दहशतवाद्यांचे उदात्तीकरण थांबवा - राजनाथ सिंह

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

इस्लामाबाद - "दहशतवाद्यांचे उदात्तीकरण बंद झाले पाहिजे. दहशतवाद केवळ दहशतवाद असतो. त्यामुळे दहशतवाद्यांना हुतात्मा म्हणू नका,‘ अशा शब्दांत भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर खडेबोल सुनावले. राजनाथसिंह यांनी येथील सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या परिषदेत बोलताना पाकिस्तानला दहशतवाद्याच्या मुद्यावरून जणू आरसाच दाखवला. "पाकिस्तान दहशतवाद्यांना दीर्घकाळापासून आश्रय देत आहे. दहशतवाद चांगला किंवा वाईट नसतो. दहशतवादाला आपण कोणताही रंग देवू शकत नाही,‘ असे सिंह म्हणाले. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला लक्ष्य केले. 

"दहशतवादाचे कोणी गुणगान कसे करू शकतो?,‘‘ असा प्रश्‍न उपस्थित करत सिंह यांनी काश्मीरमधील चकमकीत ठार करण्यात आलेल्या बुऱ्हान वणीला हुतात्मा संबोधल्याबद्दलही कठोर शब्दांत उत्तर दिले. त्यांनी अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील दहशतवादी हल्ल्यांचाही उल्लेख केला. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अधिक जोरात प्रसार होणारा दहशतवाद धोकादायक असून, त्याला रोखणे गरजेचे असल्याचे सिंह यांनी यावेळी नमूद केले.
 
भारत आणि पाकिस्तानमधील संबंधात सुरू असलेला तणाव सिंह आणि पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान समोरासमोर आल्यानंतरही पहायला मिळाला. सिंह यांनी सदस्य देशांच्या आपल्या समकक्ष मंत्र्यांबरोबरच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशीही चर्चा केली. हा शिष्टाचाराचा भाग होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सार्क देशांच्या मंत्र्यांचे प्रतिनिधी मंडळ सुमारे 20 मिनिटे शरीफ यांच्याबरोबर होते आणि या काळात केवळ शुभेच्छांची देवाणघेवाण झाली. आठ सदस्यांच्या सार्कमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. 

जे लोक दहशतवादी आणि दहशतवादाला मदत, पाठिंबा, आश्रय, सुरक्षा पुरवितात, त्यांना वेगळे पाडले पाहिजे. दहशतवादीच नव्हे, तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांविरूद्धही कारवाई झाली पाहिजे. 
राजनाथसिंह 

राजनाथसिंहांच्या भाषणाचे प्रक्षेपण रोखले 
दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानचे कान उपटणारे सिंह यांचे भाषण प्रक्षेपित करण्यापासून माध्यमांना अटकाव करण्यात आला होता. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी स्थानिक तसेच परदेशी माध्यमांनाही सिंह यांचे भाषण प्रक्षेपित करण्याची परवानगी नाकारली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाषण मात्र सर्व वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपित केले. त्यामुळे नाराज सिंह भोजन समारंभात सहभागी न होता भारताकडे येण्यासाठी इस्लामाबाद विमानतळाकडे रवाना झाले. 

Web Title: Rajnath Sinh

फोटो गॅलरी
व्हिडीओ गॅलरी