ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन 

marathi news shashi kapoor died
marathi news shashi kapoor died

मुंबई - "जब जब फुल खिले', "कभी कभी', "दिवार', "सत्यम शिवम सुंदरम्‌', "रोटी कपडा और मकान', "त्रिशूल' यांसारख्या एकापेक्षा एक यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणारे तसेच "उत्सव' व "कलियुग' यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची निर्मिती करणारे ज्येष्ठ अभिनेते तसेच निर्माते व दिग्दर्शक शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने अंधेरीतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे करण आणि कुणाल हे दोन मुलगे आणि संजना ही मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. 5) अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीस सुरवात करणाऱ्या शशी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे कित्येक चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी ठरले. अभिनेत्री नंदाबरोबर त्यांची जोडी विशेष गाजली. "चार दिवारे' हा नंदा आणि त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर आलेला "जब जब फुले खिले' हा चित्रपट चांगलाच गाजला. त्यानंतर शशी कपूर आणि नंदा या जोडीने राजासाब, निंद हमारी ख्वाब तुम्हारे असे काही चित्रपट केले. रोमॅंटिक हिरो अशी त्यांची इमेज झाली. 

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर त्यांनी "दिवार', "त्रिशूल' असे काही यशस्वी चित्रपट दिले. केवळ हिंदी चित्रपटच नाही तर इंग्रजी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. इंग्रजी चित्रपटामध्ये काम करणारे ते बॉलिवूडचे पहिले कलाकार. 

पृथ्वी थिएटरची धुरा त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. अजूबा या चित्रपटाचे ते दिग्दर्शक होते. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. भारत सरकारचा मानाचा असा दादासाहेब फाळके पुरस्कार कपूर कुटुंबात तीन जणांना मिळाला. पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि शशी कपूर यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. शशी कपूर हे कपूर कुटुंबातील सर्वाधिक पुरस्कार मिळविणारे अभिनेते ठरले. यश चोप्रा, विमल रॉय, प्रकाश मेहरा यांसारख्या अनेक दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले. गेले काही महिने ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते. अखेर आज सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 

निस्सीम कलाकार  - आशा पारेख 
कलेवर निस्सीम प्रेम करणारा कलाकार म्हणजे शशी कपूर. त्यांच्याबरोबर मी तीन-चार चित्रपटांमध्ये काम केले. "कन्यादान' या 1968 मध्ये आलेल्या चित्रपटामध्ये आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केले. या चित्रपटाला संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले. यातील "लिखे जो खत तुझे...' या गाण्यासहित अन्य गाणी लोकप्रिय ठरली. त्यानंतरही आम्ही "प्यार का मौसम', "हम तो चले परदेस' वगैरे चित्रपटांमध्ये काम केले. रईसजादा हा त्यांच्याबरोबर केलेला शेवटचा चित्रपट. सेटवर ते सगळ्यांशी हसतखेळत असायचे. कधी कुणावर रागावलेले ते मला दिसले नाहीत किंवा सेटवर कधी उशिरा आलेले मला आठवत नाहीत. "कन्यादान'च्या सेटवर त्यांची व माझी पहिली भेट झाली. त्यांचा स्वभाव अगदी मनमिळावू होता. केवळ चित्रपटसृष्टीवरच त्यांचे प्रेम होते असे नाही, तर रंगभूमीवरही त्यांचे तितकेच प्रेम होते. वडील पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर पृथ्वी थिएटरची धुरा त्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली. हिंदीमध्ये त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट केले. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. कलेवर त्यांचे खूप प्रेम होते आणि त्यातच त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. जवळपास दीडशेच्यावर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. केवळ हिंदीच नाही तर इंग्रजी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले. इंग्रजी चित्रपटांमध्ये काम करणारे ते बॉलिवूडचे पहिले कलाकार होते. त्यांनी "अजूबा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान मोठे आहे. त्यांचे काम कधीच कुणी विसरणार नाही. त्यांचे काम सदैव लक्षात राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com