मोफत नाश्‍ता पडला दीड लाख रुपयांना! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

कुटुंबाच्या दोन खात्यांतून दीड लाख रुपयांची रक्कम काढल्याचा प्रकार घडला आहे.

मुंबई : सिंगापूर येथील सहलीतील नाश्‍त्याची रक्कम परत मिळण्याच्या नावाखाली लिंक पाठवून सायबर चोरट्यांनी चांदिवली येथील कुटुंबाच्या दोन खात्यांतून दीड लाख रुपयांची रक्कम काढल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, याचा अधिक तपास सुरू आहे.

तक्रारदार 39 वर्षीय गृहिणी या अंधेरी परिसरात राहणाऱ्या आहेत. त्यांचे पती बॅंकेत कामाला आहेत. मार्च 2019 मध्ये एका संकेतस्थळावरून त्यांनी सिंगापूर येथे सहलीला जाण्यासाठी बुकिंग केले होते. त्यात नाश्‍ता मोफत देण्यात येणार होता; मात्र तेथे गेल्यानंतर हॉटेलमध्ये नाश्‍त्यामध्ये फक्त ब्रेड-बटर आणि चहा मिळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत संकेतस्थळाच्याच्या कमलदीप त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली.

सुरुवातीला त्यासाठी तीन हजार रुपये परत मिळतील असे सांगण्यात आले. अखेर तडजोडीअंती नऊ हजारांचा परतावा देण्याचे ठरले. सहलीवरून मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी त्रिपाठी यांच्याकडे पैशांबाबत विचारणा केली. 10 एप्रिल ते 23 जुलैपर्यंत याबाबत त्या पाठपुरावा करीत होत्या; मात्र त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर बुधवारी दुपारी त्यांनी संकेतस्थळाच्या हेल्पलाईनवर दूरध्वनी केला. सुरुवातीला रिंग वाजून तो फोन कट झाला. त्यानंतर त्याच क्रमांकावरून त्यांना दूरध्वनी आला. महिलेने संबंधित दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीकडे परताव्याचे पैसे कधी मिळणार याबाबत विचारणा केली. त्याने पैसे परत करण्यासाठी गुगल पे किंवा फोन पे अकाऊंटची माहिती देण्यास सांगितले, परंतु त्यांच्याकडे दोन्हीही नसल्याने त्यांनी बॅंक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले.

त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या लिंकवर माहिती भरून देण्यास सांगितले. त्यांनी माहिती पाठवून देताच तक्रारदार महिलेच्या पतीच्या दोन खात्यांतून एक लाख 34 हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला. त्यांनी पुन्हा हेल्पलाईनवर कॉल करण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही फोन उचलला नाही. अखेर त्यांनी पवई पोलिसांत तक्रार दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free breakfast for half a million rupees!