"कबाली' रजनीसाठी कायपण...

कबाली' रजनीसाठी कायपण...
कबाली' रजनीसाठी कायपण...

चेन्नई - दक्षिणेचा सुपर डुपर स्टार रजनीकांत याच्या "कबाली‘ने पहिल्याच दिवशी देशभरात धूम केली. लाडक्‍या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्यासाठी उतावीळ झालेल्या त्याच्या "फॅन्स‘नी शुक्रवारी पहाटे चार पासूनच चित्रपटगृहांवर गर्दी केली होती. बहुतेक ठिकाणी "हाउस फुल्ल‘चे फलक झळकत होते. अनेकांनी "ब्लॅक‘मधून तिकिटे मिळविली. एका शौकिनाने पहिल्या खेळासाठी तब्बल 14 हजार रुपये मोजले! 

"कबाली‘ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. दक्षिणेकडे देवाच्या रूपात रजनीकांतला पाहिले जाते. त्यामुळे साहजिकच त्याच्या नव्या चित्रपटाबद्दल सर्वत्र उत्सुकता होती. अखेर आज देशातील पाच हजार चित्रपटगृहांमध्ये "कबाली‘ झळकला. त्यातील एक हजार चित्रपटगृहे एकट्या तमिळनाडूतील आहेत. "कबाली‘बद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या. रजनीकांतचा "लिंगा‘ बॉक्‍स ऑफिसवर आपटला, तरी रसिकांनी पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला. काही कंपन्या व चाहत्यांनी आधीच तिकिटांचे आरक्षण केल्याने सर्व खेळ "फुल्ल‘ होते. तिकिटे न मिळालेल्या प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या बाहेरच या यशाचा आनंद साजरा केला. अनेक ठिकाणी रजनीकांतचे मोठे कटआउट व बॅनर लागल्याने संपूर्ण शहर "थलैवा‘मय (नेता) झाले होते. 

मुंबई, हैदराबाद, बंगळूर व केरळातही रसिकांनी "कबाली‘ला डोक्‍यावर घेतले. मुंबईमध्ये सकाळी सहापासून खेळांना सुरवात झाली. या चित्रपटातील स्टंट, संगीत व संवादातील खास "पंचेस‘ला रजनीकांत "टच‘ असल्याची प्रतिक्रिया चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी दिली. केरळमधील 300 चित्रपटगृहांमध्ये आज "कबाली‘ झळकला. 

पोस्टरला दुग्धाभिषेक 

"कबाली‘ आज प्रदर्शित होणार असल्याने चेन्नईत रसिक जणू वेडेपिसे झाले होते. मेगास्टार रजनीकांत याच्या भव्य पोस्टरवर त्यांनी पहाटे चार वाजता दुधाचा अभिषेक केला. गाणी म्हणून व नृत्य करून त्यांनी आनंद साजरा केला. भारतासह अमेरिका, ब्रिटन, मलेशिया व सिंगापूरमध्येही "कबाली‘ झळकला. रजनीकांतचे भक्त असलेले काही प्रेक्षक तर जपानहून चेन्नईला आले होते. रजनीकांत सुटीसाठी सध्या अमेरिकेत असून, तेथेच त्याने "कबाली‘च्या विशेष खेळाचे आयोजन केले होते. 

"एअर एशिया‘देणार भरपाई 

काही दिवसांपासून एअर एशिया कंपनीच्या विमानांवर "कबाली‘चे पोस्टर झळकत आहेत. चेन्नईत हा चित्रपट पाहण्यासाठी बंगळूरहून रजनीकांतचे चाहते "एअर एशिया‘च्या विमानाने आले होते; मात्र आयत्या वेळी चित्रपटगृह व वेळ बदल्याची तक्रार त्यांनी केली. त्यांना रजनीकांतच्या चेन्नईतील "फॅन्स‘सह चित्रपट पाहायचा होता. नियोजनात बदल केल्याचे रसिकांना कळविता आले नाही, याबाबत कंपनीने दिलगिरी व्यक्त करून भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

"रजनी‘ची धूम... 

5 हजार  चित्रपटगृहे 

65 लाख रुपये कटआउटची एकूण किंमत 

200 कोटी रुपये  पहिल्या दिवसाची कमाई 

110 कोटी रुपये निर्मितीचा खर्च

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com