फरासखाना स्फोटातील "सिमी'चे तिघे चकमकीत ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

ईनखेडी गावातील भोपाळ पोलिसांच्या कारवाईत आठ दहशतवादी
पुणे - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून फरारी झालेल्या स्टुडंट्‌स इस्लामिक ऑफ इंडियाच्या (सिमी) आठ संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले असून, त्यापैकी तिघांचा फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात स्फोट घडविण्यामध्ये हात होता. त्यांच्याविरुद्ध बॅंकेवर दरोडा, खून आणि तरुणांना दहशतवादी बनविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही आरोप आहेत.

ईनखेडी गावातील भोपाळ पोलिसांच्या कारवाईत आठ दहशतवादी
पुणे - भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहातून फरारी झालेल्या स्टुडंट्‌स इस्लामिक ऑफ इंडियाच्या (सिमी) आठ संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ठार केले असून, त्यापैकी तिघांचा फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारात स्फोट घडविण्यामध्ये हात होता. त्यांच्याविरुद्ध बॅंकेवर दरोडा, खून आणि तरुणांना दहशतवादी बनविण्यासाठी प्रयत्न केल्याचेही आरोप आहेत.

शेख महेबूब शेख इस्माईल ऊर्फ गुड्डू ऊर्फ मलिक ऊर्फ आफताब, जाकीर हुसेन ऊर्फ विकी डॉन ऊर्फ सिद्दीक ऊर्फ विनय कुमार, अमजद खान ऊर्फ पप्पू ऊर्फ दाऊद रमजान खान (तिघे रा. खंडवा, मध्य प्रदेश) यांच्यासह महंमद एजाजुद्दीन ऊर्फ अरविंद (रा. करेली, मध्य प्रदेश) या चौघांनी दहा जुलै 2014 रोजी फरासखाना पोलिस ठाण्याच्या पार्किंगमधील दुचाकीच्या डिकीत बॉंबस्फोट घडवून आणला होता. त्यापैकी महंमद एजाजुद्दीन हा हैदराबाद पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. तर तेलंगणा आणि ओडिशा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) राऊरकेला येथे फरासखाना स्फोटातील उर्वरित तिघांसह महंमद सालिक याला अटक केली होती. हे सर्वजण मध्य प्रदेश येथील खंडवा कारागृहातून पसार झाले होते. या अटकेनंतर त्यांची भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

दरम्यान, या तिघांसह अब्दुल मजीद, महंमद अकील खिलजी, महंमद खालिद अहमद, महंमद सालिक आणि मुजीब शेख या दहशतवाद्यांनी बराक तोडून रखवालदार रामाशंकर यांची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. या घटनेनंतर राज्यात "हाय अलर्ट' जारी करण्यात आला होता. त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. भोपाळ पोलिसांनी शहरालगतच्या ईनखेडी गावात या आठही दहशतवाद्यांना घेरून त्यांना यमसदनी धाडले.

महेबूब गुड्डू : गुड्डू हा मध्य प्रदेश येथील "सिमी'चा म्होरक्‍या अबू फैजलचा साथीदार होता. 2009 च्या एका तिहेरी खून प्रकरणात आरोपी होता. त्याने "एटीएस'चे पोलिस हवालदार सीताराम यादव, बॅंक व्यवस्थापक आणि एका वकिलाचा खून केला होता. अहमदाबादमध्ये 2008 मध्ये झालेल्या साखळी स्फोटात, तसेच 2011 मध्ये रतलाम येथील "एटीएस' पोलिस कर्मचाऱ्याच्या खुनाचा त्याच्यावर आरोप होता. खंडवा कारागृहातून पसार झाल्यानंतर गुड्डू हा बॉंब तयार करताना जखमी झाला होता.

जाकीर हुसेन : जाकीर हा खंडव्यातील सेल्स टॅक्‍स कॉलनीजवळ असलेल्या झोपडपट्टीत वास्तव्यास होता. "सिमी'शी संबंध आल्यानंतर त्याला पहिल्यांदा 2008 मध्ये अटक झाली होती. देवास, इटारसी आणि कटनी येथील बॅंक दरोड्यात, तसेच 2010 मध्ये भोपाळच्या मण्णपुरम गोल्ड कंपनीवरील दरोड्यात त्याचा सहभाग होता. या कंपनीतून त्या वेळी 12 किलो सोने लुटण्यात आले होते. खंडवा कारागृहातून 2013 मध्ये पसार झाल्यानंतर त्याने तेलंगणा येथील करीमनगरच्या बॅंकेत दरोडा टाकून 46 लाख रुपये लुटून नेले होते.

अमजद खान : अमजद याच्यावर भाजपच्या प्रमोद तिवारी याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. मण्णपुरम गोल्डच्या दरोड्यात जून 2011 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील काही बॅंक दरोड्यात त्याचा सहभाग होता. त्यालाही राऊरकेला येथे अटक करण्यात आली होती.

माझा एन्काउंटरवर विश्‍वास
दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यापेक्षा त्यांना चकमकींमध्ये मारण्यावर माझा अधिक विश्‍वास आहे, असे मध्य प्रदेशचे राज्यमंत्री एस. पी. मीना यांनी म्हटले आहे. भोपाळमध्ये तुरुंगातून पळून गेलेल्या "सिमी'च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चकमकीमध्ये मारल्याप्रकरणी ते म्हणाले, 'पोलिसांची ही कार्यशैली पाहून मला आनंद वाटला असून, मी त्यांचे अभिनंदन करतो. दहशतवाद्यांना जिवंत सोडू नये, अशीच जनभावना आहे. दहशतवादाशी संबंधित असणाऱ्यांचा असाच अंत होतो, हे यावरून दिसून येते.''

Web Title: Pharasakhana blast killed in an encounter