 मध्ये मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात तमीळ राजकारणातील हा नेता एम. के. स्टॅलिन आणि एम. के. अळगिरी या आपल्याच पुत्रांमधील शत्रुत्वामुळे जर्जर झाला. अगदी महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणेच. 
 
अनुवाद : मयूर जितकर 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com