नुसरत जहां म्हणतात, बलात्कारांसाठी हिच शिक्षा पाहिजे !

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

बलात्काराच्या घटना वारंवार घडत असल्याने बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी उपाय सुचवला आहे.

मुंबई : हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे आणि शुक्रवारी (ता. 6) हैदराबाद पोलिसांनी आरोपींचा एन्काउंटर केला. हैदराबाद पोलिसांच्या या धाडसाचं कौतुक संपूर्ण देश करत आहे आणि त्याचसोबत सेलिब्रिटीही करत आहेत. हा आनंद व्यक्त होत असताना मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्येही काळजाला पिळवटून टाकणारी घटना घडली. बलात्कार पीडितेला जिंवत जाळ्यात आले आणि 90 टक्के भाजल्याने तिचा मृत्यु झाला आहे. या सर्व घटनादरम्यान बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांनी उपाय सुचवला आहे. 

देशात अशा बलात्काराच्या घटना वारंवार घडत असल्याने लोकांकडूनही सुरक्षा आणि जलद न्यायासाठी मागणी केली जात आहे. 'बलात्कार प्रकरणातील आरोपी एकदा दोषी सिद्ध झाला की, त्या नराधमांना महिन्याभरातच फाशी द्या' अशी मागणी खासदार नुसरत जहां यांनी केली आहे. 

ही मागणी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त करत असताना त्यांनी लिहिलं आहे की,' नाही म्हणजे नाही ! कायदे कितीही कडक असले तरीही प्रशासन आणि पोलिसांनी जबाबदार असणे गरजेचे आहे. माफी नको. जामीन नको. दोषी सिद्धा झाल्यास एका महिन्यातच  फासावर चढवा'. शिवाय  #EnoughIsEnough #UnnaoTruth #Cyberabad हे टॅगही वापरले आहेत. कडक शब्दात ट्विट करुन त्यांनी ही मागणी सर्वांसमोर ठेवली आहे. 

उन्नावमध्ये 20 वर्षीय युवतीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर पीडितेवर गुरुवारी सकाळी न्यायालयाकडे जात असताना नराधमांनी हल्ला करत तिला पेटवून दिले. सुमारे 40 तासांनी तिच्या किंकाळ्या शांत झाल्या असून तिचा मृत्युशी लढा अपयशी ठरला आहे. 

उन्नावप्रकरणी 'एसआयटी' स्थापन 
न्यायालयात सुनावणीसाठी जाणाऱ्या बलात्कार पीडितेला मारहाण करीत पेटवून दिल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त मुकेश मेश्राम यांनी ही माहिती शुक्रवारी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nusart jahan reacted on rape case