विमान प्रवास महागला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दुरुस्तीमुळे विमानाच्या तिकीट दरात २० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दुरुस्तीमुळे विमानाच्या तिकीट दरात २० ते ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली. या विमानतळावरील मुख्य धावपट्टी ४ नोव्हेंबर ते २८ मार्चदरम्यान दररोज आठ तासांसाठी बंद असणार आहे. यामुळे विमान सेवा वापरणाऱ्यांना २९ मार्च २०२० पर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे.

मुंबई-दिल्ली, मुंबई-अहमदाबाद अशा अनेक व्यस्त मार्गांवरील तिकीट दरांमध्ये तब्बल २० ते ५० टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. येथील दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला ४६ विमानांचे आगमन व उड्डाण होते, तर दुय्यम धावपट्टीवरून तासाला ३५ विमानांचे उड्डाण व आगमन होते.

या विमानतळावरून दिवसाला सुमारे ९७० विमानांचे उड्डाण आणि आगमन होते. त्यामुळे धावपट्टीवर कमालीचा ताण पडत असल्यामुळे धावपट्टीची वेळच्या वेळी दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीच्या कामामुळे त्या दिवसांतील तिकीटदरावरदेखील परिणाम झाला आहे. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत म्हणजे दिवसातून किमान आठ तास धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता विमान फेऱ्या आणि सेवांची आखणी करण्यासाठी विमान कंपन्यांना वर्षभर आधी सूचित करण्यात आले होते. 

web title : Air travel is expensive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Air travel is expensive