शिवसेनेचा जम्मूतही जल्लोष 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत असल्याबद्दल जम्मूत जल्लोष करण्यात आला.

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होत असल्याबद्दल जम्मूत जल्लोष करण्यात आला. जम्मू-काश्‍मीरमधील शिवसेना नेत्यांनी लाडू वाटले आणि बाईक रॅली काढून आनंद व्यक्त केला. 

शिवसेनेचे जम्मू-काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष मनीष साहनी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जम्मूतील प्रेस क्‍लब परिसरात मिठाई वाटली आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. रघुनाथ बाजार-पुरानी मंडी परिसर या मार्गाने गेलेल्या मिरवणुकीचा समारोप परेड परिसरात करण्यात आला. 

महाराष्ट्रात सहा दशके शिवसेनेने लोकांची सेवा केली आहे. मोठ्या अपेक्षेने शिवसेनेने महायुती केली होती; मात्र भाजपने फसवणूक केली. भाजपच्या अहंकाराला उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील शिवसैनिकांना अत्यानंद झाला आहे, असे साहनी यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनिल देसाई, एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सत्ता मिळवणे शक्‍य झाल्याचे सांगत त्यांनाही धन्यवाद देण्यात आले. यावेळी मीनाक्षी छिब्बर, अश्‍विनी गुप्ता, विकास बख्शी, राकेश गुप्ता, संजीव कोहली यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

web title : Shiv Sena celebrates in jammu also

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena celebrates in jammu also