चंद्रयान - २ मोहिमेत बेळगाव जिल्ह्यातील आडीचे केरबा लोहार

राजेंद्र हजारे
Monday, 9 September 2019

निपाणी - आडी (ता.  निपाणी) येथील केरबा आनंदा लोहार यांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत अतुलनीय योगदान दिले आहे. लोहार यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीममधील सर्व सदस्यांसह लोहार यांची प्रशंसा केली आहे. केरबा लोहार हे २५ वर्षांपासून इस्रोच्या बंगळूर येथील कार्यालयात कार्यरत आहेत.

निपाणी - आडी (ता.  निपाणी) येथील केरबा आनंदा लोहार यांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत अतुलनीय योगदान दिले आहे. लोहार यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीममधील सर्व सदस्यांसह लोहार यांची प्रशंसा केली आहे. केरबा लोहार हे २५ वर्षांपासून इस्रोच्या बंगळूर येथील कार्यालयात कार्यरत आहेत.

‘चांद्रयान-२’ ही इस्रोची महत्त्वाकांक्षी योजना सत्यात उतरण्यासाठी संशोधकांनी परिश्रम घेतले होते. त्यातील संशोधन प्रक्षेपणाची जबाबदारी इस्रोमधील या टीमवर दिली होती. त्यांच्या टीममध्ये केरबा लोहार यांचा समावेश आहे. यापूर्वी झालेल्या अनेक मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचे आडी येथे मराठी प्राथमिक शाळा, सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर चांगले गुण मिळाल्याने वडिलांनी रात्रंदिवस कष्ट करून त्यांना बेळगाव येथील सरकारी डिप्लोमा पॉलिटेक्‍निकल कॉलेजमध्ये दाखल केले. जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे शिक्षण पूर्ण करून इस्त्रोमधील कार्यालयात मुलाखत दिली होती. त्यात त्यांना यश मिळाले.

२५ वर्षापासून इस्त्रोच्या बंगळूर येथील कार्यालयात ते संशोधक म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून विज्ञानाची आवड असलेल्या केरबा यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले. घरात गरिबी असतानाही पडेल ते काम करून जिद्दीने त्यांनी पुढील शिक्षण घेतले.

चांद्रयान - २ मोहीम सर्वच पातळीवर यशस्वी होत असल्याने संपूर्ण टीमचे कौतुक होत होते. पण अखेरच्या टप्प्यात विक्रम लॅंडरचा असलेला संपर्क चंद्रावर उतरण्यापूर्वीच तुटला. परिणामी सर्वच संशोधकांना जबरदस्त धक्का बसला. तरीही अद्याप १४ दिवसात लॅंडरशी संपर्क होण्याची आशा केरबा लोहार यांच्यासह सर्व संशोधकांना आहे. तरीही नाराज झालेल्या संशोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन दिलेला धीर महत्त्वाचा आहे.

‘चांद्रयान-२’ यशस्वी होण्यासाठी अखेरच्या आठ दिवसांच्या काळात शास्त्रज्ञांनी अथक काम केले. पण अखेरच्या टप्प्यात लॅंडरशी संपर्क तुटल्याने शास्त्रज्ञांच्या पदरी निराशा आली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांची भेट घेऊन निराश न होता नव्या दमाने काम करण्याची उमेद दिली.
- केरबा लोहार,
संशोधक, इस्रो बंगळूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerba Lohar From Aadi Belgaum District In Chandrayan 2 mission